অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हरिवंश- एक पुराणग्रंथ.

हरिवंश- एक पुराणग्रंथ.

अपभ्रंश भाषेतील एक पुराणग्रंथ. हा काव्यग्रंथ अकराव्या शतकात लिहिला असावा, असे तज्ज्ञांचे अनुमान आहे. प्रस्तुत ग्रंथाला रिट्ठणेमिचरिउ (अरिष्टनेमि-चरित) असेही म्हणतात. यात एकूण ११२ संधी असून १,९३७ पद्ये किंवा कडवी आहेत. यांपैकी ९२ संधी स्वयंभूने रचलेले असून ९३ ते ९९ कदाचित त्याच्या त्रिभुवननामक पुत्राचे असावेत. १०० ते ११२ पैकी बहुतेक संधी त्रिभुवनाने रचले असून अखेरचे यशःकीर्ती मुनींचे आहेत. त्याने या ग्रंथात काही परिवर्तन केले असावे. या ग्रंथात यादव (संधी संख्या १३), कुरू (संधी १९), युद्ध (संधी ६०) आणि उत्तर (संधी २०) अशी चार कांडे (विभाग) आहेत. यादव कांडात कृष्णजन्म, बालक्रीडा, विवाह इत्यादींचे सुरेख वर्णन आहे. कुरुकांडात कौरव-पांडवांचा जन्म, शिक्षण, परस्परविरोध, द्युतक्रीडा, वनवास हा कथाभाग येतो. युद्धकांडात भारतीय युद्धाचे रोमहर्षक वर्णनआहे आणि उत्तरकांडात पांडवांच्या युद्धोत्तर जीवनप्रवासाची हकीकतआहे. हे लेखन करताना धवलकवीने पूर्वसूरींचे आभार मानले आहेत.त्यात नाट्यशास्त्रकार भरतमुनी, व्यास, पिंगल, भामह, दंडी, बाण आदींचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. हे काव्य असल्यामुळे निसर्गवर्णने, युद्धादी प्रसंगांची वर्णने आलंकारिक भाषेत केली आहेत. वाल्मीकी, कालिदास यांच्या काव्याचा प्रतिध्वनी आढळतो; मात्र भाषाशैली साधी, ओघवती आहे. जैनमते कृष्ण व बलराम हे महापुरुष तीर्थंकर अरिष्टनेमीचे आप्तहोते. त्यामुळे जैन कवींचा हरिवंश हा आवडता विषय असून त्यावर अपभ्रंश भाषेत चतुर्मुख, स्वयंभू, पुष्पदंत, धवल आणि अपभ्रंशोत्तर कालातील यशःकीर्ती, श्रुतकीर्ती इ. कवींनी रचना केली आहे. धवल ब्राह्मणकुलोत्पन्न होता; पण त्याने व्यास व चतुर्मुख यांनी रचलेली कथा जैनदृष्टी व परंपरा यांना अनुसरून सांगितली आहे. हा हस्तलिखित ग्रंथ जयपूरला अप्रकाशित अवस्थेत आढळला असला, तरी हिरालाल जैन यांच्या मते हे श्रेष्ठ दर्जाचे महाकाव्य होय. धवलकविकृत या ग्रंथाशिवाय आणखी एक हरिवंशपुराण सापडते. ते १२२ संधींमध्ये समाप्त झाले आहे.

संदर्भ : १. जैन, हिरालाल, भारतीय संस्कृति में जैन धर्म का योगदान, १९६२.

२. तगारे, ग. वा. भारतीय साहित्याचा इतिहास : भाग २, औरंगाबाद, १९८७.

लेखक: ग. वा. तगारे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate