नुकसान भरुन निघेल का ?
एकदा पाखरांमुळे धान्याचे उत्पादन घटल्याचे समजून चीनने पाखरे मारण्याचा आदेश काढला. जादा पाखरे मारण्यासाठी बक्षीसही लावले. त्यानुसार ७० ते ८० टक्के पाखरे मारण्यात आली. दुसर्या वर्षी धान्य उत्पादन तपासताना ते मागच्या वर्षीपेक्षा निम्म्यावर आल्याचे निदर्शनास आले. पाखरे मारुनही उत्पादन का घटले याचा शोध घेता असे लक्षात आले की जितके धान्य पाखरांमुळे कमी होत होते त्यापेक्षा जादा धान्य कीड, रोगाला बळी पडले. पाखरे किड्यांचा बंदोबस्त करीत असत. त्यामुळे सरकारने पुन्हा पाखरे पाळण्याचे आवाहन करुन त्यासाठी बक्षीसही ठेवले.
आपल्याकडे शिक्षण क्षेत्रात केले जाणारे बदल, घेतले जाणारे निर्णय याच प्रकारचे असतात. परीक्षेत आलेल्या अपयशामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करु लागले असा अर्थ काढून आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा आणि त्यापुढच्या परीक्षा पातळ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. त्यामुळे दहावी-बारावीचे निकाल नव्वदीपार गेले असल्याचे लक्षात येताच पाचवी व सातवीच्या परीक्षा पुन्हा सुरु करण्याचे घाटत आहे. काही वर्षांत सर्वच वर्गांच्या परीक्षा अनिवार्य होतीलही, कुणी सांगावे ?
पहिलीपासून इंग्रजी, सेमीइंग्रजी सुरु केल्यामुळे इंग्रजी, गणित व विज्ञान सुधारले तर नाहीच, उलट दहावी-बारावीत नव्वदीपार पोहोचलेल्या विद्यार्थ्याला एक वाक्य शुद्ध मराठीत लिहिता-बोलता येत नसल्याचे ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी याही निर्णयाचा फेरविचार होईल. परंतु तोपर्यंत किती नुकसान झालेले असेल ? ते भरुन निघेल का ? बालकाच्या सुदृढ प्रकृतीसाठी मातेच्या दुधाला पर्याय नसतो तसे त्याच्यातून संपूर्ण माणूस घडविण्यासाठी किमान प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर तरी मातृभाषेला पर्याय नसतो. पण लक्षात कोण घेतो ?
सोमनाथ देविदास देशमाने,
अहमदनगर.
अंतिम सुधारित : 6/5/2020