অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इलाचंद्र जोशी

इलाचंद्र जोशी

(१३ डिसेंबर १९०२ ). प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार, कथाकार, निबंधकार, समीक्षक आणि वृत्तपत्रकार. जन्म अलमोडा येथे मध्यमवर्गीय कुटुंबात. शालेय जीवनातच त्यांनी  अभिजात भारतीय व पाश्चात्त्य साहित्याचा सखोल अभ्यास केला आणि हिंदी, बंगाली व इंग्रजी भाषांवर चांगले प्रभुत्व मिळविले. मॅट्रिक न होताच ते घर सोडून कलकत्त्यास गेले. तेथे कलकत्ता समाचार  दैनिकात त्यांना काम मिळाले. १९२१ मध्ये त्यांची व शरदबाबूंची भेट झाली. १९३६ पर्यंत ते इकडे तिकडे भटकत राहिले. अलाहाबाद येथे आल्यावर त्यांना चाँद  ह्या नियतकालिकात सहयोगी संपादक म्हणून काम मिळाले. ते केवळ हिंदीतच नव्हे, तर बंगाली व इंग्रजीतही लेखन करीत. सुधा, विश्ववाणी, विश्वामित्र, संमेलन पत्रिका, भारत, संगम, धर्मयुग, साहित्यकार  इ. नियतकालिकांत त्यांनी काही काळ संपादनाचे काम केले. ‘आकाशवाणी’ वरही ते काही काळ नोकरीस होते.

त्यांचा मानसशास्त्राचा सखोल व्यासंग आहे. त्यांच्या कादंबऱ्यात व्यासंगाचा प्रत्यय येतो. त्यांच्या प्रत्येक कादंबरीतील नायक वा नायिका कोणत्या तरी मानसिक विकृतीने पीडित असते आणि यातूनच कादंबरीचा विकास होतो. असे असले तरी त्यांना व्यक्तिवादी लेखक म्हणणे कठीण आहे. कारण प्रत्येक कादंबरीत त्यांनी सामाजिक स्वास्थ्याचा दृष्टिकोन अंगीकारला आहे आणि कथानकाच्या सौष्ठवपूर्ण बांधणीकडेही ते विशेष लक्ष देतात. जहाजका पंछी  (१९५४) या कादंबरीपासून मात्र त्यांचा दृष्टिकोन बदललेला दिसतो. दिवसेंदिवस त्यांना पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि जीवनदृष्टी यापेक्षा भारतीय तत्त्वज्ञान आणि जीवनदृष्टी अधिक निकोप, सखोल आणि जीवनोपयोगी वाटू लागल्याचे त्यांच्या नंतरच्या कादंबऱ्यांवरून दिसते. ऋतुचक्र (१९६८) कादंबरीत स्वच्छंदतावादी दृष्टीच जीवनात अधिक महत्त्वपूर्ण असते, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. त्याचप्रमाणे भयावह नास्तिकता, अतिरेकी व्यक्तिवादातून आलेला बेजबाबदार क्षणवाद आणि अस्तित्ववाद यांवर त्यांनी प्रखर हल्ला चढविला आहे. त्यांच्या संन्यासी (१९४०), पर्देकी रानी  (१९४२), प्रेत और छाया (१९४४), निर्वासित (१९४६), मुक्तिपथ (१९४८), सूबह के भूले (१९५१), जिप्सी (१९५२), जहाज का पंछी  ह्या कादंबऱ्या विशेष महत्त्वाच्या आहेत.

इलाचंद्रांच्या कथाही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. धूपरेखा (१९३८), दीवाली और होली (१९४२), रोमांटिक छाया (१९४३), आहुति (१९४५), खँडहरकी आत्माएँ (१९४८), डायरी के नीरस पृष्ठ (१९५१), कटीले फूल लजीले काँटे (१९५७) हे त्यांचे कथासंग्रह होत. त्याची समीक्षा अत्यंत मार्मिक आणि व्यासंगपूर्ण असते. छायावादाचे (स्वच्छंदतावादसदृश) मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांनी केलेले परीक्षण त्यांच्या स्वतंत्र व मौलिक चिंतनाची साक्ष देते. त्यांचे पुढील समीक्षापर ग्रंथ विशेष उल्लेखनीय होत : साहित्य सर्जना (१९३८), विवेचना (१९४३), विश्लेषण (१९५३), साहित्य चिंतन (१९५४), देखा-परखा (१९५७) इत्यादी. डॉस्टोव्हस्कीच्या दोन कथांचे त्यांनी हिंदीत अनुवादही केले आहेत. त्यांनी संकीर्ण स्वरूपाचेही विपुल लेखन केले आहे.

संदर्भ : १. उपाध्याय, देवराज, आधुनिक हिंदी कथासाहित्य और मनोविज्ञान, अलाहाबाद, १९५६.

लेखक : चंद्रकांत बांदिवडेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate