भट्टीमध्ये लोखंडाच्या अगर पोलादाच्या लहान वस्तू लाल होईपर्यंत तापवून व ठोकून हाताने बनविण्याच्या कामास लोहारकाम म्हणतात. बंद भट्टीत मोठ्या वस्तू तापवून मोठ्या यांत्रिक घणाने ठोकून आकार देण्याच्या कामास घडाईकाम (फोर्जिंग) म्हणतात. [⟶ घडाई, धातूची]. शेतीकरिता लागणारी हत्यारे व अवजारे म्हणजेच विळा, कोयता, कुऱ्हाड, खुरपे, पहार वगैरे वस्तू लोहार बनवितो; तसेच बैलगाडीच्या लाकडी चाकास लोखंडी धाव बसवितो. भट्टीमध्ये घडीव लोखंड तापविल्यास त्यास कोणताही आकार देण्याइतपत ते नरम होते अगर त्याला लवचिकपणा येतो हा गुणधर्म माहीत झाल्यामुळे लढाईकरिता लागणारी तलवार, भाला, खंजीर, कट्यार, बाणाची टोके, परशू वगैरे हत्यारे लोहार बनवीत असत. ॲल्यूमिनियम मिश्रधातू, पितळ, कासे (ब्राँझ) याही लोहेतर धातूंपासून यंत्रांचे सुटे भाग व अनेक वस्तू लोहार बनवितो.
भट्टी : लोहारकाम करण्यासाठी भट्टीची आवश्यकता असते. खेडेगावात जमिनीत खड्डा खणून कोळसा ठेवण्याची व्यवस्था करतात व मागील बाजूंस हाताने चालणारा भाता बसवून हवेचा झोत येण्याची सोय केलेली असते. आता सुधारित भट्ट्या प्रचारात आलेल्या आहेत. काही भट्ट्या विटांच्या बनवितात, तर काही बिडाच्या बनवितात. आ. १ मध्ये बिडाची भट्टी दाखविली आहे. पुढच्या बाजूस कोक अगर कोळसा ठेवण्याकरिता जागा असून बाजूस हवा योण्याकरिता छिद्रयुक्त प्रोथ (निमुळती नळी) बसविलेला असतो. या प्रोथामुळे विद्युत् चलित्राने (मोटरने) चालविलेल्या पंख्याद्वारे येणारी हवा जोराने येते व कोळसा चांगला पेटतो. धूर जाण्याकरिता धुराडे वरच्या बाजूस असते. तयार झालेल्या वस्तू थंड करण्याकरिता किंवा काम करताना गरम झालेल्या सांडश्या थंड करण्यासाठी पाण्याची टाकी बसविलेली असते.
भट्टीवर काम करण्यासाठी खालील हत्यारांचा वापर करतात : (आ. २). (१) कलथा : हा नरम पोलदाचा असतो. कलथ्याने कोळसा ढोसता येतो व जरूरीप्रमाणे हालविता येतो. एका कलथ्याला भाल्यासारखे पण धार नसलेले टोक असते व दुसरा कलथा टोकाला वळविलेला असतो. भट्टीतील उष्णाता कायम ठेवण्यासाठी विस्तव प्रज्वलित ठेवावा लागतो व कोळशावरील राखही वारंवार काढावी लागते. या सर्व कामांसाठी दोन्ही कलथ्यांचा उपयोग करतात. (२) फावडे : भट्टीत कोळसा पुरविण्यासाठी फावड्याचा उपयोग करतात. हे नरम पोलादाचे असते. त्याला खैर, सागवान अथवा ॲश यांच्या लाकडाचा दांडा बसविलेला असतो. (३) झारी : कोळसा संथपणे जळण्यासाठी त्यावर मधूनमधून पाणी शिंपडण्यासाठी झारीचा उपयोग करतात.
खेडेगावात भट्टीकरिता लोणारी कोळता वापरतात, तर शहरातील कारखान्यांत दगडी कोळसा वापरतात. काही आधुनिक लोहारी भट्ट्यांत विद्युत् प्रवाह वापरतात. काही भट्ट्यांत रॉकेलाचा, इंधन तेलाचा अथवा नैसर्गिक किंवा कृत्रिम इंधन वायूचा उपयोग करतात.
स्त्रोत : मराठी विश्वकोश (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)
अंतिम सुधारित : 3/8/2020