অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतीय ज्ञानपीठ

प्रसिद्ध उद्योगपती स्वर्गीय साहू शांतिप्रसाद जैन यांनी १८ फेब्रुवारी १९४४ रोजी वाराणसी येथे स्थापन केलेली आणि भारतीय साहित्य-संस्कृतीच्या अभिवृद्धयर्थ कार्य करणारी प्रख्यात संस्था. शांतिप्रसादांच्या सुविद्य पत्‍नी स्व. श्रीमती रमा जैन ह्या संस्थेच्या स्थापनेपासून १९७५ पर्यंत अध्यक्षा होत्या.

वाराणसी येथे १९४४ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या अधिवेशनानिमित्त अनेक विद्वान एकत्र जमले होते. त्यांनी शांतिप्रसादांना देशात भारविद्येच्या विविध शांखांतील सखोल संशोधनासाठी तसेच प्राचीन ग्रंथ संपादून प्रकाशित करण्यासाठी विविध योजना आखून कार्य करीत राहणारी एखादी संस्था असण्याची नितान्त गरज असल्याचे सांगितले. ही गरज लक्षात घेऊन शांतिप्रसादांनी 'भारतीय ज्ञानपीठ' ही विश्वस्त संस्था स्थापन केली. स्थापनेच्या वेळी शांतिप्रसादांनी म्हटले, की 'दुर्मिळ प्राचीन भारतीय ग्रंथांचे संशोधन, संपादन व प्रकाशन करणे तसेच सद्यकालीन भारतीय भाषांतील मौलिक सार्वजनिक वाङ्‍मयास लोकोदयासाठी उत्तेजन देणे ह्या हेतूने भारतीय ज्ञानपीठाची स्थापना केली आहे.

भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते

पुरस्कारानुक्रम

वर्ष

साहित्यिकाचे नाव

पुरस्कारप्रात ग्रंथाचे नाव व प्रकार

भाषा

कालखंडातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ

१९६५

जी. शंकर कुरूप

ओतक्‍कुळल् -काव्य

मलयाळम्

१९२० - ५८

१९६६

ताराशंकर बंदोपाध्याय

गणदेवता-कादंबरी

बंगाली

१९२५ - ५९

१९६७

के. व्ही. पुट्टप्प- 'कुर्वेपु'

श्रीरामायणदर्शनम्-महाकाव्य

कन्नड

१९३६ - ६०

 

 

आणि उमाशंकर जोशी

निशीथ- काव्यग्रंथ

गुजराती

१९३६ - ६०

१९६८

सुमित्रानंदन पंत

चिंदबरा-काव्यसंग्रह

हिंदी

१९४५ - ६१

१९६९

फिराक गोरखपुरी

गुले नग्मा-काव्यसंग्रह

उर्दू

१९५० - ६२

१९७०

विश्वनाथ सत्यनारायण

रामायणकल्पवृक्षमु -महाकाव्य

तेलुगू

१९५५ - ६३

१९७१

विष्णू दे

स्मृतिसत्ता भविष्यत् - काव्यसंग्रह

बंगाली

१९६० - ६४

१९७२

रामधारीसिंह- 'दिनकर'

उर्वशी - महाकाव्य

हिंदी

१९६१ - ६५

१९७३

द. रा. बेंद्रे आणि

नाकु तंती- काव्यसंग्रह

कन्नड

१९६२ - ६६

 

 

गोपीनाथ महांती

माती - मातल - कादंबरी

ओडिया

१९६२ - ६६

१०

१९७४

वि. स. खांडेकर

ययाति - कादंबरी

मराठी

१९५८ - ६७

११

१९७५

पेरुंगळूर वैद्यलिंगम्

चित्तिरप्पावै - कादंबरी

तमिळ

१९५९ - ६८

 

 

अखिलांडम् - 'अकिलन'

 

 

 

१२

१९७६

आशापूर्णा देवी

प्रथम प्रतिश्रुति - कादंबरी

बंगाली

१९६० - ६९

१३

१९७७

कोट शिवराम कारंत

मूक्‍कज्‍जिय कनसुगळू - कादंबरी

कन्नड

१९६१ - ७०

१४

१९७८

सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन - 'अज्ञेय'

कितनी नावो में कितनी बार - काव्यसंग्रह

हिंदी

१९६२ - ७१

१५

१९७९

बीरेंद्रकुमार भट्टाचार्य

मृत्युंजय - कादंबरी

असमिया

१९६३ - ७२

१६

१९८०

एस्. के. पोट्टेकट्ट

ओरू देशातीनटे कथा - कादंबरी

मलयाळम्

१९६४ - ७३

१७

१९८१

अमृता प्रीतम

कागज ते कॅनव्हास - काव्यसंग्रह

पंजाबी

१९६५ - ७४

१८

१९८२

महादेवी वर्मा

यामा - काव्यसंकलन

हिंदी

- -

कार्य व विविध योजना

ज्ञानपीठाच्या कार्यविकासाचे चार प्रमुख टप्पे दिसून येतात : (१) पहिल्या टप्प्यात 'मूर्तिदेवी ग्रंथमाले'ची योजना आखून भारतविद्येतील प्राचीन ग्रंथांचे-विशेषतः जैन आचार्यांच्या-संशोधन, संपादन व प्रकाशन हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. हे ग्रंथ संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, प्राचीन कन्नड व तमिळ भाषेतील होते. मूलतः नाथुराम प्रेमींनी मुंबई येथे सुरू केलेल्या 'माणिकचंद्र ग्रंथमाले'चेही पुनरूज्‍जीवन करून ती तडीस नेणे याचाही अंतर्भाव या टप्प्यात होता. (२) दुसऱ्या टप्प्यात 'लोकोदयग्रंथमाले' चा विकास करण्यात आला. मान्यवर आधुनिक भारतीय लेखकांच्या सर्जनशील ग्रंथांचे प्रकाशन करणे तसेच नवोदित होतकरू लेखकांना उत्तेजन देऊन त्यांच्याही ग्रंथांचे प्रकाशन या टप्प्यात करण्यात आले. (३) तिसऱ्या टप्प्यात विशिष्ट कालखंडात निर्माण झालेल्या पंधरा भारतीय भाषांतील एका उत्कृष्ट सर्जनशील ग्रंथाची दरवर्षी निवड करण्यात येऊन त्याला एक लाख रूपयांचा (१९८२ पासून दीड लाख) पुरस्कार देण्याची योजना कार्यवाहीत आली. (४) चौथ्या टप्प्यात पुराभिलेख व पुरातत्त्वीय सर्वेक्षण व संवर्धनाची योजना हाती घेण्यात आली; तसेच जैनांनी निर्माण केलेल्या कलावस्तूंचा व ग्रंथांचा सखोल अभ्यास व संशोधन करण्याच्या योजना आखण्यात आल्या. चौथ्या टप्प्यातच (अ) संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषांत उपलब्ध असलेल्या भगवान महावीरांच्या सर्व काव्यत्मक चरित्रांचे संपादन व प्रकाशन करणे, (आ) 'जैन आर्ट अँड आर्किटेक्चर' या विषयावरील अधिकृत ग्रंथ तयार करून त्याचे प्रकाशन करणे आणि (इ) जैन पुरातत्त्वीय कलावस्तूंच्या छायाचित्रांचे संकलन व संग्रह करणे या योजनांचाही अंतर्भाव होता.

या विविध योजनांखाली भारतीय ज्ञानपीठाने आजवर सु. सहाशे ग्रंथ प्रसिद्ध केले असून ते संस्कृत, प्राकृत, पाली, अपभ्रंश, हिंदी, तमिळ, कन्नड, उर्दू, इग्रंजी इ. भाषांत आहेत.

भारतीय पुरातत्त्वीय संशोधन योजनेद्वारा जैन कलेचे सर्वेक्षण, संशोधन व संकलन सुरू आहे. आजवर एतद्‍विषयक सु. दहा हजार छायाचित्रे जमविण्यात आलेली असून ती शास्त्रशुद्ध रीतीने संगृहीत केली आहेत. भगवान महावीरांच्या २५०० व्या निर्वाणमहोत्सवानिमित्त संस्कृत, अपभ्रंश व कन्नड भाषेतील उपलब्ध महावीर चरित्रकाव्यांच्या संपादनाची व प्रकाशनाची जबाबदारीही ज्ञानपीठाने अंगावर घेतली आहे. महावीरांचे तत्त्वज्ञान तसेच आपली सांस्कृतिक परंपरा यांवर पंचवीस ग्रंथ प्रकाशित करण्याची योजनाही आहे. जैन आर्टं अँड आर्किटेक्चर (३ खंड, १९७४-७५) हा अनेक उत्कृष्ट चित्रे-छायाचित्रे असलेला संदर्भग्रंथही प्रसिद्ध झाला आहे.

देशाच्या सर्व स्तरांतील व विविध प्रदेशांतील थोर विद्वानांचा व सर्जनशील साहित्यिकांचा हातभार या महान सांस्कृतिक-साहित्यिक कार्यास लाभत आहे. संस्थेचे सध्याचे प्रमुख कार्यालय नवी दिल्ली येथे असून वाराणसी येथे शाखा कार्यालय आहे. भारतीय ज्ञानपीठाचे संस्थापक, अध्यक्ष व इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेतः स्व. साहू शांतिप्रसाद जैन (संस्थापक); स्व. श्रीमती रमा जैन (अध्यक्षा-१९४४-७५); श्रीयांसप्रसाद जैन (विद्यमान अध्यक्ष); ए. के. जैन (व्यवस्थापक व विश्वस्त) व लक्ष्मीचंद्र जैन (संचालक).

ज्ञानपीठ पुरस्कार

भारतीय ज्ञानपीठ १९६६ पासून दरवर्षी आधुनिक भारतीय भाषांतील एका सर्वोत्कृष्ट, मौलिक व सर्जनशील ग्रंथास म्हणजे त्याच्या कर्त्यास एक लाख रूपयांचा पुरस्कार देते. १९८२ पासून पुरस्काराची रक्कम वाढवून दीड लाख रूपये करण्यात आली आहे. हा पुरस्कार भारतातील एक अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार देण्यामागील ज्ञानपीठची कल्पना अशी, की आधुनिक भारतीय भाषा अनेक असल्या, तरी त्यातील सांस्कृतिक आशय हा सारखाच आहे आणि त्यांचा आत्माही एकच-भारतीय-आहे. १९६६ मध्ये पहिला पुरस्कार (१९६५ चा) दिला गेला. आजवर विविध भारतीय भाषांतील २० प्रतिभासंपन्न लेखकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. १९८१ चा १७ वा पुरस्कार प्रख्यात पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम यांना, तर १९८२ चा १९८२ चा १८ वा पुरस्कार हिंदी कवयित्री महादेवी वर्मा यांना देण्यात आला. आजवर १८ भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेल्या साहित्यिकांची यादी मागील पानावर दिली आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेली साहित्यकृती ही अनेक परीक्षकांच्या नजरेखालून जाते व तिच्या योग्यायोग्यतेबाबत चिकित्सा होऊनच तिची पुरस्कारासाठी निवड केली जाते. प्रत्येक भाषेतील काही तज्ञ लेखक समीक्षकांची सल्लागार व परीक्षक म्हणून नियुक्ती केली जाते. पुरस्कार प्राप्त सिहित्यिकाचा ज्ञानपीठातर्फे मोठ्या समारंभपूर्वक आदसरत्कार करून एखाद्या ख्यातकीर्त नेत्याच्या वा नामांकित विद्वान व्यक्तीच्या हस्ते त्यास पुरस्काराची रक्कम व पुरस्काराचे प्रतीक असलेली, चौदा पाकळ्यांच्या कमळावर (चौदा भाषांचे प्रतीक) उभ्या असलेल्या वाग्‍देवीची ब्राँझ मूर्ती दिली जाते. वाग्‍देवीची मूळ मूर्ती धार (म. प्रदेश) येथील सरस्वती मंदिरातील असून ती राजा भोज याने १०३५ मध्ये प्रतिष्ठापित केली. सध्या ती लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात आहे. पुरस्कारप्राप्त कृतीची व तिच्या लेखकाची वैशिष्टये सांगणाऱ्या प्रशस्तिपत्रासह (सायटेशनसह) त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या समारंभानिमित्त कवितावाचन, कविसंमेलन, नृत्य, संगीत यांसारखा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला जातो.

भारतीय ज्ञानपीठाचे ज्ञानोदय हे प्रसिद्ध हिंदी मासिकपत्र असून त्यातून नवोदित होतकरू भारतीय लेखकांचे लेखन प्रसिद्ध केले जाते. ज्ञानपीठ पत्रिका हे संस्थेचे दुसरे मासिक असून त्यातून विविध भारतीय भाषांतील विद्वान लेखकांचे दर्जेदार लेखन प्रसिद्ध होते.

लेखक: भा. ग. सुर्वे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate