অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टॉमस डे क्विन्सी

टॉमस डे क्विन्सी

(१५ ऑगस्ट १७८५–८ डिसेंबर १८५९). इंग्रज निबंधकार व समीक्षक. मँचेस्टर येथे जन्म. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्याने शिक्षण घेतले; पण पदवीपरीक्षा मात्र दिली नाही. ग्रीक भाषेवर त्याचे प्रभुत्व होते. कोलरिज, वर्ड्‌स्वर्थ ह्यांसारखे श्रेष्ठ कवी आणि विख्यात लेखक चार्ल्स लँब ह्यांच्याशी डे क्विन्सीचे घनिष्ठ संबंध होते.

लंडन येथील वेस्टमोअरलँड गॅझेटचे त्याने काही काळ संपादन केले. त्याचे बरेचसे लेखन लंडन मॅगझिन आणि ब्लॅकवुड मॅगझिन ह्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. १८०४ मध्ये त्याला काही वैद्यकीय कारणांसाठी अफूचे सेवन करावे लIगले आणि पुढे तो ह्या व्यसनIच्या आधीन झाला. ह्या संदर्भातील त्यांची कैफियत कन्फेशन्स ऑफ ॲन इंग्लिश ओपियम ईटर ह्या नावाने लंडन मॅगझिनमधून क्रमशः प्रकाशित झाली (१८२२). आयुष्यातील अनेक कटू  अनुभवांचे पडसाद कन्फेशन्स... मध्ये  उमटलेले आहेत. तथापि अलंकारप्रचुर,नाट्यात्म निवेदनामुळे त्याच्या अनुभवांची मूळची विदारकता काही प्रमाणात क्षीण झाल्यासारखी वाटते; किंबहुना डे क्विन्सीच्या  सर्वच लेखनात वास्तवाला स्वप्नसदृश्य रूप प्राप्त झालेले दिसते.

कोलरिज व वर्ड्‌स्वर्थ ह्यांच्या लिरिकल बॅलड्सचे महत्त्व ओळखणाऱ्या पहिल्या काही समीक्षकांत त्याची गणना होते. समीक्षात्मक लेखनात त्याचे मिल्टन व गोल्डस्मिथ ह्यांच्यावरील लेख विशेष  उल्लेखनीय  आहेत. ‘ऑन द नॉकिंग ऑफ द गेट इन मॅक्बेथ’ ह्या त्याच्या लेखातील मानसशास्त्रीय दृष्टिकोण लक्षणीय आहे. अर्थशास्त्र, राजकारण, जर्मन तत्त्वज्ञान ह्यांसारख्या विषयांवरही त्याने विपुल लेखन  केले. एडिंबरो येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Eaton, H. A. Thomas De Quincey : A Biography, New York, 1936.

2. Jordan, J. E. Thomas De Quincey, Literary Critic, Berkeley, Calif., 1952.

3. Sackviller-West, Edward, Thomas De Quincey : His Life and Work, New Haven, 1936.

लेखक: वि. ह. कुलकर्णी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate