অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डिलन टॉमस

डिलन टॉमस

(२७ ऑक्टोबर १९१४ – ९ नोव्हेंबर १९५३). वेल्श कवी आणि गद्यलेखक. इंग्रजीतून लेखन. स्वान्झी (वेल्स) येथे जन्मला. स्वान्झी येथील शाळेत त्याचे वडील इंग्रजीचे शिक्षक होते व तेथेच त्याचे शिक्षण झाले. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी साउथ वेल्श ईव्हनिंग पोस्ट ह्या वर्तमानपत्रात तो बातमीदाराची नोकरी करू लागला.

एटीन पोएम्स(१९३४) ह्या त्याच्या पहिल्याच काव्यसंग्रहाने एका स्वतंत्र व समर्थ कविप्रतिभेचा प्रत्यय दिला. त्यानंतरव्टेंटिफाइव्ह पोएम्स(१९३६) हा त्याचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. धार्मिक, लैंगिक आणि निसर्गपर प्रतिमांचे विलक्षण रसायन, कमालीची प्रतीकात्मकता व छंदमयतेवरील भर ही त्याच्या वरील कवितासंग्रहांतील कवितांची वैशिष्ट्ये. एका अनोख्या पण संपन्न काव्यशैलीची प्रचीती त्याच्या कवितांनी दिली. ह्या कविता अनेक ठिकाणी दुर्बोध वाटल्या, तरी पाप, भीती, एकाकीपण आणि विषयवासनेचे अतर्क्य गूढ ह्यांविषयीच्या चिंतनातून ह्या कवीने आत्मसंशोधन चालविल्याचे जाणवले. डेथ्‌स अँड एंट्रन्सिस (१९४६) आणिकलेक्टेड पोएम्स(१९५२) हे त्याचे अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह.

टी. एस्. एलियटप्रणीत बुद्धिनिष्ठ काव्याचा विरोधक व अनिर्बंध सृजनशीलतेचा पुरस्कर्ता म्हणून टॉमस डिलन हा प्रथम ओळखला गेला. निसर्ग आणि मानवी जीवन ह्यांतून प्रतीत होणाऱ्या सृजनशक्तीचा त्याने जयघोष केला. अविरत धावणाऱ्या क्षणमालिकेतून निर्मिती आणि विनाश ह्यांचे गुंफलेले धागे त्याने पाहिले; तथापि त्यांच्या अद्‌भुत नाट्यातूनच निर्मितीच्या प्रभावी सामर्थ्याचा त्याला साक्षात्कार झाला. ‘रक्ताच्या बुंदासारखी कविता त्याला तळहातावर दिसली आणि त्याच्या तोंडून चित्कार बाहेर पडले’ असे त्याच्या काव्यनिर्मितीचे वर्णन एका अमेरिकन समीक्षकाने केले आहे. कौशल्यपूर्ण आकृतिबंध आणि सूक्ष्म तंत्रक्लृप्त्या ह्यांमुळेही त्याची कविता वैशिष्ट्यपूर्ण झालेली आहे.

त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या काव्याचे पुनर्मूल्यांकन सुरू झाले. वक्तृत्वाचा खोटा जोष आपल्या काव्यात आणून त्याने स्वतःची आणि वाचकांची दिशाभूल केली, असा आरोप काही समीक्षकांनी त्याच्यावर केला. त्याच्या प्रतिभेचा आवाका मर्यादित आहे; त्याच्या काव्यात प्रतिमांची पुनरुक्ती आढळते; त्याची शब्दरचना काव्यसदृश पण काव्यगर्भ नव्हे; त्याच्या काव्यातून भासमान होणारे भावनांचे दडपण हे त्याच्या अनुभवांच्या जिवंतपणातून आलेले नसून भाषेच्या आवेगातून निर्माण झालेले आहे; त्याच्या काव्यातील विचार रूढ नीतिनियमांना धक्का देणारे आहेत; त्यांत मानवतेबद्दलच्या करुणेचा अभाव, लैंगिकतेचा अतिरेक, विकृतीचा गौरव आणि उग्र वासनांचा उद्रेक आहे, अशी टीका त्याच्या काव्यावर होऊ लागली.

डिलनच्या काव्यावरील सर्वांत मोठा आरोप दुर्बोधतेचा. अनेकदा शब्दांच्या संभारात त्याच्या काव्यातील अर्थाची गळचेपी झालेली दिसते.‘माझ्या काव्याला अर्थ असा नाहीच’ असे त्यानेच एकदा म्हटले होते. तथापि त्याच्या काव्याचा आणि जीवनाचा सहानुभूतीने अर्थ लावण्याचा प्रयत्न केल्यास असे दिसते, की कुठल्याही सृजनप्रक्रियेत त्याला काही अमंगल दिसले नाही. फ्रॉइडच्या सिद्धांतानुसार जाणिवेच्या विस्तारातून त्याने गूढतेचा शोध घेतला आणि शब्दातील सुप्त सामर्थ्य उकलताना काव्यसमाधीचा अनुभव घेतला.

रसिकांच्या प्रचंड समुदायासमोर काव्यवाचन करण्याचा यशस्वी उपक्रम करून त्याने आपल्या समकालिनांना मंत्रमुग्ध केले. त्याच्या संकलित कविता १९५२ मध्ये प्रसिद्ध झाल्या.

काव्यलेखनाखेरीज त्यानेपोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट ॲज अ यंग डॉग(१९४०) ही आत्मचरित्रात्मक कादंबरीही लिहिली आहे.द मॅप ऑफ लव्ह(१९३९) मध्ये त्याच्या काही कविता आणि कथा एकत्रित केलेल्या आहेत.अंडर मिल्क वुडसारखी नभोनाट्येही त्याने लिहिली.

जनमानसातील स्वच्छंदी कलावंताची प्रतिमा साकार करण्याच्या प्रयत्नात तो अतिरिक्त मद्यपान करु लागला आणि त्यानेच त्याचा न्यूयॉर्क शहरी अंत झाला.

संदर्भ:1. Holbrook, David, Llareggub Revisited :Dylan Thomas and the State of Modern Poetry, Cambridge, 1962.

2. Jones, T. H.Dylan Thomas, Edinburgh, 1963.

3. Olson, Eider,The Poetry of Dylan Thomas, Chicago, 1954.

4. Stanford, Derek,Dylan Thomas, London, 1954.

5. Tedlock, E. W. Ed.Dylan Thomas : The Legend and the Poet, London, 1960.

6. Treece, Henry,Dylan Thomas, London, 1949.

लेखक :म. द. हातकणंगलेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate