অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रविकिरण मंडळ

रविकिरण मंडळ

१९२० च्या सुमाराला शेवाळू लागलेल्या मराठी काव्याला नवे पाट पाडून कविता सामान्यजनातही लोकप्रिय करणारे मंडळ.

१९२० ते २३ या काळात जे काही कवी कारणपरत्वे पुण्यात वास्तव्य करीत होते त्यांतूनच या मंडळाची निर्मिती १९२३ साली झाली. दर रविवारी कुणा एकाकडे जमून कवितांचे वाचन वा गायन करावयाचे आणि त्यांवर चर्चा करावयाची हा त्यांचा परिपाठ असे. त्यालाच ते ‘सन-टी-क्लब’ म्हणत. या ‘सन-टी-क्लब’चेच पुढे ‘रविकिरण मंडळ’ झाले.

या मंडळाच्या स्थापनेच्या वेळी श्रीधर बाळकृष्ण रानडे (१८९२–१९८४), मनोरमाबाई रानडे (१८९६–१९२६),  माधव जूलियन्‌ (१८९४–१९३९),  यशवंत (१८९९–१९८५),  गिरीश (१८९३–१९७३),  ग. त्र्यं. माडखोलकर (१८९९–१९७६), द. ल. गोखले आणि दिवाकर (१८८९–१९३१) असे एकूण आठ सदस्य होते. दिवाकर हे मंडळ सोडून गेल्यावर त्यांच्या जागी विठ्ठल दत्तात्रय घाटे (१८९५–१९७८) हे सर्वानुमते आले. मंडळात सात पुरुष व एक स्त्री, म्हणून ‘अरुंधतीसह सप्तर्षी’ हे मंडळाचे प्रतीक बनले आणि ते मंडळाच्या पुस्तकावर सातत्याने छापले जाऊ लागले.

रविकिरण मंडळाची परंपरा वास्तविक केशवसुती परंपरेत मोडणारी होती. मात्र कालमानाने ती अधिक धीट बनली. व्यक्त्तिस्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांचा पुरस्कार त्यांनी केला, पण तो साधनरूप न होता साध्यरूपाने होऊ लागला. प्रेमभावनेचा आविष्कार राधाकृष्णांच्या आधारे न करता, सरळपणे होऊ लागला. त्यातच प्रेमभावना अशरीरिणीही असू शकते, हेही काव्यातून प्रकट होऊ लागले. शिवाय सर्वसामान्य माणसांना रविकिरण मंडळातील कवींच्या कवितांतून आपल्या भावभावनांचा आविष्कार आढळल्याने ती कविता कविकुलाबाहेर पडून सर्वसामान्य शिक्षितांपर्यंत पोहोचली. काव्यगायनाच्या नव्या प्रथेमुळे या गोष्टीला मदत झाली.

संघटितपणे काव्यरचना करण्याचा प्रयोग ह्या मंडळाने केला. अभिव्यक्तीच्या विविध तऱ्हाही मंडळातील कवींनी अवलंबिल्या व रूढ केल्या. आधीपासून थोडेफार लिहिले गेलेले ‘सुनीत’ मंडळातील कवींनी विविधांगांनी विविध प्रकारे (म्हणजे विविध वृत्तांतून) सुस्थिर केले. सुट्या वाटणाऱ्या सुनीतातूनही एखादे कथासूत्र गुंफले जाऊ लागले. भावगीत तर आपल्यापुरते, स्वतंत्र, स्वयंपूर्ण असते. पण त्यातूनही कथा गुंफून खंडकाव्याचे रूप त्याला देण्याचा प्रयोग झाला. प्रेम हाच मुख्य विषय असणारा गझल अनेक विषय व्यक्त्त करू लागला. जानपदांची चित्रे रंगवणारी जानपदगीते लोकप्रिय झाली. भाषांतरित काव्याला प्रतिष्ठा मिळाली. रविकिरणमंडळपूर्व काळात क्वचित व अर्धीमुर्धी दिसणारी सामाजिक खंडकाव्ये, दीर्घ व संपूर्णपणे लिहिली जाऊ लागली. मंडळाचे एक सदस्य कवी यशवंत ह्यांनी छत्रपती शिवराय (१९६८) हे महाकाव्यही लिहिले आहे. तसेच मात्रावृत्ताचे अनेक प्रयोग केले गेले. रविकिरण मंडळाने काव्यगायनाची प्रथा पाडून मराठी कविता सर्वदूर, सर्वजनमानसात ऐकवली.

मंडळातील कवींनी प्रथम सामूहिक व नंतर वैयक्त्तिक कवितासंग्रह काढले वा खंडकाव्ये प्रसिद्ध केली. श्री. बा. रानडे आणि त्यांच्या पत्नी मनोरमाबाई रानडे, वि. द. घाटे, द. ल. गोखले, ग. त्र्यं. माडखोलकर ह्यांनी काही कविता लिहिली आहे. तथापि काव्यलेखनात अधिक वाटा माधव जूलियन्‌, यशवंत व गिरीश यांचा आहे. ह्या मंडळातील कवींनी गद्यलेखनही केले. वि. द. घाटे हे तर उमेदीच्या काळातच स्वेच्छेने काव्यलेखनाचा निरोप घेऊन गद्यलेखनाकडे वळले. माधव जूलियनांचे पांडित्याचे वळण दाखवणारे छंदोरचना (१९२७, आवृ. दुसरी, १९३७), यशवंतांचे समीक्षात्मक रामदास : एक अभ्यास (१९६५) आणि वि. द. घाटे यांची नाट्यरूप महाराष्ट्र (१९२६), नाना देशांतील नाना लोक (१९३३) ही अभिनव शैक्षणिक पुस्तके; काही म्हातारे व एक म्हातारी (१९३९) सारखी व्यक्त्तिचित्रणात्मक पुस्तके आणि दिवस असे होते (१९६१) हे आत्मचरित्र हे काही विशेष उल्लेखनीय ग्रंथ होत. ग. त्र्यं. माडखोलकर हे पत्रकार, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून ख्यातनाम झाले. दिवाकरांनी नाट्यछटा लिहिल्या. मंडळाचे एक सदस्य द. ल. गोखले हे जातिवंत रसिक आणि अभ्यासक असूनही मराठी साहित्यात त्यांनी विशेष भर घातली नाही.

किरण (१९२३) हे मंडळाचे, दिवाकरांच्या नाट्यछटांसह, प्रकाशित झालेले पहिले गद्य-पद्य पुस्तक. त्यापाठोपाठ मंडळाचे काव्यविषयक विचार निबंधरूपाने स्पष्ट करणारे काव्यविचार (१९२४), तसेच उषा (१९२४), शलाका (१९२५) आणि प्रभा (१९२७) हे मंडळाच्या नावे प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह. मधु-माधव (१९२४) हा माधव जूलियन्‌ व वि. द. घाटे या दोघांच्याच कवितांचा संग्रह आहे. या सर्व पुस्तकांवर ‘सप्तर्षी' ह्या तारकापुंजाची निशाणी आहे.

वर म्हटल्याप्रमाणे रविकिरण मंडळाच्या अन्य सभासदांच्या मानाने माधव जूलियन्, यशवंत व गिरीश हेच काव्यलेखनदृष्ट्या अधिक क्रियाशील कवी. त्यांतही माधव जूलियन् हे मंडळातील सर्वाधिक महत्त्वाचे कवी. माधव जूलियन् यांच्यात कवित्व व पांडित्य यांचा मनोज्ञ संगम दिसतो. काव्यनिर्मितीतील प्रयोगशीलतेच्या संदर्भात, केशवसुत आणि मर्ढेकर ह्या थोर कवींच्या मधील दुवा म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. गझल हा काव्यप्रकार मराठीत रुजवण्याचे श्रेयही त्यांचेच.

गिरीशांनीही स्फुट आणि दीर्घ अशी द्विविध काव्यरचना केली आहे. कांचनगंगा (१९३०), फलभार (१९३४), मानसमेघ (१९४३), कांचनमेघ (१९५५) व सोनेरी चांदणे (१९६१) हे त्यांच्या स्फुट कवितांचे संग्रह. विधवा, परित्यक्त्ता, गरीब विद्यार्थी यांविषयीच्या सहानुभूतीतून यांतील बऱ्याच कविता निर्माण झाल्या आहेत. निसर्गाचे सौंदर्य व संगीताची माधुरी हे त्यांना विशेष आकृष्ट करणारे विषय. त्यांची स्फुट कविता अधिक गेय झाली आहे.

त्यांच्या दीर्घ कविता अधिक लोकप्रिय ठरल्या आहेत. अभागी कमल (१९२३), कला (१९२६) आणि आंबराई (१९२८) ही त्यांची तीन खंडकाव्ये. संयम हा त्यांच्या सर्वच काव्यरचनेचा विशेष होय. यशवंत हे रविकिरण मंडळातील सर्वांत अधिक लोकप्रिय कवी. चमत्कृतीपेक्षा भावोत्कटता व तळमळ हे त्यांच्या काव्याचे विशेष होत. कोणत्याही विषयाकडे भावोत्कट पण सर्वसामान्य प्रापंचिकाच्या भावनेने ते पाहतात आणि त्या भावनेला योग्य अशी गेय जातियोजना करतात. सुनीताचे इतरांपेक्षा अधिक रचनाप्रयोग त्यांनी केले आहेत. त्यांचे वीसांहून अधिक स्फुट कवितांचे संग्रह असून त्यांतील यशवंती (१९२१), महाराष्ट्र वीणा झंकार (१९२२), यशोधन (१९२९), यशोगंध (१९३४), यशोगिरी (१९४४), वाकळ (१९५६) व पाणपोई (१९५१) हे विशेष उल्लेखनीय होत.

जयमंगला (१९३१), बंदीशाळा (१९३२) ही त्यांची दोन उल्लेखनीय खंडकाव्ये. पैकी जयमंगलेत एक सुंदर प्रेमकथा रंगविली आहे, तर बंदीशाळेत बालगुन्हेगारांच्या शाळेतील मुलांच्या दुःखी जीवनाचे वास्तव चित्र रेखाटले आहे.

या तीन कवींनी व्यक्त्तिशः आणि एकूण सर्वच मंडळाने सामुदायिकपणे, मराठी काव्यात संख्येने व गुणदृष्ट्या मोलाची भर घातली. केशवसुत परंपरेच्या व्यवस्थापनाचे व विस्ताराचे महत्त्वपूर्ण कार्य रविकिरण मंडळाने चांगल्या प्रकारे केले आहे, असाही ह्या मंडळाचा गौरव केला जातो.

माधव जूलियन्, यशवंत, ग. त्र्यं. माडखोलकर आणि वि. द. घाटे ह्या मंडळाच्या चार सदस्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान प्राप्त झालेला आहे. रविकिरण मंडळाच्या कार्यासंबंधी समीक्षकांमध्ये आजही एकवाक्यता नसली, तरी कविता सामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या व प्रयोगशीलतेच्या दृष्टीने मंडळाने ते कार्य सातत्याने केले, त्याचे महत्त्व मराठी कवितेच्या अभ्यासकाला कधीच नाकारता येणार नाही.

लेखक/ लेखिका:गं. ब.ग्रामोपाध्ये; अनुराधापोतदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate