অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माँटेसरी शिक्षण पद्धती

शालेयपूर्व वयातील मुलांच्या शिक्षणाची पद्धती.

मारिया माँटेसरी (१८७०-१९५२) हिने वरील शिक्षण पद्धतीचा पाया घातल्याने तिचेच नाव या शिक्षण पद्धतीस देण्यात आले. माँटेसरीने अविश्रांत परिश्रम करून इटली मधील झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी ही पद्धत शोधून काढली. घरामधील विस्कळीत व शिक्षणास प्रतिकूल वातावरण बघून माँटेसरीचे असे मत झाले, की मुलांना यशस्वी शिक्षण देण्यास सुनियंत्रित व शिस्तबद्ध वातावरणाची गरज भासते. अशा प्रकारचे वातावरण शाळा निर्माण करू शकतात. त्यासाठी माँटेसरीने संवेदनक्षमता विकसित करणारे साहित्य तयार केले आणि अध्ययन –अध्यापनाची नवीन उपपत्ती मांडली. आज जगभर ही एक यशस्वी पद्धत म्हणून ओळखली जाते.

माँटेसरी अध्यापनाचे वैशिष्ट्ये म्हणजे शाळेच्या वर्गातील नियोजनपूर्ण वातावरण. वर्गातील टापटीप, स्वच्छता आणि सुस्थिरता ह्या अतिशय महत्वाच्या बाबी आहेत. वर्गातील फर्निचरच्या आकारापासून ते त्याच्या रचनेपर्यंत प्रत्येक गोष्ट लहान मूल लक्षात घेऊन आखण्यात यावी. वर्गामध्ये मुलांच्या हालचालींना स्वातंत्र्य असावे. मुलांनी शिस्तीने वागून साहित्याचा योग्य वापर करावा हे साहित्य योग्य रीत्या हाताळून त्याची मोडतोड होऊ नये, म्हणून मुलांना यासंबंधी पाठ देण्यात यावेत इ. गोष्टी माँटेसरी शिक्षण पद्धतीत महत्वाच्या आहेत.

माँटेसरी पद्धतीमध्ये वेदक (सेन्सिटिव्ह) आणि कारक (ऑपरेटिंग) अध्ययनासोबत सर्वसाधारण ज्ञानात्मक आणि सामाजिक कौशल्ये प्राप्त होतील, यावरही भर असतो. या सर्वांचा परस्परसंबंध असतो. वाचन व लेखनादी बौद्धिक कार्यासाठी बालकांना वेदक व कारक कौशल्ये संपादन करता यावीत, असे माँटेसरीस वाटले. तिने पुठ्ठ्यांपासून विविध आकारांची अक्षरे तयार केली आणि त्यांच्या आधाराने चार वर्षाच्या बालकांना शिकविण्यास सुरूवात केली. एखादे अक्षर देऊन त्याचे नाव सांगायचे आणि मुलांना तेच नाव पुन्हा उचलावयास सांगायचे. पुठ्ट्यावर वाळूच्या कागदांनी काढलेली अक्षरे चिकटवायची. बालकांनी त्या अक्षरांवर बोट फिरवायचे व तोंडाने त्यांच्या उच्चार करायचा. अक्षराचा आकार, उच्चारणी ओळख व लेखन करण्याची हाताची तयारी या गोष्टी सिद्ध झाल्या. म्हणजे बालक आपोआप लिहू लागते. वाचन शिकविण्यासाठी वस्तू व त्या वस्तूंची नावे यांचा उपयोग करतात. बालकाने पुठ्ट्यावरील शब्द वाचायचा व अर्थबोध होताच तो पुठ्ठा त्या वस्तूजवळ ठेवायचा. असाच उपयोग पट्टीवर लिहिलेल्या वाक्यांचा करतात. ही वाक्ये ‘उजवा डोळा दाखव’ अशा तऱ्हेची असतात. बालकाने वाचावयाचे व सूचनेप्रमाणे कृती करावयाची. या पद्धतीच्या आधाराने चार वर्षाची लहान मुले दीड महिन्यातच वाचावयास व लिहावयास शिकल्याचे माँटेसरीस दिसून आले.

शालेयपूर्व वयाच्या मुलांना नवे शब्द शिकण्याची खूप उत्सुकता असते. त्यांना पुरेशी समजही असते. शास्त्रीय व तांत्रिक गोष्टीही मुले शिकू शकतात. घरचे वातावरण, त्याच्याशी संबंधित असलेले शब्द आणि वस्तू यांच्या विचार केल्यास मुले भाषा लवकर शिकतात. शालेयपूर्व वयातील मुलांचे भिन्न वर्ग करून नयेत. सर्व मुले एकाच वर्गात ठेवावीत. त्यामुळे मोठ्यांचे पाहून लहान मुले अनुकरणाने शिकतात व लहान मुलांना शिकविण्याची मोठ्या मुलांना संधी मिळते व वर्गातील वातावरण मनोरंजक होते. या सर्वाचा माँटेसरीस प्रत्यय आला व तिने लेखन, वाचन व गणन आनंददायक पद्धतीने व त्वरित शिकविण्यात यश मिळविले. त्यामुळेच या पद्धतीचा विशेष प्रचार झाला.

प्रसार व मूल्यमापन

यूरोप व अमेरिकेत माँटेसरी शाळांचा झपाट्याने प्रसार झाला. त्यासोबतच प्रतिकूल प्रतिक्रियाही प्रगट झाली. माँटेसरीची इंद्रिय शिक्षणाची कल्पना ज्ञानसंक्रमणावर आधारलेली असल्याने त्याज्य ठरली. मुलांना घाईने लेखन वाचन शिकविण्याची योजना परिगणनाच्या (एन्युमिरेशन) तत्वास बाधक ठरली. पण माँटेसरीने बालकांच्या शिक्षणांकडे बघण्याची नवी शास्त्रीय दृष्टी दिली, ही गोष्ट सर्वसामान्य झाली.

अमेरिकेत ⇨बालोद्यान पद्धतीचे वर्चस्व असून यूरोपातील काही देशांत माँटेसरी पद्धत चालू आहे. भारतात

गिजुभाई बधेका यांच्या प्रचाराने व १९३९ पासून माँटेसरीच्या प्रभावाने ही पद्धत लोकप्रिय झाली. शासकीय मदत लाभल्याने याच पद्धतीच्या शाळांचा भारतातही खेडोपाडी बराच प्रचार झाल्याचे आढळते.

------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate