অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डॅन्यल डीफो

डॅन्यल डीफो

(१६६०–२४ एप्रिल १७३१). विख्यात इंग्रज कादंबरीकार व पत्रकार. लंडन येथे जन्म. न्यूइंग्टन ग्रीन येथील विद्यालयात शिक्षण. ‘डिसेंटर’ किंवा ‘नॉन्‌कन्फॉर्मिस्ट’ ह्या इंग्लंडमधील अल्पसंख्याकांच्या धर्मपंथाचा अनुयायी असल्याने त्याला ऑक्सफर्ड किंवा केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेता आले नाही. डिसेंटर हे ‘चर्च ऑफ इंग्लंड’ चे अनुयायी नसलेले ख्रिस्ती होत. डीफोने व्यापारात प्रवेश केला; पण त्यात तो अयशस्वी ठरला. इंग्लंडचा राजा दुसरा जेम्स ह्याच्या विरुद्धच्या राजकीय चळवळीत त्याने भाग घेतला होता. प्रथम व्हिग व नंतर टोरी पक्षाच्या बाजूने राजकीय स्वरूपाचे लेखनही त्याने केले. ह्यातील द ट्रू बॉर्न इंग्लिशमन (१७०१) हे इंग्रजांच्या तथाकथित वांशिक शुद्धतेच्या दंभावर प्रहार करणारे काव्य व लिजन्स मेमोरियल (१७०१) हे लोकमताची दखल घेण्याचा पार्लमेंटला इशारा देणारे लेखन प्रसिद्ध आहे. प्रभावी उपरोध हे त्याच्या राजकीय लेखनाचे वैशिष्ट्य होते. ‘द शॉर्टेस्ट वे विथ द डिसेंटर्स’ (१७०२) ह्या पुस्तपत्रात चर्च ऑफ इंग्लंडच्या असहिष्णुतेवर उपरोधपूर्ण टीका करण्याच्या हेतूने डिसेंटरांना नामशेष कसे करावे, ह्याचे वर्णन त्याने केले होते. तथापि ह्या पुस्तपत्रातील मजकुरामुळे चर्च ऑफ इंग्लंडचे अनुयायी व त्यांच्याबरोबर डिसेंटरही दुखावले गेले. परिस्थित्यनुसार डीफो आपली राजकीय भूमिका बदलत असे. ॲन अपील टू ऑनर अँड जस्टिस (१७१५) ह्या लेखनात त्याने आपल्या राजकीय जीवनाचे समर्थन केले आहे. ॲन एसे अपॉन प्रॉजेक्टस (१६९७) हे त्याचे एक विशेष उल्लेखनीय पुस्तक. त्यात स्त्रीशिक्षण, विमायोजना, कामगारकल्याण, मानसोपचार केंद्रे वगैरेसंबंधी अनेक पुरोगामी योजना त्याने सुचविल्या आहेत. त्यांतून त्याची विशाल सामाजिक दृष्टी दिसून येते. १७०४–१३ ह्या कालखंडात रिव्ह्यू ह्या स्वतःच काढलेल्या साप्ताहिकात त्याने साहित्यविषयक लेखन केले होते; परंतु साहित्यनिर्मितीकडे मात्र तो १७१५ नंतरच वळला. रॉबिन्सन क्रूसो (१७१९), मेम्वार्स ऑफ ए कॅव्हलियर (१७२०), द लाइफ ऑफ कॅप्टन सिंगलटन (१७२०), मॉल फ्लँडर्स (१७२२), कर्नल जॅक (१७२२), ए जर्नल ऑफ द प्लेग यीअर (१७२२) आणि रोक्साना  (१७२४) ह्या त्याच्या प्रसिद्ध कादंबऱ्या.

डीफोने आपले लेखन मुख्यतः सर्वसामान्य वाचकांकरिता केले. दैनंदिन व्यवहारातील भाषेला जवळची अशी वृत्तपत्रीय, वास्तववादी निवेदनशैली त्याने स्वीकारली व भाषेच्या आलंकारिक सौंदर्यापेक्षा वस्तुस्थितीचे बारकावे वर्णन करण्यावर भर दिला. रॉबिन्सन क्रूसो ही त्याची जगप्रसिद्ध कादंबरी. रॉबिन्सन क्रूसो हा तत्कालीन मध्यम वर्गीयांचा प्रतिनिधी. अर्थमूल्यांना त्याच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्व आहे. समीक्षकांनी ह्या कादंबरीचे वेगवेगळे रूपकार्थ मांडून दाखविलेले आहेत. ह्या कादंबरीतून इंग्लंडमधील समकालीन जीवनाच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीची प्रगल्भ जाण दिसून येते. ए जर्नल ऑफ द प्लेग यीअरमध्ये प्लेगच्या भयानक संकटात सापडलेल्या नागरी जीवनाचे वर्णन केले आहे. मॉल फ्लँडर्स ही डीफोने निर्मिलेली सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा. ती एक वेश्या आहे. आपल्या वेश्यावृत्तीचे समर्थन ती निखळ व्यावहारिक पातळीवरून करते. रोक्साना ह्या कादंबरीत मानसशास्त्रीय दृष्टिकोणावर दिलेला भर पाहता ती सॅम्युएल रिचर्ड्‌सनच्या क्लॅरिसाची पूर्वसूरी ठरते. प्रथम पुरुषी निवेदनशैली हे डीफोच्या कादंबऱ्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य.

डीफोचे लेखन कादंबरी ह्या वाङ्‌मयप्रकारात मोडत नसून ते केवळ इंग्रजी समाजाच्या तत्कालीन आर्थिक, नैतिक जाणिवांवर केलेले वृत्तपत्रीय भाष्य आहे, असे काही टीकाकार मानतात; तर काही त्याला इंग्रजी कादंबरीचा जनक म्हणून गौरवितात. लंडन येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Hunter, J. Paul., The Reluctan Pilgrim, Baltimore, 1966.

2. Moore, John Robert, Daniel Defoe, Citizen of the Modern World, Chicago, 1958.

3. Novak, Maximillian E. Defoe and the Nature of man, New York, 1963.

4. Novak, Maximillian E. Economics and the Fiction of Daniel Defoe, Berkeley, Calif., 1962.

लेखक : वा. चिं. देवधर

माहिती  स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/25/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate