অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारत पर्यटनम्‌

भारत पर्यटनम्‌

संस्कृत पंडित के. एम्‌. कुट्टिकृष्ण मारार (१९००-१९७३) यांनी महाभारतातील महत्त्वाचे प्रसंग व व्यक्ती यांवर मलयाळम्‌ भाषेत लिहिलेल्या अठरा चिकित्सक निबंधांचा हा प्रख्यात संग्रहग्रंथ होय. १९५० मध्ये तो प्रथम प्रसिद्ध झाला आणि १९७४ पर्यंत त्याच्या आठ पुनर्मुद्रित आवृत्त्या निघाल्या. मलयाळम्‌मध्ये हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून जाणकारांनीही त्याची प्रशंसा केली आहे.

के.एम्‌. कुट्टीकृष्ण मारार यांनी मुख्यत्वे संस्कृतचे सखोल अध्ययन केले. प्रख्यात संसकृत पंडित पुनश्शेरी नंबी नीलकंठ शर्मा (१८५८-१९३४) यांनी स्थापन केलेल्या पट्टांबी संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी ‘संस्कृत शिरोमणि’ ही उच्च पदवी मिळविली. व्यास, वाल्मीकी व कालिदास यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला. मातृभूमि ह्या नियतकालिकात ते मुद्रिक-शोधक म्हणुन होते. तरूणपणी त्यांच्या विचारांचा कल नास्तिकतेकडे होता; तथापि उत्तरायुष्यात ते कडवे आस्तिक बनले. त्यांचे एकूण तिसावर ग्रंथ प्रसिद्ध झाले. काव्यशास्त्र. छंदशास्त्र. संस्कृत ग्रंथांचे अनुवाद, काव्यसंग्रह, साहित्यसमीक्षा, भाषाभ्यास इ. त्याच्या ग्रंथांचे विषय होत. त्यांच्या काही महत्त्वाच्या ग्रंथांची नावे पुढीलप्रमाणे : मलयाळ शैली (१९४५), साहित्य भूषणम्‌ (२ री आवृ. १९६७), साहित्यसंल्लापम्‌ (१९४६), राजांकणम्‌ (१९४७), कैविळव्कु (१९५१), वृत्तशिल्पम् (१९५२), हास साहित्यम्‌ (१९५७), दन्तगोपुरम (१९५७), कल जीवितम्‌ तन्ने (१९६५, साहित्य अकादेमी पुरस्कार - १९६६) इत्यादी. कालिदासाच्या रघुवंश, कुमारसंभव, शाकुंतल, मेघदूत यांचीही त्यांनी गद्य भाषांतरे केली आहेत. सांप्रदायिक अभिनिवेशापासून सर्वस्वी अलिप्त असे चिकित्सक, मर्मज्ञ व सर्जनशील समीक्षक म्हणून तसेच आधुनिक मलयाळम्‌ गद्याचे शिल्पकार म्हणून त्यांचा लौकिक आहे. पूर्वीच्या मद्रास शासनाने तसेच केरळ शासनाने व साहित्य अकादेमीनेही वेळोवेळी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

मारार यांनी आपल्या भारत पर्यटनम्‌ ग्रंथात महाभारतातील काही लक्षणीय प्रसंग आणि उत्तुंग व्यक्तिरेखा निवडून त्यांतील अर्थवत्तेचा आणि अंतरंगाचा चिकित्सक-विश्लेषक दृष्टीने सखोल वेध घेतला आहे. या ग्रथांत एकूण १८ निबंध आहेत. वाचकास हा ग्रंथ वाचत असताना पानोपानी सुखद आश्चर्याचा अनुभव येतो. अभिनव कल्पना व दृष्टीकोन आणि तटस्थपणे केलेले प्रतिपादन यांमुळे महाभारतीय प्रसंग व व्यक्ती यांबाबतचे लेखकाचे विश्लेषण आणि भाष्य विशेष लक्षणीय ठरते.

या ग्रंथांतील पहिला निबंध ‘भीष्म प्रतिज्ञा’ हा असून त्यात भीष्माने आपल्या पित्यासाठी घेतलेल्या प्रतिज्ञेचे गांभीर्य विशद केले आहे. माणसाची थोरवी तो जीवनातील विषयोपभोगापासून स्वतःस जितका दूर ठेवू शकतो, तितकी अधिक वाढते, असे मारार यांनी या संदर्भात प्रतिपादले आहे. दुसरा निबंध ‘अंबा’. ह्यामध्ये त्यांनी अंबेला साहाय्य करण्याच्या परशुरामाच्या कृतीचे सखोल व मार्मिक विश्लेषण करून जीतेंद्रिय अशा महान व्यक्तीही कधीकधी त्यांच्या नकळतपणे विषयवासनेकडे ओढल्या जातात व त्यांचे अध:पतन होते, हे दाखवून दिले आहे. सर्वच निबंधातून मानवी जीवनातील काही मूलभूत प्रश्न उपस्थित करून त्यांचे विश्लेषण केलेले आढळते. जर धर्मतत्त्व गुहेत दडलेले असेल, तर मारार यांनी ते व्यासमहर्षींच्या मदतीने मानवजीतीच्या कल्याणासाठी त्या गुहेतून यशस्वीपणे बाहेर काढून उघड केले आहे, असे म्हणावे लागेल. विसाव्या शतकाच्या मध्यावरील एकक श्रेष्ठ वैचारिक ग्रंथ म्हणून भारत पर्यटनम्‌ला मलयाळम्‌ साहित्यात मोठे स्थान आहे.

लेखक: टी. (इं) भास्करन्‌ ; भा. ग. सुर्वे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/31/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate