অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

श्रीरामकृष्ण-कथामृत

श्रीरामकृष्ण-कथामृत

एक बंगाली धर्मगंथ. महेंद्रनाथ गुप्त (१८५४१९३२) यांनी ‘ एम्.’ या टोपणनावाने या गंथाचे लेखन केले. रामकृष्ण परमहंस यांचे त्यांच्या भक्तांशी, सहचर-शिष्यांशी वेळोवेळी जे संवाद होत असत, ते या गंथात संकलित केले आहेत. या गंथाचे एकूण पाच खंड (१८९७-१९३२) प्रसिद्ध झाले. महेंद्रनाथ गुप्त हे रामकृष्णांचे निकटवर्ती, अंतरंग भक्त होते. ते रामकृष्णांच्या शिष्यपरिवारात ‘ मास्तरमहाशय’ म्हणून ओळखले जात. या गंथात मात्र त्यांनी स्वत:चा उल्लेख फक्त ‘ एम्.’ या अक्षरानेच केला आहे. स्वत:चे पूर्ण नाव कोठेही उघड केलेले नाही. २६ फेबुवारी १८८२ रोजी एम्.ना रामकृष्णांचे पहिले दर्शन झाले; तेथपासून एप्रिल १८८६ पर्यंत एकूण चार वर्षांच्या कालखंडातील ही संभाषणे आहेत. या कालावधीत रामकृष्णांचे त्यांच्या भक्तांशी, शिष्यांशी, सहचर-अनुचरांशी झालेले जे संवाद एम्.नी ऐकले, त्यांची सविस्तर टिपणे त्या त्या वेळी शक्य तितकी मुळाबरहुकूम त्यांनी लिहून ठेवली. या तपशीलवार नोंदींच्या सविस्तर टिपणांवरून पुढे एम्. यांनी आपला गंथ दैनंदिनीच्या स्वरूपात सिद्ध केला. या साऱ्या चित्रणात एक प्रकारची तटस्थता, अलिप्तता व वस्तुनिष्ठ दृष्टी आहे. त्यातून एम्.च्या विनम, निरहंकारी व लीन वृत्तीचा प्रत्यय येतो. वर्णनांत नेमकेपणा व रेखीवपणा आहे. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या चार वर्षांतील रामकृष्ण येथे दिसतात. त्यावेळी त्यांचे वय साधारण सेहेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान असावे. त्यामुळे रामकृष्णांच्या अत्यंत परिपक्व, परिणत अवस्थेचे दर्शन त्यातून घडते. त्यांच्या आसपास वावरणाऱ्या निरनिराळ्या प्रवृत्तींच्या, धारणांच्या व्यक्तींना ते गुरू म्हणून, मार्गदर्शक म्हणून कसे दिसले, ह्याचे चित्रण या गंथात आढळते. या कथामृता तून परिपूर्ण आध्यात्मिक जीवन जगलेल्या स्थितप्रज्ञ, साक्षात्कारी सिद्ध पुरूषाच्या रूपात रामकृष्णांचे जे दर्शन घडते, ते अतिशय विलोभनीय आहे. ही संभाषणे अत्यंत अनौपचारिक, सहजपणे जशी घडली तशी या गंथात संगहित केली आहेत. धर्माचा, आध्यात्मिक जीवनाचा अनुभव रामकृष्णांच्या जीवनात कसा साकार ला होता, हे या संवादांतून समजते. रामकृष्णांच्या जीवनाचे, वागण्या-बोलण्याचे, तत्त्वज्ञानाचे, समाधिमग्न अवस्थेचे असे सर्वांगपरिपूर्ण दर्शन या गंथात घडते.

एम्.नी १८९७ मध्ये या संभाषणांच्या दोन छोट्या इंग्रजी पुस्तिका प्रथमत: काढल्या. त्यांची स्वामी विवेकानंदांनी, ‘ हे उपदेशामृत समस्त जगतावर शांतीचा वर्षाव करणार आहे; हे महत्‌कार्य विधात्याने केवळ तुमच्यासाठीच राखून ठेवले होते ’, अशी प्रशंसा करून हे वृत्तांत सविस्तर लिहून काढण्याविषयी त्यांना सुचविले. त्यापासून प्रेरणा घेऊन एम्.नी अत्यंत परिश्रमपूर्वक हा गंथ सिद्ध केला. स्वामी निखिलानंदांनी १९४४ मध्ये त्याचा इंग्रजी अनुवाद द गॉस्पेल ऑफ श्रीरामकृष्ण या नावाने केला. रामकृष्णांचे विचार व शिकवणूक जगभर सर्वदूर प्रसृत होण्यास हा गंथ साहाय्यभूत ठरला. ऑल्डस हक्सली यांनी गॉस्पेल या इंग्रजी भाषांतराला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्याची तुलना यथार्थपणे बायबल शी केली आहे. श्रीरामकृष्ण-कथामृता चे भारतातील बहुतेक सर्व प्रमुख प्रादेशिक भाषांत अनुवाद झाले आहेत. या गंथाचा मराठी अनुवाद श्रीरामकृष्ण-वचनामृत  या नावाने श्रीरामकृष्ण आश्रम, नागपूर यांनी १९५१ मध्ये प्रकाशित केला.

रामकृष्णांचे विचार समजून घेण्याचे एकमेव साधार व सप्रमाण असे विश्वसनीय साधन म्हणून या गंथास अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्तीच्या आध्यात्मिक अधिकारानुसार रामकृष्ण त्याला उपदेश करीत असत. त्यांचे निवडक दहा-बारा अंतरंग शिष्य होते, त्यांना त्यांनी केलेल्या उपदेशात कामिनी-कांचनाचा सर्वथा त्याग, संन्यासवताचा स्वीकार व आध्यात्मिक जीवनाचा आदर्श ही प्रमुख बोधतत्त्वे होती. त्यानुसार या अंतरंग शिष्यांनी पुढे संन्यास घेतला. स्वामी विवेकानंद हे त्यांतील अगणी शिष्य होत. प्रापंचिकांना केलेल्या उपदेशात कर्तव्यबुद्धीने, अनासक्त वृत्तीने प्रपंच करावा, प्रपंचातून मन काढून घेतल्याशिवाय ईश्वरदर्शनाच्या दिशेने पाऊल पडणे कधीच शक्य नाही, कामिनी-कांचनाच्या मोहात मर्यादेबाहेर गुंतू नये, आपली किमान कौटुंबिक कर्तव्ये पार पाडावीत; परंतु ईश्वरदर्शन हेच जीवनाचे अंतिम ध्येय मानावे व त्यासाठी पतिपत्नींनी मिळून प्रयत्न करावा, अशी काही बोधवचने सांगितली आहेत. कलियुगात सत्यपालन हीच तपश्चर्या, माया टाळावी पण दया टाकू नये, शिवभावाने जीवांची सेवा करावी, सारे विश्व हे परमेश्वराचे रूप हा अनुभव श्रेष्ठ होय, ज्ञान वा भक्ती; किंवा साकार वा निराकार यांतील आपल्याला रूचेल व पचेल तेच घ्यावे, ही त्यांच्या शिकवणुकीची काही सारतत्त्वे होत. तत्त्वज्ञानातील गहन प्रमेये नित्याच्या परिचयातील उदाहरणे देऊन सुबोध व सुस्पष्ट करून सांगणे, ही रामकृष्णांची हातोटी या गंथात दिसते. श्रीरामकृष्ण-कथामृता च्या तोडीचा, शांतीचा व शाश्वत सुखाचा मार्ग दाखविणारा संवाद-गंथ अन्य कोणत्याही भारतीय भाषेत आढळत नाही.

लेखक: श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate