অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेणबत्ती

मेणबत्ती

मेणबत्ती मेण, घन चरबी वा तत्सम पदार्थांनी तंतुमय वात संतृप्त होईपर्यंत (पूर्णपणे भिजेपर्यंत) वातीभोवती थर देऊन तयार होणाऱ्या दंडगोलाकार वस्तूस सामान्यतः ‘मेणबत्ती’ असे म्हणतात. मेणबत्त्या विविध आकारमानांच्या बनवितात.

इतिहास

मेणबत्तीचा शोध कधी लागला याबद्दलची माहिती उपलब्ध नाही. प्राचीन काळातील लोकांना तिची माहिती होती; पण तिचे स्वरूप आजच्यासारखे नव्हते. थीब्झ येथील ईजिप्शियन थडग्यांवर मेणबत्त्यांच्या व त्यांच्या धारकांच्या आकृत्या कोरलेल्या आढळल्या आहेत. अशाच प्रकाराच्या मेणबत्त्या क्रीट येथे सापडल्या असून त्या इ. स. पू. ३००० च्या काळातील मिनोअन संस्कृतीतील होत्या. प्राचीन ईजिप्शियन लोक निमुळत्या व दंडगोलाकृती मेणबत्त्या वापरीत. या मेणबत्त्या वेतासारख्या गवताचा भेंडयुक्त गाभा द्रव चरबीने संतृप्त करून बनवीत. यालाच ‘रश कँडल’ असे म्हणत. पुढे तंतुमय वातीचा शोध लागल्यावर ती वितळलेल्या चरबीत बुडवून व थंड करून, मेणबत्ती योग्य जाडीची होईपर्यंत अशी क्रिया पुनःपुन्हा करून मेणबत्ती तयार करण्यात येऊ लागली. प्राचीन रोमन लोकांच्या मेणबत्त्या ह्या मेण व चरबी यांच्या मिश्रणापासून बनविलेल्या असून त्या एका टोकाकडे निमुळत्या होत गेलेल्या असत. अशाच प्रकाराच्या इ. स. पहिल्या शतकातील मेणबत्त्या फ्रान्समधील व्हेंझो-ला-रोमन येथे सापडल्या आहेत.

मध्ययुगात (इ. स. ११०० ते १३५०) यूरोपमध्ये गरीब लोक प्रकाशासाठीन ‘रश कँडल’ वापरीत. या मेणबत्त्या भेंड चरबीत वा विशिष्ट तेलात भिजवून तयार करीत. या काळात मेण-चरबी मिश्रणाच्या मेणबत्त्या प्रचलित होत्या. मात्र फक्त मेणाच्या बत्त्या फार महाग असल्याने त्यांचा वापर श्रीमंत वर्गच करी. चरबीच्या बत्त्यांना ‘डिप्स’ असे म्हणत. ही चरबी मांसापासून मिळवीत. सुतांचा जुडगा वितळलेल्या चरबीत बुडवीत व थंड करीत. बत्तीची जाडी आवश्यक तेवढी होईपर्यंत ही क्रिया बऱ्याच वेळा करीत. मधमाशीच्या मेणाच्या बत्त्या टांगलेल्या वातीवर वितळलेले मेण बऱ्याच वेळा ओतून बनवीत आणि तिच्या पृष्ठाचा उंचसखलपणा जाण्यासाठी ती कठीण पृष्ठावर फिरवीत असत.

मेणबत्त्या तयार करणे हा पूर्वी एक घरगुती उद्योग समजला जात असे. मध्ययुगात शहरांची वाढ होत असताना तो एक खास उद्योग समजण्यात येऊ लागला. पॅरिस, लंडन इ शहरांत चरबी व मधमाश्यांचे मेण यांपासून मेणबत्त्या करणाऱ्यांच्या वेगवेगळ्या गिल्ड (संघटना) होत्या. तेराव्या शतकात पॅरिसमध्ये गिल्डचे सभासद, घरोघरी जाऊन मेणबत्त्या तयार करीत. चरबीची मेणबत्ती कंदिलात बसविण्याची कल्पना याच काळात उदयास आली. आजही यूरोपच्या काही भागांत घरीच मेणबत्त्या करण्यात येतात.

पंधराव्या शतकापर्यंत मेणबत्त्या तयार करण्यासाठी साचे उपलब्ध नव्हते. सिऊर ब्रेझ या पॅरिसवासीयांनी प्रथमच चरबीच्या बत्त्यांसाठी साचा तयार केला. मात्र हा साचा मधमाश्यांच्या मेणासाठी उपयुक्त नव्हता.

अठराव्या शतकाअखेर वसातिमी देवमाशाच्या (स्पर्म व्हेलच्या) तेलापासून स्फटिकरूपाने मेण वेगळे करण्यात आले व बत्तीसाठी त्याचा वापर करण्यात येऊ लागला. हे मेण ठिसूळ असून त्याच्या बत्त्या जाळल्यास घाण वास येत नसे, तसेच उन्हाळ्यात त्या मऊ होत नसत व वाकतही नसत. या मेणबत्त्या म्हणजे पहिल्या मानक (प्रमाणभूत) बत्त्या होत. तिचे वजन सु. ०·०७५६ किग्रॅ. इतके असून ती ५·९२ ग्रॅ/तास या वेगाने एकसंध जळे. या मेणास कठीणपणा येण्यासाठी त्यात मधमाश्यांचे मेण मिसळण्यात येऊ लागले व १८६० मध्ये अशा मेणमिश्रणाच्या मेणबत्त्या तयार करण्यात येऊ लागल्या. पुढे ओझोकेराइट या खनिज हायड्रोकार्बन मेणाचा वापर बत्त्यांसाठी करण्यात येऊ लागला. याचा उकळबिंदू उच्च असल्याने ते चरबी व मधमाश्यांच्या मेणात मिसळल्यास मेणमिश्रण फारच कठीण बनते.

इ. स. १८५५ मध्ये इंग्लंडमध्ये ऑइल शेल (तेलयुक्त शेल खडक) व दगडी कोळसा यांच्यापासून आणि १८५९ मध्ये खनिज तेलापासून पॅराफीन मेण मिळविण्यात यश आले. हे मेण पांढरे वा निळसर पांढरे व पारदर्शक असून त्याचा वितळबिंदू कमी आहे. त्यामुळे त्यापेक्षा कमी तापमानास ते मऊ व आकार्य (कोणताही आकार घेणारे) होई. म्हणून त्यात सेरेसीन व स्पर्म तेल मिसळण्यात येई आणि ते मिश्रण बत्तीसाठी वापरीत.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ग्लिसराइडयुक्त चरबीच्या ज्वलनात घाण वास येण्यास जबाबदार असलेला घटक शोधून काढण्यात आला, तसेच चरबीचे अपघटन करून (रेणूचे तुकडे करून) त्यापासून घन वसाम्ले वेगळी करण्यात यश आले. यांपैकी पामिटिक व स्टिअरिक अम्ले जाळल्यास घाण वास येत नाही, पॅराफिनात मिसळल्यास ते घट्ट होते व बत्त्या चांगल्या प्रकाश देतात, असे आढळून आले. यामुळे पॅरॅफिनात स्टिअरिक अम्ल मिसळून त्यापासून चांगल्या प्रकाराच्या मेणबत्त्या बनविण्यात येऊ लागल्या.

टाकणखार, पोटॅशियम नायट्रेट वा नवसागर यांच्या सौम्य विद्रावात कापसाची दुहेरी वात मुरवून मेणबत्तीसाठी तिचा वापर १८२५ मध्ये डब्ल्यू, काबॉसेरेस यांनी प्रथम केला. अशी वात जळताना वाकते, पर्यायाने ऑक्सिडीभवनास (ऑक्सिजनाशी संयोग होण्यास) मदत करते व राखेचे काचीभवन होते. यामुळे राख झटकणे वा जळकी वात कापणे ह्या गोष्टी टळतात, असे आढळून आले. हल्ली अशा वाती यंत्राने करण्यात येतात.

निर्मिती आधुनिक मेणबत्तीनिर्मितीचे साचा यंत्र १८३४ मध्ये जोसेफ मॉर्गन यांनी तयार केले. या यंत्रात आतापर्यंत बऱ्याच सुधारणा झाल्या असून ते स्वयंचलितही बनविण्यात आले आहे. मेणबत्तीनिर्मितीचे प्रमुख तीन टप्पे पुढीलप्रमाणे आहेत

(१) वातनिर्मिती,

(२) मेणमिश्रण तयार करणे आणि

(३) साच्याच्या साहाय्याने मेणबत्तीची अखंडित निर्मिती.

(१) वातनिर्मिती उच्च प्रतीच्या पीळदार कापूस वा लिनन यापासून विणून वा पीळ देऊन योग्य जाडीची वात तयार करतात. एकाच दिशेने जळेल, जळलेला भाग वाकून ज्योतीच्या ऑक्सिडीभूत भागात घूसून पूर्ण ज्वलन होईल अशी ही वात असते. वातीची सच्छिद्रता वा केशाकर्षण (सूक्ष्म नलिकांद्वारे द्रव पदार्थ वर ओढून घेण्याची क्षमता) असे असते की, मेण वितळताच ते वातीतून त्वरित ज्योत भागाकडे जाते. यानंतर अकार्बनी लवणांच्या विद्रावात वाती काही काळ भिजत ठेवतात व साच्यात आणण्यापूर्वी त्या सुकवितात. यामुळे वातीचे ज्वलन मंद होते. लवणांत न भिजविल्यास वात जलद जळते व ज्योत वितळलेल्या मेणात घुसून विझते. शिवाय वात जळण्याचा वेग कमी झाल्यास तीत जास्त मेण शोषले जाते, वातीचा जास्त भाग जळतो व ज्योतीचा भडका होण्याचा धोका उद्‌भवतो.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate