অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुराणकथांची निर्मिती व कार्य

पुराणकथांची निर्मिती व कार्य

विविध कारणांनी व उद्देशांनी पुराणकथा निर्माण झाल्याचे दिसते. (१) जग कोणी बनवले? सूर्य, चंद्र व तारे सदैव का फिरतात? भूकंप, ग्रहणे,  धूमकेतूंचे प्रकट होणे, वादळे, मृत्यू इ. घटना का घडतात? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्राचीन मानवांनी पुराणकथा निर्माण केल्या; विविध पदार्थांच्या अवस्था कशा अस्तित्वात आल्या याचे स्पष्टीकरण करणे, हा पुराणकथांचा एक उद्देश वा कार्य असते, असे काही पुराणकथाशास्त्रज्ञांचे मत आहे. (२) परंतु काही शास्त्रज्ञांचे मत असे आहे, की मुख्यतः आधीच निर्माण झालेल्या कर्मकाडांचे समर्थन व स्तवन करण्यासाठी पुराणकथा निर्माण झाल्या. कर्मकाडांत वर्षातून निरनिराळ्या निमित्तांनी होणारे सामाजिक उत्सव, जन्मोत्सव, नामकरण, उपनयन, विवाह, अंत्यकर्म इ.संस्कार; यज्ञ, पूजा, नवस, व्रते इत्यादींचा अंतर्भाव होतो. (३) वर्तमान समाजव्यवस्था, पवित्र मानलेल्या चालीरिती, समाजातील उच्च-नीच पदे इत्यादींचे समर्थन करणे, हाही पुराणकथांचा एक उद्देश असतो. राजे, धर्मगुरू, शामान इ. लोक अशा कथांचा उपयोग करून घेतात. (४) सर्वसामान्य मानवाला धार्मिक आचारविचारांचे, शुभाशुभ कर्मांचे किंवा नीतिअनीतीचे महत्त्व समजण्याकरिता केवळ बुद्धी व इंद्रिये यांचा उपयोग होत नाही. पुराणकथेचे त्यांचे महत्त्व मनात बिंबते. स्वर्ग व नरक, पुनर्जन्म, देव, असुर, राक्षस ,भूत, पिशाच इत्यादिकांच्या पुराणकथेतील वर्णनाने धार्मिक आचारांचे महत्त्व पटते.

पुराणकथांच्या रचनेवर परिस्थितीचा प्रभाव : आजूबाजूच्या वातावरणाचा आणि विशिष्ट प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीचा पुराणकथांच्या रचनेवर आणि स्वरूपावर प्रभाव पडतो. उदा., अरण्यात राहणार्‍या स्लाव लोकांनी अनेक अरण्यदेवता मानल्या होत्या. कृषिसंस्कृतीमधील लोकांत पाऊस, वारा, सूर्य, पीक इ. कृषीशी संबद्ध अशा घटनांच्या कथा असतात. शिकारीशी निगडित अशा पशुविषयक पूराणकथा व्याध संस्कृतीत प्रचलित सतात. पशुपालन संस्कृतीत पशुविषयक व मत्स्यव्यवसाय करणार्‍या लोकांत मत्स्यव्यविषयक कथा आढळतात. या कथा त्यांच्या सामाजिक उत्सवाच्या कर्मकांडाशी निगडित केलेल्या दिसतात. आफ्रिकन लोक काळ्या लोकांच्या उत्पत्तिविषयक कथा सांगतात. इंडोनेशिया,मेलानीशिया पॉलिनीशिया इ. समुद्रसन्निध विभागातील लोक विश्वनिर्मितीपूर्व सर्वत्र समुद्र होता, असे आपल्या पुराणकथांमध्ये सांगतात. पुराणकथा ज्या काळात व संस्कृतीच्या ज्या अवस्थेत निर्माण होतात, त्या काळाचा व अवस्थेचाही त्यांच्या रचनेवर प्रभाव पडतो.

पुराणकथा व कर्मकांड : पुराणकथा व कर्मकांड या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित असतात. किंबहुना पुराणकथेशिवाय कोणतेही कर्मकांड पूर्ण होतच नाही. पुराणकथा (मिथ) ही कर्मकांडाची फलश्रुती सांगत असते. विशिष्ट कर्मकांड चालू असताना त्याच्याशी संबंधित अशी पुराणकथा अनेक वेळा सांगितली जाते. उदा., वैदिक सोमयाग. यज्ञमंडपाकडे सोम आणण्याचे कर्म चालू असताना सोम हा स्वर्गातून कसा आला याचे वर्णन यात करतात. ख्रिस्ती लोक प्रभुभोजन (युखॅरिस्ट) धार्मिक समारंभ करतात. या कर्मकांडाचा येशू ख्रिस्ताच्या क्रूसावर झालेल्या वधाच्या कथेशी संबंध असतो. या भोजनातील ब्रेड वा भाकरी हे ख्रिस्ताचे मांस आणि द्राक्षारस हा ख्रिस्ताचे रक्त मानून त्यांचे सेवन करतात. रामकृष्णादींच्या जयंती प्रसंगी त्यांच्या जन्मकथा सांगितल्या जातात. काही पुराणकथा शास्त्रज्ञांचे असे मत आहे, की कर्मकांड हे मनुष्याच्या स्वभावधर्माशी निगडित आहे. म्हणून कर्मकांड प्रथम आणि पुराणकथा कालांतराने निर्माण होते.  वेदांत म्हटले आहे की, प्राचीन काळी देवांनी स्वर्गामध्ये जी पवित्र कृत्ये केली, त्यांचेच अनुकरण मानवी कर्मकांडामध्ये होत असते. देवाने माणसास अनुकूल अशी विश्वनिर्मिती केली आणि ती योग्य अवस्था तशीच रहावी, या उद्देशानेही वेळोवळी कर्मकांड केले जाते आणि तत्संबद्ध पुराणकथांचे निवेदनही केले जाते. उदा., ईश्वराने प्रथम पाऊस सुरू केला; तसाच पर्जन्यकाळ चालू रहावा म्हणून विशिष्ट कर्मकांड केले जाते आणि ह्या प्रसंगी ईश्वराच्या त्या कृत्याची पुराणकथा सांगितली जाते. प्रतिवर्षी विशिष्ट काळी जी धार्मिक कर्मे नियमाने केली जातात, त्यांमध्ये पूर्वीच्या अनुकूल अशा योग्य स्थितीचे नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. असे नूतनीकरण केले नाही, तर जग सामर्थ्यहीन होईल वा नष्ट होईल असे लोकांना वाटते. सर्व प्राण्यांची प्रतीकात्मक पुनर्निर्मिती करण्याचा विधीही काही जमातींमध्ये करतात व त्यामध्ये पुराणकथेचे कथन होते.

कित्येकदा कर्मकांड व पुराणकथा यांचा संबंध कालांतराने क्षीण वा नष्ट होतो. हा संबंध क्षीण वा नष्ट झाल्यानंतर कित्येकदा पुराणकथेचे कथन हेच कर्मकांड बनते. काळाच्या ओघात त्या कथेतील पावित्र्य जेव्हा उरत नाही तेव्हा ती एक रंजक कथा म्हणूनच शिल्लक राहते. कर्मकांड लुप्त झाले, तरी कित्येकदा केवळ पुराणकथाच उरलेली असते. अशा वेळी पुराणकथेवरून कर्मकांडाचे अनुमान करता येते, असे जे.जी. फ्रेझरने म्हटले आहे. काही वेळा तर कर्मकांड लुप्त होते, त्याबरोबर पुराणकथाही लुप्त होते.

पुराणकथा व कल्पनाशक्ती : तर्कशक्ती, बुद्धिवाद, वैज्ञानिक दृष्टीकोन इत्यादींच्या आधारे विश्वाचे स्पष्टीकरण जेव्हा मिळत नव्हते, तेव्हा स्वैर व बेलगाम कल्पनाशक्तीच्या द्वारे असे विश्वाचे स्पष्टीकरण करण्याचे काम पुराणकथांनी केलेले आहे. लहान मुलांमध्ये बुद्धीपेक्षा कल्पनेला अधिक स्थान असते.आदिम मानवही एक प्रकारे संस्कृतीच्या बाल्यावस्थेतच असल्यामुळे तो वैश्विक घटनांची स्पष्टीकरणे कल्पनेच्या आधारेच करीत असे आणि त्यासाठी पुराणकथा रचीत असे. अनेकदा पुराणकथा ही नेमकी कोणत्या व्यक्तीने प्रचलित केली हे माहीत नसते; परंतु ती समाजाने परंपरने मान्य केलेली असते. पुराणकथा व विज्ञान यांच्यातील कल्पनाशक्तीचे कार्य भिन्नभिन्न पद्धतीने घडत असते. तर्कशक्ती व बुद्धिवाद यांच्या द्वारेच विज्ञानाची वाढ होते. विज्ञानाच्या निर्मितीतही कल्पनाशक्तीचे साहाय्य महत्त्वाचे ठरते; परंतु विज्ञानात मानवी कल्पनाशक्ती विवेकबुद्धीने मर्यादित केलेली असते. पुराणकथेमध्ये मात्र प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेल्या अशा विवेकबुद्धीने कल्पनाशक्तीवर घातलेल्या मर्यादा नाहीशा झालेल्या असतात. स्वैर कल्पनाशक्तीवर जेव्हा पुराणकथांची निर्मिती करते तेव्हा ती अनुभवातील पदार्थ घेऊनच आपले मानसिक विश्व निर्माण करते. उदा., नेहमी पाहिलेला मानव आणि सिंह या दोन पदार्थांच्या अवास्तव मिश्रणाने नरसिंहाची पुराणकथा तयार होते. कल्पनेची प्रक्रिया समजण्यास पुराणकथेइतका दुसरा उत्तम विषय नाही, असे ई. बी. टायलरने या संदर्भात म्हटले आहे.

पुराणकथा व नीतिमूल्ये : सर्व विश्व हे जाणीव असलेल्या शक्तींनी वा मनुष्यसदृश व्यक्तींनी भरलेले आहे, अशी भावना बर्‍याच पुराणकथांच्या मुळाशी असते. अशा शक्ती व व्यक्ती म्हणजे देव, असुर, राक्षस, य़क्ष, देवदूत ग्रहनक्षत्रादिकांच्या देवता, पिशाच इ. होत. उदा., सूर्य  हाच प्रजापतिरूप देव आहे, झ्यूस हा आकाशरूप देव आहे, अरण्ये ह्या देवता आहेत, अशा कल्पना पुराणकथेत असतात. त्यांमध्ये देवदेवतांचे मानवीकरणही असते. परंतु मानवी समाजातील ठराविक नैतिक संकल्पना घेऊन त्यांच्या आधारे भौतिक पदार्थ, वनस्पती, प्राणी यांच्यासंबंधी रूपकात्मक पुराणकथा तयार होत नाहीत. उलट, मानवी नैतिक संकल्पना कमीजास्त प्रमाणावर बाजूस सारूनच त्या तयार होतात. सृष्टीत उत्पत्तिस्थितिलयांचे चक्र सुरू असते. त्यावर जननक्रिया व मृत्यूची प्रक्रिया, स्त्रीपुरुषसंबंध, मानवी नातेसंबंध इ. मानवी जीवनप्रवृत्तींचा कल्पनाशक्तीच्या द्वारे आरोप करून पुराणकथा तयार होतात. परंतु पुराणकथा तयार करणारे मन हे आरोप व सत्य यांतील फरकाचे महत्त्व मानीत नाही. कारण मानवसमाजाच्या वर्तुळाबाहेरचा विश्वप्रपंच हा पुराणकथेचा विषय असतो. म्हणून आपण रूपकात्मक भाषेत विश्वप्रपंचाची कथा सांगत आहोत, याचीही कथाकाराला स्पष्ट जाणीव नसते; असे हे पुराणकथेचे मानसशास्त्र आहे. हे लक्षात घेतले म्हणजे अत्यंत अनैतिक वर्तनाने भरलेल्या कथांचा उलगडा करता येतो. अनेकदा पुराणकथांमधून  आधुनिकांच्या नीतिकल्पनेला धक्का देणाऱ्या मनुष्यहत्या, नरमांसभक्षण, फसवणूक, व्यभिचार, अगम्य आप्तसंभोग इ. घटना आढळतात. उदा., देवांनी दानवांना फसविल्याच्या हिंदू कथा किंवा याकोबाने थोड्याशा अन्नाच्या मोबदल्यात आपला भाऊ ईसॉ याचा वारसाहक्क घेतला, ही हिब्रू कथा आज अनैतिक वाटते. ग्रीक, ईजिप्त, जपान, इस्राएल इ. कितीतरी देशांच्या पुराणकथांतून बाप व मुलगी वा भाऊ व बहीण यांच्यातील विवाहांच्या अनेक कथा आढळतात. सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी त्याची बायको झाली किंवा ग्रीकांचा प्रमुख देव झ्यूस याची बहीण हेरा ही त्याची पत्नी झाली. अगम्य आप्तसंभोगाची इतर उदाहरणे आढळतात. उदा., हिब्रू कथेनुसार ईश्वराने सडोम हे गाव नष्ट केले, तेव्हा अब्राहमच्या पुतण्या लॉट व त्याच्या दोन मुली वाचल्या. सगळे जग नष्ट  झाले, अशा समजुतीमुळे लॉटच्या मुलींनी मानवजात टिकावी, या उद्देशाने वडिलांना मद्य पाजून त्यांच्या नकळत त्यांच्याकडून पुत्रोत्पती करून घेतली आणि त्या पुत्रांपासूनच मोबाइट आणि ॲमोनाइट लोक निर्माण झाले, असे सांगितले आहे. आपला थोरला भाऊ ओसायरिस याच्यापासून आपल्याला अपत्य व्हावे, असे नेफ्थिसला वाटत होते म्हणून तिने त्याला मद्य पाजून त्याच्याशी व्यभिचार केला व मग तिला अनुबिस झाला, अशी ईजिप्ती कथा आहे. ब्राझीलमधील बोरारो लोकांच्या पुराणकथांत अगम्य आप्तसंभोग सांगितलेला दिसतो. ट्यूटॉनिक लोकांचा मुख्य देव ओडिन याची पत्नी फ्राइना हिने एक सुंदर हार मिळविण्यासाठी चार बुटक्यांशी व्यभिचार केला होता. ग्रीक देवतांचे अनैतिक आचरण पाहूनच त्यांच्या कथा मुलांना सांगू नयेत, असे प्लेटोने म्हटले आहे; परंतु या बाबतीत अनेक नीतिमूल्ये ही  सार्वत्रिक व सार्वकालिक नसतात आणि यांतील काही कथा ह्या निसर्गघटनांवरची रूपके आहेत असे मानले, तर या कथा अनैतिक आहेत असे म्हणण्यापेक्षा त्या नीतिभिन्न (एमॉरल) आहेत, असे म्हणणे शक्य आहे. यातुक्रिया, धार्मिक कर्मकांड इत्यादींशी निगडित राहून काही गूढ कार्यक्षमता व्यक्त करणे, हे पुराणकथांचे स्वरूप असते. म्हणूनच आधुनिक नीतीमूल्यांवर ठेवणार्‍या धर्मनिष्ठ माणसांनाही या कथा अनैतिक वाटत नाहीत.

याउलट, पुराणकथांतील अनेक घटनांना नैतिक आदर्श आणि मार्गदर्शक तत्त्व या दृष्टींनीही मूल्य असते. उदा., मोठे पाप करणार्‍या लोकांमुळे प्रलय होतो; परंतु मोठे पुण्य करणारे लोक असले म्हणजे जग तरते, सुखसमृद्धी होते, अशा अर्थाच्या अनेक पुराणकथा असतात. या कथांचा व त्यांतून मिळणार्‍या संदेशांचा माणसाच्या आचरणावर निश्चितच प्रभाव पडत असतो. लॉर्ड बेकनने ग्रीक पुराणकथांना नैतिक रूपककथा म्हटले आहे. त्या कथांच्या द्वारा पारलौकिक शक्तीचे अस्तित्व स्पष्टपणे जाणवण्यास मदत होते आणि त्यामुळे माणसाच्या स्वैराचाराला आपोआपच मर्यादा पडतात.

पुराणकथांचे संरक्षण सामर्थ्य : पुराणकथांचे विधिपूर्वक उच्चारण व श्रवण करणार्‍या व्यक्तींचे, सामाजिक गटांचे वा समाजांचे संकटांपासून रक्षण करण्याचे गूढ सामर्थ्य ह्या पुराणकथांमध्ये असते, असे मानले जाते. उदा., सूर्यनिर्मितीच्या पुराणकथेमुळे पुन्हा सूर्यपूर्व अंधाराची अवस्था येण्याचे संकट टळते. दीक्षा, विवाह, राज्याभिषेक इ. प्रसंगी उच्चारल्या जाणार्‍या पुराणकथांमुळे व्यक्तींचे रक्षण होते. अशा प्रसंगी पुराणकथांची पवित्र शक्ती व्यक्तीच्या वा समाजाच्या पाठीशी उभी केली नाही, तर त्यांच्यावर विविध संकटे येण्याचा धोका असतो. उदा., तरुण-तरुणी वयात येण्याच्या वेळी विधिपूर्वक पुराणकथा उच्चारल्या नाहीत, तर त्यांना नव्या लैगिंक जीवनापासून संकटे प्राप्त होतात, असे मानले जाते; आलेली संकटेही पुराणकथांमुळे दूर होतात. उदा., ईजिप्तमधील एका कथेनुसार इसिस या देवतेला रा या देवाइतके सामर्थ्य मिळवावयचे असते; त्यासाठी  त्याचे गूढ नाव कळावे आणि त्यावर ताबा मिळवावा, म्हणून तिने त्याला सर्पदंश घडविला. नंतर त्याने नाव सांगितल्यावरच तिने त्याचे विष उतरविले. ही कथा सांगणे अथवा कापडावर लिहून गळ्यात बांधणे, हा ईजिप्तमध्ये सर्पविषावरचा उतारा मानला जात असे. अशा प्रकारच्या इतर अनेक कथाही ईजिप्तमध्ये रूढ होत्या. होरसची कथा विंचू व साप यांच्या दंशावरचा उपाय म्हणून सांगितली जात असे. आस्तिक ऋषीचे  नाव उच्चारल्यामुळे सापांपासून संरक्षण मिळते, असे हिंदू मानतात. साप, अग्नी इत्यादींवर  पुराणकथांमुळे नियंत्रण ठेवता येते. युद्ध, जन्म, मृत्यू, विवाह, दीक्षा इ. महत्त्वाच्या प्रसंगी पुराणकथांचे पठण हे संरक्षक म्हणून उपयोगी पडते, असे मानले जाते.

पुराणकथा व अद्‌भूतता : पुराणकथांतून ‘ईश्वराने शून्यातून सृष्टी निर्मिली’, ‘नारायण ऋषीच्या मांडीपासून उर्वशी जन्मली’ वा ‘गांधारीला १०१ अपत्ये झाली’ यांसारख्या अलौकिक, अद्‌भूत व अविश्वासार्हता घटना आढळतात. अयोनिज जन्म, पशुपक्ष्यांचे संभाषण, मानवांचा मानवेतर पदार्थ व प्राणी यांच्याशी विवाह व समागम, स्त्रीच्या अंड्यातून पक्ष्याचा जन्म, समुद्रप्राशन, समागमानंतरही स्त्रीचे अखंडित कौमार्य, तारुण्य व वार्धक्य यांची देवाणघेवाण, अनेक हात व मस्तके असणे इ. असंख्य घटना या प्रकारात मोडतात. सर्वसामान्य व्यवहारात अनुभवाला येणारे कार्यकारणभावाचे नियम या घटनांना मुळीच लागू पडत नाहीत.विज्ञानाधिष्ठित नियमांच्या आधारे अशा घटनांचे समर्थन करता येत नाही. बहुतेक वेळा या घटना मानवी अनुभवांच्या विरुद्धच असतात; परंतु धर्म व कर्मकांड त्यांच्याशी निगडित असल्यामुळे सश्रद्ध माणसांकडून त्यांच्या  सत्यतेविषयी शंका व्यक्त केली जात नाही.

अशा अद्‌भूत घटनांमध्ये मृताने पुन्हा जिवंत होणे, वृद्धाने तरुण होणे, मर्त्य व्यक्तींना अमरत्व लाभणे, कल्पवृक्षादींमुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होणे, अंगी प्रचंड सामर्थ्य असणे इ. घटनांचा समावेश असतो. या घटनांची वर्णने अतिशयोक्तीने भरलेली असतात. वस्तुतः मानवाच्या इंद्रियगम्य दैनंदिन जीवनात अशा घटना घडत नसतात. परंतु फ्रँझ बोऑसने म्हटल्याप्रमाणे अशा घटना घडाव्यात , ही माणसाची मनोमन इच्छा असते. कल्पनेच्या साहाय्याने पुराणकथा या इच्छेलाच साकार करण्याचे काम करीत असते. शाप, वर, आशीर्वाद इ. गोष्टी म्हणजे मानवाचे मनातील वासनांतून निर्माण केलेल्या पुराणकथाच होत. प्राचीन मानवाच्या मनात कोणत्या आशाआकांक्षा होत्या आणि मानवी मन कोणकोणत्या अवस्थांतून प्रवास करीत होते, हे या पुराणकथांवरून उत्तम रीतीने कळू शकते.

पुराणकथा, जडप्राणवाद व मानवीकरण : जड वस्तूंनाही प्राण (जीव) असतो, या समजुतीने त्या वस्तूंचे मानवीकरण करण्याची प्रवृत्ती, हे दैनंदिन जीवनातील घटनांचे पुराणकथांत रूपांतर करण्यामागचे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे, असे ई. बी. टायलरने मानले आहे. त्यामुळेच वृक्षपाषाणादी निर्जीव वस्तूंकडून इजा झाल्यास त्या वस्तूंवर सूड घेण्याची पद्धत अनेक ठिकाणी दिसते, असे तो म्हणतो. सूर्य, चंद्र, पर्वत, नद्या इत्यादींना देवता मानण्यामागे जडप्राणवाद व मानवीकरण या प्रवृत्तीच असतात. सामान्यतः निसर्गातील असाधारण पदार्थांचे मानवीकरण करण्याची प्रवृत्ती आढळते. देवांच्या आचारविचारांमध्ये मानवी व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब दिसते.म्हणूनच झीनॉफनीझने असे म्हटले होते, की घोड्याने देवांची चित्रे काढली असती, तर ती घोड्यांसारखीच काढली असती.

पुराणकथांची प्रतीकात्मकता : पुराणकथा ही रूपककथा असते, ती चित्रभाषा असते आणि तिच्यामधून काही तरी गूढ सत्य व्यक्त केले जाते, म्हणजेच तिच्यात चित्रात्मकता वा प्रतीकात्मकता असते, असे माक्स म्यूलरप्रभृती मानतात. बहुतेक पुराणकथा या निसर्गघटनांवरची रूपके आहेत, हा माक्स म्यूलरचा एक महत्त्वाचा सिद्धांत होता. या बाबतीत, सर्व पुराणकथा ह्या सूर्यावरची रूपके आहेत, ती चंद्रावरची रूपके आहेत, ती वनस्पती व पशू यांच्या विकासक्रमावरची रूपके आहेत इ. प्रकारची मतेही आढळतात. वृत्र म्हणजे पाणी अडवून ठेवणारा मेघ, इंद्र म्हणजे झंझावात आणि वज्र म्हणजे वीज, असे इंद्रवृत्रकथेमध्ये रूपक आहे, असे काहीजण मानतात. वृत्र म्हणजे हिवाळा आणि इंद्र म्हणजे वासंतिक सूर्य, वृत्र म्हणजे अंधार व इंद्र म्हणजे सूर्य, अश्विनीकुमार म्हणजे स्वर्ग व पृथ्वी, दिवस व रात्र किंवा सूर्य व चंद्र इ. प्रकारे या कथांतून रूपकात्मकता असल्याचे  सांगिततले जाते. ग्रीकांचा अग्निदेव हीफेस्टस याचे लंगडेपण म्हणजे विजेचे नागमोडी रूप असे मानले जाते, बी. मॅलिनोस्कीला मात्र हे मत असमाधानकारक वाटते.  काही पुराणकथांतून प्रतीकात्मकता असते आणि काहींतून नसते, या दृष्टीने दोन्ही मतांतून आंशिक सत्य आहे, असे म्हणता येते. विविध धार्मिक प्रतीके पुराणकथांतून घेतलेली असतात, या दृष्टीनेही पुराणकथांचा प्रतीकात्मकतेशी संबंध असतो. पुराणकथांचे स्वरूप प्रतीकात्मक मानल्यामुळे एरव्ही त्या कथांतून आढळणारी विसंगती व अनैतिकता नाहीशी होते. उदा., रावणाला दहा मुखे होती, हे रावणाचे हेर सर्व दिशांनी संचार करीत होते,  या तथ्यावरचे रूपक मानले, म्हणजे दशमुखत्वाची शरीररचनेशी येणारी विसंगती दूर होते. प्रजापतीला आपल्याच कन्येचा मोह पडला, या गोष्टीचे स्पष्टीकरण प्रजापती म्हणजे सूर्य आणि सरस्वती म्हणजे उषा मानून केले, म्हणजे या कथेतील अनैतिकता नष्ट होते. तसेच इंद्र हा सूर्य,गौतम हा चंद्र व अहल्या ही रात्र अशी प्रतीके घेतली असता, इंद्राने अहल्येशी व्यभिचार केला, या कथेतील अनैतिकता दूर होते. काव्य व पुराणकथा यांतील प्रतीकात्मकतेत काही बाबतींत भिन्नता असते. कवी एखाद्या पदार्थाला दुसर्‍या पदार्थाचे प्रतीक मानतो, तेव्हा त्याला दोन्ही पदार्थांच्या भिन्न स्वरूपाची जाणीव असते आणि तो त्याच्यांतील भिन्नता लपविण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु पुराणकथेत मात्र अशी जाणीव असतेच, असे नाही. मूळ पदार्थाचे वास्तव स्वरूप ध्यानात आलेले नसल्यामुळे त्या पदार्थाच्या स्वरूपात प्रतीक म्हणून मानलेल्या दुसर्‍या पदार्थाच्या स्वरूपाचे खरोखरच दर्शन घडणे, हे पुराणकथेतील प्रतीकांचे स्वरूप असते. म्हणूनच, पुराणकथेतील एखादी देवता ही कोणत्या मूळ पदार्थाचे प्रतीक आहे, हे स्पष्ट करताना अभ्यासकांत मतभेद होतात.

पुराणकथांतून अनेकदा इंद्रधनुष्य हा पूल, धनुष्य वा शिडी आहे, अशा अर्थांच्या उपमा आढळतात. मुका व बहिरा मनुष्यही आपल्या शब्दहीन विचारात अशा उपमा करू शकतो, म्हणून त्याच्यातही पुराणकथानिर्मितीची प्रवृत्ती आढळते, असे ई. बी. टायलरने म्हटले आहे. संस्कृतीच्या प्राथमिक अवस्थेत अशाच शब्दहीन परंतु इंद्रियगम्य उपमांनी पुराणकथा बनत असत. संस्कृतीच्या प्रगत अवस्थेत पुराणकथांतून शब्दबद्ध रूपके आढळू लागली, असे मत आहे.

पुराणकथांतील परिवर्तने : पुराणकथा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे मौखिक परंपरने संक्रांत होत असताना किंवा एका देशातून दुसर्‍या देशात जात असताना तिच्यात क्रमाक्रमाने बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळेच एकाच कथेची अनेक रूपांतरे आढळतात. पुराणकथेत झालेले हे बदल बहुधा नकळत घडलेले असतात, ते जाणीवपूर्वक किंवा हेतूपुरस्पर केलेले नसतात. कारण, काही पुराणकथांतील घटना हे मानवापुढे अनुकरणीय असे पूर्वोदाहरण आहे, अशी समजूत असल्यामुळे ती कथा जशीच्या तशी जपण्याचे शक्य तितके प्रयत्न केले जातात; परंतु इतके असूनही काळाच्या ओघात अशा कथांतून बदल होणे, हे अटळच असते. शिवाय, कधीकधी पुरोहित, भाट, शामान इ. लोक विशिष्ट हेतूंनी पुराणकथांमध्ये जाणीवपूर्वक बदल करतानाही आढळतात. असामान्य अशी सर्जनशील प्रतिभा असलेल्या व्यक्तींच्या प्रभावानेही पुराणकथा बदलतात. पुराणकथेत बदल होत असताना तिच्यात स्थानिक, प्रादेशिक व कालानुरूप नवी वैशिष्ट्ये निर्माण होतात. एखाद्या पुराणकथेत मूळचा तद्देशीय भाग कोणता आणि विदेशी प्रभावातून निर्माण झालेला भाग कोणता, हे ठरविणे अनेकदा अवघड असते. काळाच्या दृष्टीनेही आधीच्या व नंतरच्या भागांतील वेगळेपणा दाखविणे अवघड असते.

आधुनिक काळात पुराणकथा : प्राचीन काळात जशा अनेक भव्य पुराणकथा निर्माण झाल्या, तशा नंतरच्या काळात निर्माण झाल्या नाहीत. आधुनिक काळात तर नव्या पुराणकथांची निर्मिती खूपच कमी होत चालली आहे. पुराणकथांच्या निर्मितीला आवश्यक असे वातावरण व मनोवृत्ती  आजच्या समाजात उरलेली नाही. कारण, विश्वातील विविध घटनांचा कार्यकारणसंबंध विज्ञानाच्या आधारे पाहण्याची वृत्ती वाढली आहे. पूर्वजांच्या कृत्यांचे तंतोतंत अनुकरण करण्याची प्रवृत्ती संपली असून सत्याची नवी व अपूर्व रूपे शोधण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. ही प्रवृत्ती पुराणकथांच्या निर्मितीला मारक आहे. अर्थातच, धर्मश्रद्धा पूर्णपणे नष्ट झालेली आहे, असे नव्हे. म्हणूनच अजूनही साधुसंत, त्यांचे चमत्कार इत्यादींविषयी लहानमोठ्या पुराणकथा निर्माण होतात  व पुढेही होतील; परंतु व्यापक, अत्यंत प्रभावी वैश्विक सत्याचे दर्शन घडविणार्‍या भव्य पुराणकथा मात्र निर्माण होत नाहीत.

पुराणकथांचा प्रभाव : प्राचीन काळी पुराणकथांतील घटना हे परिपूर्ण सत्य आहे, अशी लोकांची धारणा असल्यामुळे पुराणकथांचा जनमानसावर कमालीचा प्रभाव होता. मानवी विचारांना हवे ते वळण देण्याचे वा त्यांत आमूलाग्र बदल करण्याचे  सामर्थ्य त्या पुराणकथांत होते. पुराणकथांच्या प्रभावामुळे मानवी जीवन व संस्कृती यांना विशिष्ट आकार प्राप्त झाला आहे. पुराणकथांवरील श्रद्धेमुळेच माणूस विशिष्ट प्रकारचे आचरण करण्यास प्रवृत्त होतो, निषिद्ध कृत्ये टाळतो, सुखांचा त्याग करून यातना सोसतो. थोडक्यात म्हणजे माणूस पुराणकथा जगत असतो. आधुनिक मानवाचे मन जसे फ्रेंच राज्यक्रांतीसारख्या घटनांनी बनले आहे, तसे प्राचीन मानवाचे मन पुराणकथांनी बनले होते, असे जे मीर्शा ईलिआने म्हटले आहे, ते सार्थच आहे. आधुनिक काळात वैज्ञानिक प्रगतीमुळे पुराणकथांचे सामर्थ्य निश्चितच क्षीण झाले आहे. तरीदेखील आधुनिक काळातील साहित्यादी विविध कलाकृतींवर अजूनही प्राचीन पुराणकथांचा प्रभाव आढळतो. लहान मुलांना अजूनही पुराणकथा सांगितल्या जातात. व्यक्ती, विमाने, जहाजे इत्यादींचे नामकरण पुराणकथांच्या आधारे केले जाते. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून अजूनही कर्मकांडरहित पुराणकथा व्यक्त होतात. चित्रपट, वृत्तपत्रे, मुद्रणालये, दूरदर्शन, आकाशवाणी इ. माध्यमांमुळे त्यांची प्रभावक्षमता काही प्रमाणात वाढलीही आहे. आधुनिक काळात नाझींनी स्वमतपुष्ट्यर्थ प्राचीन पुराणकथांचा आधार घेतला होता, हे सर्वश्रुत आहेच. पुराणकथांचा प्रभाव आणि सामर्थ्य असे प्रचंड असल्यामुळेच संस्कार करण्याचे एक शैक्षणिक साधन म्हणून पुराणकथांचे स्थान अनन्यसाधारण असते. आजही आदिवासी लोकांच्या जीवनाचा अभ्यास केल्यास हे स्पष्ट होते.

अभ्यासाची साधने:  एखाद्या समाजाच्या पुराणकथा जाणून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. मौखिक परंपरने आलेल्या या कथा अजूनही मौखिक चर्चे द्वारा लोकांकडून प्राप्त करता येतात. प्राचीन काळातील मंदिरे, मूर्ती, शिल्पे, चित्रे, वास्तू इत्यादींवरून पुराणकथांच्या स्वरूपाचे अनुमान करता येते. आधुनिक काळात होत असलेल्या उत्खननामुळेही पुराणकथाविषयक ज्ञानात भर पडते. लोककथा व लोकगीते यांच्या अभ्यासातूनही कितीतरी पुराणकथात्मक वाङ्‌मय प्राप्त होते. विविध रूढी, धार्मिक व सामाजिक लोकाचार, उपासनामार्ग, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, कर्मकांड, यातुक्रिया इत्यादींवरून अनेक पुराणकथांचे अनुमान करता येते. ललित साहित्यकृतींचाही पुराणकथांच्या अभ्यासाला उपयोग होतो. हिंदू, बौद्ध इत्यादींच्या पुराणकथा प्रामुख्याने त्यांच्या पवित्र धर्मग्रंथांतून आढळतात. बायबलच्या ‘जुन्या करार’त अनेक पुराणकथा आहेत, तथापि इझ्राएलच्या धर्माने त्यापूर्वीच्या जुन्या पुराणकथांवर टीका केल्य़ाचेही दिसते. बायबलच्या ‘नव्या करारा’तही पूर्वीच्या पुराणकथांना देवहीन आणि वेडपट कल्पना म्हटले आहे. अल्लाला सर्वश्रेष्ठ मानण्याची इस्लामची प्रवृत्तीही पुराणकथाविरोधी मानली जाते. परंतु असे असले, तरी या सर्व धर्मग्रंथांतून पुराणकथांचे अस्तित्व कमीअधिक प्रमाणात आढळतेच. आदिवासींच्या जीवनाचा अभ्यास हा पुराणकथांच्या अभ्यासाला अत्यंत पूरक आहे. आजपर्यंच्या अभ्यासावरून पुराणकथांच्या समग्र आशय उलगडलेला नाही आणि पुढेही तो पूर्णपणे उलगडेल असे वाटत नाही . कारण, पुराणकथांच्या विकासातील अनेक दुवे कायमचे हरवले आहेत.

संदर्भ  : 1 Aldington, Richard; Ames, Delano; Trans. New Larousse Encyclopaedia of Mythology, Mythology, London, 1975.

2.Bolle, K. W. The Freedom of Man in Myth,Mashhville, Tenn. 1968.

3. Campbell, y3wuoeph, The Masks of God, 4 Vols. London,1959-68.

4. Dandekar, R.N.Vedic Religion and Mythology, Poona, 1965.

5 Dent, J. M ;Dutton, E. p. Everyman’s Dictionary of Non- Classical Mythology, New York, 1952.

6. Eliade,Micera; Trans. Myth and Reality, New York,1963.

7. Frazer,J.G.The Golden Bough, New York, 1922

8. Gray, L. H. Ed. The Mythology of all  Races, 13 Vols., Boston 1925-36.

9. Hackin ,J.; Huart Clement & other, trans , Atkinson, F, M, Asiatic mythology, London, 1967.

10. Hooke, S.H. Ed. Myth and Ritual, New York, 1933.

11. Ions, Veronica, Indian Mythology, London, 1967.

12. James, e.o Prehistoric, Religions London, 1957.

13. Jensen, a,e Trans. Myth and Cult among Primitive Peoples, New York, 1963.

14.  Jung, C.G. Kerenyi, K. Trans. Essays on a Science of Mythology, New York, 1950.

15.  Kramer, S.H. Ed ,Mythologies of the Ancient World , Creation, New York 1961.

16. Long C.H.Alpha : The Myths of Cretion, new York, 1963.

17. Malinowaski, Bronislaw Magic, Science and Religion and other Essays, Bosyon, 1948.

18. Malinoyaski Bronislaw Sex, Culture and Myth  ,London 1963.

19. Middleton, John, Myth and Cosmos: Readings in Mythology and Symbolism New York, 1967.

20. Picard, B.L Ed. The Enclcopadia of Myth & Lagends of All Nations, London 1962.

21. Savill, Sheila Ed. Barker Mary: Cook, Christopher Pears Encyclopaedia of Myth and Lagends,       4. Vols., London, 1976-78.

लेखक: आ. इ. साळुंखे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/27/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate