অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दादोबा पांडुरंग तर्खडकर

दादोबा पांडुरंग तर्खडकर

(९ मे १८१४–१७ ऑक्टोबर १८८२). अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक. मुंबई येथे जन्म. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते.

संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी  (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. तीतून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. ह्या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्‌मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्र  (१९४७, संपा. अ. का. प्रियोळकर) महत्त्वाचे आहे. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ठ्ये. यांशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक  (१८३६), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६०), धर्मविवेचन  (१८६८), पारमहंसिक ब्राह्मधर्म  (१८८०) आणि शिशुबोध  (१८८४) अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ‘विधवाश्रुमार्जन’ हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी ह्यांच्या यमुनापर्यटन  ह्या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता. विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग ह्याच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्‌स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग (१८७८) ह्या ग्रंथाची यूरोपात प्रशंसा झाली होती. दादोबांच्या साहित्यात साधेपणा आणि विचारप्रवर्तकता आहे. त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य अग्रेसर महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.

ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा (सु. १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे.

भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड त्यांनी १८५७ साली मोडून काढले व सरकारने रावबहादुर ही पदवी त्यांना बहाल केली. मुंबई येथे ते निधन पावले.

लेखक : स. गं. मालशे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate