অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दैबचंद्र तालुकदार

दैबचंद्र तालुकदार

(१९००– ). असमिया साहित्यातील एक स्वच्छंदतावादी कवी, नाटककार व कादंबरीकार. जन्म व शिक्षण गौहाती येथे. आपल्या साहित्यिक जीवनाची सुरुवात त्यांनी काव्यलेखनाने केली, परंतु पुढे ते नाट्य व कादंबरीक्षेत्राकडे अधिक आकर्षित झाले. प्रेमपट (१९२२), कुँहिमाला (१९२३), सौंदर्य (१९३०) व अंतर-व्यथा (१९३२) हे त्यांचे काव्यसंग्रह होत. त्यांनी काव्य, नाटक व कादंबरी या प्रकारांत विपुल लेखन केले असून त्यांची ग्रंथसंपदा सु. २८ आहे.

आपल्या नाट्यकृतींतून त्यांनी आसामच्या दिव्य भूतकालाचे, विशेषतः मध्ययुगाचे, दर्शन घडविण्याचा प्रयत्न  केला आहे. असम–प्रतिभा (१९२४) या नाटकात शंकरदेव, माधवदेव, नरनारायण इ. मध्ययुगीन व्यक्तिरेखांचे चित्रण त्यांनी केले असून त्यांच्या प्रतीकांद्वारे धार्मिक व राजकीय सुधारणांच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. बामणी कोंवर (१९२९) या नाटकाचे कथानकही आहोम कारकीर्दीवर आधारलेले आहे. हरदत्त (१९३५) , बिप्लव (१९३७)  आणि भास्करवर्मा (१९५१) ही त्यांची इतर उल्लेखनीय नाटके. त्यांची नाटके तंत्रदृष्ट्या सदोष असून अतिनाट्याकडे (मेलो–ड्रामा) झुकणारी आहेत.

त्यांच्या कादंबऱ्या सामाजिक स्वरूपाच्या असून अस्पृश्यता, विधवाविवाह यांसारख्या तत्कालीन सामाजिक प्रश्नांचे चित्रण त्यांनी त्यांतून केले आहे. समाजातील दोष व जाचक रूढी यांविषयी झगडणाऱ्या आदर्शवादी नायकाचे चित्रण त्यांच्या कादंबऱ्यांतून आढळते. गांधीजींच्या विचारांचा त्यांच्या लेखनावर खोलवर परिणाम झाला असून आग्नेयगिरि (१९२४) या त्यांच्या कादंबरीचा नायकही गांधीवादी आहे. धूंवलिकुँवली (१९२३), अपूर्ण (१९३१), आदर्श–पीठ (१९४१), बिरोधी (१९४४), दुनिवा (१९६२) या त्यांच्या विशेष प्रसिद्ध कादंबऱ्या होत. असमिया कादंबरीचे क्षेत्र अधिक विस्तृत करण्याचे श्रेय तालुकदारांना दिले जाते. तथापि बोधवादी दृष्टिकोन, नैतिक उपदेशाने ओतप्रोत अशी पाल्हाळिक भाषाशेली, कृत्रिम कथानक इ. दोषांमुळे कलात्मक दृष्ट्या त्यांच्या कादंबऱ्यांचा दर्जा फारसा श्रेष्ठ मानला जात नाही.

लेखक : १) सत्येंद्रनाथ (इं.) सर्मा,

२)  प्रतिभा (म.) पोरे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

 


 

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate