অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुतारकाम

लाकडाचा वापर करून त्याद्वारे मानवोपयोगी वस्तू तयार करण्याची कला म्हणजे सुतारकाम होय. यासाठी लाकूड कापून त्याची विविध तऱ्हेने जोडरचना केली जाते. मानवाच्या रोजच्या वापराच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. सुतारकामाचे पुढील मुख्य प्रकार आहेत : (१) जुन्या पद्घतीच्या घराला लागणारे खांब, तुळया, कैच्या व चौकटी असे साहित्य तयार करून त्यांची जोडणी करणे. (२) फळ्यांची दारे, खिडक्या व विभाजक पडदे अशा प्रकारचे सपाट भाग बनवून बिजागऱ्या, कड्या व अटका बसविणे. (३)खुर्च्या, टेबले व कपाटे अशा प्रकारचे साधे तसेच शोभिवंत उंची फर्निचर तयार करणे. (४) मोठ्या इमारतीच्या बांधकामात लागणारे,कमानीच्या व काँक्रीटच्या आधारांचे तात्पुरत्या स्वरूपाचे लाकडी काम करणे. (५) शेतकामांसाठी लागणारे औत, नांगरादी लाकडी अवजारे बनविणे. (६) तेलघाणे, उखळ, जाती व चरक अशा प्रकारची लाकडी यंत्रे तयार करणे. (७) बैलगाड्या, हातगाड्या तसेच घोड्यांच्या गाड्या, टांगे, मेणे व पालख्या यांसारखी वाहने बनविणे. (८) नावा, पडाव, शिडाची जहाजे व तराफे अशा प्रकारची पाण्यातील वाहने बनविणे. (९) सूत व कापड उद्योगांतील चरखे, हातमाग वगैरे साहित्य तयार करणे. (१०) पिपे, खोके व पिंजरे अशा प्रकारचे साहित्य बनविणे. (११) पांगुळगाडा वगैरे खेळण्याचे लाकडी साहित्य तयार करणे. (१२) फर्निचरासाठी लागणारे गोल छेदाचे नक्षीदार काम, लेथ यंत्रावर कातून त्यावर तेलातील रोगण (व्हॉर्निश) किंवा लाखेचे रंग बसविणे. (१३) विविध प्रकारचे पोकळ व भरीव कातकाम करणे. (१४) लाकडी भागावर नक्षी कोरणे आणि जाळीचे काम करणे.(१५) ओतकामासाठी लागणारे नमुने व तात्पुरत्या स्वरूपाच्या पेट्या बनविणे. (१६) रूळगाड्या, मोटारगाड्या, आगबोटी आणि विमानांमध्ये लागणारे लाकूडकाम करणे.

सुतारकामातील प्रत्येक प्रकारच्या कामात तरबेज होण्यासाठी अनेक दिवस प्राथमिक शिक्षण घ्यावे लागते व नंतर प्रत्यक्ष कामाचाही भरपूर अनुभव मिळवावा लागतो. या कामात वैयक्तिक कौशल्यालाही खूप वाव असतो. कोणताही सुतार सर्व प्रकारचे काम करीत नाही. प्रत्येक सुतार त्याला मिळालेल्या किंवा स्वतःच्या पसंतीने निवडलेल्या शिक्षणाप्रमाणे विशिष्ट शाखेत काम करून हळूहळू पारंगत होतो.

भारतात पूर्वी सुतारकाम हे कौशल्याचे काम जातीनिहाय पारंपरिक रीत्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला शिकविले जात असे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुतारकाम शिकविण्यासाठी औद्योगिक व तांत्रिक संस्था (आय. टी. आय.सारख्या), शासकीय तसेच खासगी संस्थांतूनही प्रशिक्षण सुरू करण्यात आले. त्यात शास्त्रशुद्घ पद्घतीने सुतारकामाचे शिक्षण देण्यात येते. त्यामुळे अधिकाधिक कुशल व परिपूर्ण कारागीर तयार होऊन कार्यक्षमता व उत्पादन वाढण्यास चालना मिळाली.

ररोजची मजुरी घेऊन काम करणारे सुतार कामाच्या ठरविलेल्या तसेच लाकूड बाजाराची चांगली माहिती असावी लागते. त्यांना लाकडाची जागेवर जाऊन काम करतात. ग्राहकाच्या मागणीप्रमाणे माल तयार करून मापे घेणे व त्यांची राशी (आकारमान) मोजणे, काम करण्यासाठी किती देणारे सुतार बहुतांशी काम आपल्या दुकानात करतात. या सुतारांना लाकडांची वेळ लागेल, याचा अंदाज व त्यासंबंधीचा सर्व हिशोब यावा लागतो.

भारतामध्ये बाभळीचे लाकूड सर्व राज्यांत मिळते. ते फार मजबूत व चिवट तसेच किमतीलाही स्वस्त असल्यामुळे, ग्राहकाच्या मागणीनुसार सुतार बहुतेक प्रकारच्या कामासाठी मुख्यतः बाभूळच वापरतात. हे लाकूड फार घट्ट असल्यामुळे त्याचे काम करण्यासाठी बरीच मेहनत लागते. फर्निचर व घरकामांसाठी मुख्यतः सागवानाचे लाकूड वापरले जाते. ते हलके व नरम असून त्यावर काम करणे सोपे जाते. या लाकडात एक प्रकारचे सुवासिक तेल असल्याने या लाकडाला कीड लागत नाही; मात्र ते इतर लाकडांच्या मानाने बरेच महाग असते. भारतातील कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आदी राज्यांत पुष्कळ प्रकारची चांगली लाकडे मिळतात  [⟶ लाकूड; साग]. आता प्लायवुडसारख्या औद्योगिक प्रक्रियेने नैसर्गिक लाकडापासून बनविलेल्या फळ्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात.


बा
जारात मिळणारे लाकूड हे गोल छेदाचे सोट
, फळ्या,तक्ते व रिफा अशा स्वरूपांत मिळते. कोणतेही लाकडी काम करताना बाजारातून आणलेल्या लाकडाचा पृष्ठभाग चांगला सोलून साफ करावा लागतो. नंतर त्यावर रंधा मारून त्याचा दर्शनी भाग गुळगुळीत करतात व त्यामधून ठराविक लांबीचा तुकडा कापून घेतात. या तुकड्यावर भोके पाडावयाची असल्यास त्यांची जागा मापाप्रमाणे निश्चित करून तेथे खिळा मारून खूण करतात. ज्या ठिकाणी खाचा पाडावयाच्या असतील, तेथे तीक्ष्ण टोकाच्या दाभणाने किंवा खतावणीने रेघा मारून खुणा करतात. भोके पाडण्यासाठी अनेक प्रकारची छिद्रक यंत्रे असतात. खाचा पाडण्यासाठी निरनिराळ्या रुंदींच्या (२ मिमी. ते ५० मिमी.) पटाशा व हातोड्यावापरतात. अनेक प्रकारच्या कामांत निरनिराळ्या प्रकारचे जोड करावे लागतात, ते नीट आवळून स्क्रू किंवा कळकाचा पाचर बसवून पक्के करतात. काही जोडांमध्ये विशेष मजबुती आणण्यासाठी अभिलागी (चिकटविणारे पदार्थ) व सरसही भरतात.

पारंपरिक पद्घतीने लाकडी भागांची मापे घेण्यासाठी १ मी. लांबीची सरळ पट्टी किंवा १५ सेंमी. लांबीच्या चार पट्ट्या पितळी बिजागरीने जोडून तयार केलेली घडी करता येण्यासारखी ६० सेंमी. लांबीची पट्टी वापरतात. या पट्ट्या उत्तम प्रकारच्या बॉक्स जातीच्या पिवळट लाकडाच्या असतात आणि त्यावर सेंमी. व मिमी. खुणा केलेल्या असतात. चौकोनी लाकडावर लहान रेघा काढण्यासाठी व यांच्या बाजूंमधील काटकोनाची तपासणी करण्यासाठी २० सेंमी. लांबीचे पाते असलेला पोलादी गुण्या वापरतात. तिरप्या रेघा काढण्यासाठी ‘बडी’ वापरतात. वर्तुळाकार रेघ काढण्यासाठी कर्कट (कंपास) वापरतात. आता मोजकामासाठी तसेच आकृतिबंधासाठी संगणकाचाही वापर केला जातो.

इतिहास

: लाकूड जगभर सर्वत्र आढळते. त्यामुळे मानवा-साठी आवश्यक साहित्य म्हणून ते हजारो वर्षांपासून वापरात आहे. सुतारकामाची अनेक हत्यारे व तंत्रे यांना मध्ययुगानंतर परिपूर्ण रुप प्राप्त झाले आणि तेव्हापासून त्यांच्यामध्ये थोडाच बदल झालेला आहे.

 

वाश्मयुगाच्या काळात वन प्रदेशांमध्ये आदिम सुतारकामाचा विकास जलद गतीने झाला. या काळात दगडी कुऱ्हाडींमध्ये सुधारणा झाल्या. त्यामुळे प्राण्यांसाठीचे सापळे, हिमबर्फावरुन घसरत जाणाऱ्या गाडया ( हिमशकट ), लाकूड कोरुन बनविलेल्या नावा व निवारा यांसाठी लागणाऱ्या लाकडाला योग्य तो आकार देणे, या कुऱ्हाडींमुळे शक्य झाले. इ. स. पू. तीन हजार वर्षांपूर्वीच्या काळात पेट्या, पेटारे व झोपण्यासाठीच्या खाटा तयार करण्यासाठी ईजिप्तमध्ये तांब्याची हत्यारे वापरीत. नंतर दोन हजार वर्षांनी तेथे काशाची ( ब्राँझची ) हत्यारे आणि छिद्र पाडण्याचे धनुकलीने फिरवावयाचे साधन वापरात होते. ⇨तूतांखामेन याच्या थडग्यातील सुंदर व नाजुक फर्निचरवरुन ईजिप्शियनांचे त्या काळातील सुतारकामातील कौशल्य दिसून येते.

शा तऱ्हेचे कौशल्यपूर्ण फर्निचर यूरोपमध्ये प्रबोधन काळापर्यंत बनविण्यात आले नव्हते. मात्र तेथे लाकूड झोपडया, घरगुती साहित्य, प्रेतसंस्काराचे साहित्य व कुंपण तयार करण्यासाठी वापरीत.नवाश्मयुगातील माणसाने ऱ्हाइन लँड व डेन्मार्क येथे ३० मी.पेक्षा लांबलचक चौकोनी लाकडी घरे बांधली होती. लाकडी खांबांवरील किंवा तुळयांच्या चौकटींवर स्वित्झर्लंडमध्ये तथाकथित सरोवर ग्रामे ( लेक व्हिलेज ) उभारली होती. त्यांवरुन तेव्हा सुतारकामाची कला अस्तित्वात होती, हे दिसून येते. रोमन लोकांनी इंग्लंड जिंकण्याआधी तेथील सुतार आधुनिक आकारांचे लोखंडी वाकस (तासणी), करवती, आरी, रंधण्याची हत्यारे, सुऱ्या व कानशी वापरीत होते आणि खांबावरच्या लेथवर लाकडी कातकाम करीत असत.

ध्ययुगामध्ये बहुतेक सुतारकामांना विशेषीकृत स्वरूप प्राप्त झाले होते. उदा., जहाजे,रथ, गिरण्या, गाड्या बांधणारे व दुरुस्त करणारे सुतार; तसेच कातकाम करणारे व पिपे बनविणारे वगैरे. सर्व प्रकारची सामान्य कामे करणारे सर्वसाधारण सुतार बहुतेक खेड्यांत व जमीनदारांच्या वस्तीवर असत. सुतार अधिक मोठ्या शहरांत एकत्र आले होते. उदा., तेराव्या शतकात पॅरिसमध्ये सु. १०८ सुतार होते. जवळपासच्या सुतार नसलेल्या लहान खेडेगावांत आणि जेथे मोठ्या बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरते सुतार हवे असत, अशा कामांच्या ठिकाणी हे कुशल सुतार आपली हत्यारे बरोबर घेऊन जात असत.

ध्ययुगातील सुतारांकडे त्याकाळी शोधून काढलेली अनेक कार्यक्षम हत्यारे होती. उदा., भोक पाडण्याचा एक प्रकारचा सामता. प्राचीन रोमन लोकांना माहीत असलेला रंधा बाराव्या शतकामध्ये परत वापरात आला. पोलाद निर्मितीतील सुधारणांमुळे धार असलेली पोलादी हत्यारे तेव्हा वापरात आली. घडीव लोखंडाचे विविध आकारांचे खिळे किंवा कधीकधी लाकडी खिट्या वस्तूचे भाग एकत्र धरुन ठेवण्यासाठी व जोडण्यासाठी वापरीत. स्क्रू मात्र सोळाव्या शतकापर्यंत वापरात नव्हते.

त्तर यूरोपमध्ये प्रबोधन काळाआधीच्या काळातील चर्च, हवेल्या व किल्ले लाकडाचे बांधलेले होते. नंतर हळूहळू लाकडाऐवजी दगडाच्या अशा भव्य वास्तू बांधण्यात येऊ लागल्या. मात्र अशा दगडी वास्तूंमधील लाकडी तख्त, दरवाजे इत्यादींसाठी व नंतर लाकडी तावदाने तयार करून बसविण्यासाठी कुशल सुतारांची गरज असे. इंग्लंडमध्ये मोठ्या मापाची लाकडी छते उभारीत असत. त्या छपरांसाठी उंचावर वासे जोडण्याच्या प्रयुक्ती पुढे आल्या. छत उभारण्याच्या या भव्य तंत्राने वेस्टमिन्स्टर हॉलचे छत बांधताना कळस गाठला. त्यासाठी हातोड्याच्या आकृतीच्या तुळईचे (हॅमरबीम) तंत्र छतासाठी प्रथमच वापरण्यात आले. मोठ्या दगडी इमारतींत उंच भिंती, मनोरे, कमानी इ. बांधताना पहाड (परांची) उभारावे लागत. पहाड उभारण्याचे काम सुतार करीत असत.

ध्ययुगात घरे व इतर सामान्य इमारती लाकडाच्या उभारत असत. खांब व तुळया यांतील फटी भरुन काढण्यासाठी पातळ लाकूड किंवा माती व इतर द्रव्यांचे मिश्रण वापरीत. मध्ययुगात मुख्यतः पेट्या, टेबले, बाके इ. फर्निचर वापरीत. उद्योग व शेती यांतील अधिक मोठी अवजारे तसेच गलोल यंत्रे व वेढयासाठी उभारावयाचे मनोरेही सुतार तयार करीत.

प्रबोधन काळातील इमारतींच्या सौंदर्यात सुतारकामातील कलेचाही सहभाग मोठा होता. लंडनमधील सेंट पॉल्स कॅथेड्रेलचा बाहेरील घुमट आणि ऑक्सफर्डमधील शेल्डोनियन थिएटरच्या छताचा विस्तार या ⇨ सर क्रिस्टोफर रेन यांच्या लाकडी बांधकामातील सर्वोत्कृष्ट कलाकृती आहेत. न्यू इंग्लंडमधील बांधकामांतील लाकडी कामांमुळे तेथे सुतारकामाच्या व्यवसायाचा चांगलाच जम बसला होता. सुतारकामातील सुधारणांमुळे अधिक चांगली गुणवत्ता असलेले फर्निचर तयार करणाऱ्यांना मंजुषाकार सुतार असे संबोधण्यात येऊ लागले. साधी हत्यारे वापरुन इतर प्रकारचे सुतारकाम करणारी मंडळी घट्ट जोड देऊन वस्तू तयार करीत. त्यांना जोडकाम करणारे सुतार (जॉइनर) असे म्हणत.

पूर्वी इमारतीच्या बांधकामात लाकूड मोठ्या प्रमाणात वापरीत असत. आधुनिक काळात या लाकडाची जागा अधिक भक्कम व कमी ज्वलनशील पदार्थांनी (उदा., लोखंड, काँक्रीट) पुष्कळ प्रमाणात घेतली. यंत्राने तयार केलेले आयते भाग वाढत्या प्रमाणात वापरात आल्याने सुतारकामातील कारागिरीच्या कामांतही घट होत गेली उदा., १८००–१८१० या दशकात फ्रेंच-इंग्रज अभियंते सर मार्क इझॅम्बार्ड ब्रूनेल यांनी इंग्लंडमध्ये पोर्टस्मथ येथे जहाजाच्या ठोकळ्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु केले. त्यानंतर जवळजवळ तीस वर्षांनी जॉर्ज वॉशिंग्टन स्नो यांनी अमेरिकेत शिकागो येथे इमारत बांधण्याचे नवीन तंत्र सुरु केले. त्यातील विशिष्ट भाग यंत्रनिर्मित होते. यामुळे बांधकामाची अधिक स्वस्त व जलद पद्घती पुढे आली. परिणामी कुशल सुतारांचे काम कमी झाले.

प्रगत देशांत यंत्राद्वारे बनविलेले योग्य आकाराचे लाकडी तुकडे जोडून वस्तू तयार करण्याची पद्घत रुढ झाली. यात शक्तिचालित हत्यारांची भर पडल्याने कामाची गती वाढली. यामुळे दीर्घकालीन उमेदवारी व व्यापक अनुभव यांतून सुतारकामात येणाऱ्या कौशल्याची गरज उरत नसल्याने अशा तऱ्हेचे कौशल्य इतिहासजमा होत आहे. मात्र हौशी मंडळींना सुतारकामात असणारा रस टिकून राहाणारा आहे.

भारताचा इतिहास :

भारताच्या सुतारकामाचा इतिहास हा भारतीय संस्कृती इतकाच प्राचीन आहे. भारतीय उपखंडाची व्यवस्था मुख्यत: कृषी संस्कृतीशी निगडित अशी आहे. त्यामुळे या व्यवस्थेला पूरक अशी लाकडी व धातूची साधने लागत असल्याने सुतारकाम हा अतिप्राचीन व्यवसाय ठरतो. हडप्पा व मोहें-जो-दडो येथे आढळलेल्या लाकडी फाळावरुन हे लक्षात येते. मात्र फक्त कृषी साहित्य बनविण्यापुरतेच सुतारकाम मर्यादित नव्हते. तत्कालीन सुतारकामात शेती उपयुक्त औजारांखेरीज अनेक घरगुती वापराच्या लाकडाच्या वस्तू किंवा फर्निचर बनविण्याइतके ते प्रगत होते. तसेच बैलगाडी, रथ आदी अतिमहत्त्वपूर्ण वाहने बनविण्याचे काम सुतारकामात समाविष्ट असल्याने सदर काम करणाऱ्या कारागीर व तंत्रज्ञांचे राजव्यवस्थेतील स्थान फार उच्च दर्जाचे होते.

 

प्राचीन काळापासूनच भारतात जंगलांची पर्यायाने लाकडांची मुबलकता असल्याने, सुतारकामास चांगलाच वाव मिळाला. मऊ,कठिण तसेच विविध पोतांच्या लाकडांच्या उपलब्धतेमुळे सुतारकामाद्वारे बनलेल्या साधनांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली. मात्र लाकूड हे नाशवंत असल्याने अनेक कामे कालौघात नष्ट झाली. असे असले तरी शिल्पचित्रादी कला निर्मितीसंबंधी ग्रंथांतून वा पुरावशेषांवरुन प्राचीन लाकडी सुतारकामाचे काही संदर्भ लक्षात येतात. ऋग्वेदा दी वेदवाङ्‌मयातील सूत्रधार (सुतार), तष्ट्ट (सुतार),कारु (कारागीर), तक्षण, तक्षक वा तक्षा (सुतार) वा पतंजलीच्या वार्धिकी (सुतार) यांसारख्या लाकूडकामाशी संबंधित संज्ञांवरुन सुतारकामाची प्राचीनता सूचित होते. याबाबतचे संदर्भ पुढील प्राचीन वाङ्‌मयातून सापडतात. ऋग्वेदा दी वेदवाङ्‌मय, रामायण,महाभारत, पुराणे, पतंजलीचे योगसूत्र, कौटिल्याचे अर्थशास्त्र, वात्सायनाचे कामसूत्र, राजा भोजदेवलिखित समरांगणसूत्राधार व युक्तिकल्पतरु, चालुक्यवंशीय सोमेश्वराचा मानसोल्लास आदी. तसेच अजिंठा-वेरुळ येथील लेणी, खजुराहो मंदिर समूह, कोणार्क येथील सूर्यमंदिराच्या शिल्पांतून व पुरातत्त्वीय उत्खननांद्वारे उपलब्ध झालेल्या अवशेषांतून प्राचीन भारतीय सुतारकामाचे स्वरूप ज्ञात होते.

जिंठा येथील लेण्यांमधील चित्रांमधून तत्कालीन सुतारकाम करणाऱ्या कारागिरांचे कौशल्य लक्षात येते व सुतारकामाचा उच्च दर्जाचा झालेला विकासही पाहता येतो. किल्ले, राजवाडे तसेच सर्व प्रकारची नागरी वास्तुकला वगैरे काम लाकडापासून बनवीत असल्याचे दिसून येते. सुतारकामातील सौंदर्य, रेखीवपणा, सजावट आणि उच्च दर्जाचे कौशल्य लेण्यांतील चित्रांतून व काही कोरीव शिल्पकामांतून दिसून येते.

मीगॅस्थिनीझने पाटलिपुत्र येथील लाकूडकाम व सुतारकामाचे वर्णन केलेले आहे. हे शहर संपूर्ण लाकडी भिंतींनी वेढलेले होते व त्यांत बाण मारण्यासाठी भोके पाडलेली होती. उत्खननातून मिळालेल्या अवशेषातून याच्या भव्यतेची कल्पना येते. दक्षिण भारतात असलेल्या चैत्यगृहांच्या सूक्ष्म निरीक्षणातून असे लक्षात येते, की दगडी वास्तुकाम व शिल्पकाम, फर्निचर आदी लाकडी कामातूनच उत्क्रांत झालेले आहे.

सुतारकाम ही कला दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याने कालमाना-नुसार तीतही बदल होत गेले. देशातील राजकीय सत्ताधाऱ्यांचा देखील प्रभाव या कलेवर पडत होता. भारतातील प्रदीर्घ मुस्लिम राजवटींच्या काळात तसेच नंतर ब्रिटिश आमदनीत सुतारकामातील शैलीत वैशिष्ट्यपूर्ण बदल झाले. विशेषत: ब्रिटिश काळात निर्मित झालेल्या लाकडी कामांत सर्वत्र एकसारखेपणा येऊन समान अभिरुची निर्माण झाली.

भारतातील सुतारकामात कारागीर परंपरेने चालत आलेल्या औजारांनी अद्यापही काम करतात. त्यांतील त्यांचे कौशल्य घरगुती वापरापुरत्या बनविण्याच्या वस्तूंपुरतेच मर्यादित नसून चौकटी, तावदाने, खांब, दरवाजे, खिडक्या किंवा संपूर्ण घर ते तयार करु शकतात. सुमारे २०० ते ३०० वर्षांपासून वापरात असलेल्या तुळया आजही सतत वजन झेलूनसुद्घा आहे तशाच स्थितीत अवशिष्ट आहेत. त्याकाळी लाकूड संरक्षणासाठी बेलफळाचे तेल चोळण्यासारख्या अतिशय साध्या पद्घती वापरल्या जात. लाकूड वापरण्याआधी दिर्घकाळ टिकाऊ होण्याकरिता, ते आधी बराच काळ पाण्यात भिजवून ठेऊन, राबवून वापरात आणले जात असे.

सुतारकामासाठी साग, शिसव, देवदार, एबोनी, रेडवुड, रोजवुड, सीडार, साल, चंदन आदी वृक्षांचे लाकूड वापरले जात असे. री संपूर्ण भारतभर सुतारकाम होत असले तरी राजस्थान, गुजरात, काश्मीर, होशियारपूर ( पंजाब ), सहारनपूर ( उत्तर प्रदेश ), म्हैसूर (कर्नाटक) व केरळ हे सुतारकामासाठी विशेष प्रसिद्घ आहेत. हाराष्ट्रातील पुणे येथील विश्रामबागवाडा तेथील लाकडी कामासाठी प्रसिद्घ आहे. तेथे सुरु व सागाच्या लाकडांचा वापर विशेषेकरून केला आहे.

कालानुरुप सुतारकामात व त्याच्या स्वरूपात बदल झाला आहे. विद्यमान सुतारकामात सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे अंतर्गत सजावट ( इंटेरिअर डेकोरेशन ) हा होय. सुतारकामाचे पूर्णपणे आधुनिकीकरण झालेले असून लाकडाव्यतिरिक्त अन्य माध्यमांत ( उदा., फायबर, प्लास्टिक इ. ) सुतारकाम केले जाते. आधुनिक जीवनशैलीत गृहसजावटीला पर्यायाने सुतारकाम व्यवसायाला पूर्वी इतकेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

संदर्भ : 1. Ball, John E. Carpenters and Builders Library, 1983.

2. Capostosto, John, Basic Carpentry, 1982

3. C.S.I.R. The Welth of India, Industrial Products , Part II, Delhi, 1951 .

4. Feire , John L.: Hutchings, Gilber, Guide to Residential Carpentry, 1983

5. Hayward , C. H. Complete Book of Woodwork, 1961 .

6. Majumdar , A. K.; Majumdar, R. C.; Munshi, K. M.; Pusalkar, A. D., Ed. The Classical Age, Bombay, 1970 .

7. Reed, Mortimer P. Residential Carpentry , 1987 .

गोखलेश्री. पु. सुतारकाम पुणे१९६४.

 

ओकवा. रा.ठाकूरअ. ना.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)

 


अंतिम सुधारित : 5/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate