অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माधव नारायण जोशी

माधव नारायण जोशी

(७ जानेवारी १८८५–१६ ऑक्टोबर १९४८). मराठीतील एक विनोदी नाटककार. जन्म पुणे येथे. बालपण वऱ्हाडातील खामगाव व बोलाराम या गावी. शिक्षण मॅट्रिकपर्यंत. अल्प काळ लष्करी हिशेबखात्यात नोकरी. पुढे तीन तपे पुण्यात राहून नाट्यलेखन. सुमारे २५ नाटके रचली.

कर्णार्जुन (१९१०) आणि कृष्णविजय (१९११) ही प्रासयुक्त भाषेने खचलेली पहिली गंभीर नाटके विद्वानांनी वाखाणली, पण रंगभूमीवर पडली. तेव्हा रंजन हे प्रमुख ध्येय मानून त्यांनी आपला मोहरा हास्यप्रधान नाट्यलेखनाकडे कायमचा वळविला. त्यासाठी मोल्येरप्रभृती पाश्चात्त्य नाटककरांची नाटके अभ्यासिली. पाश्चात्त्य विमुक्त सुखत्मिकांच्या धर्तीवर भोवतालच्या विसंगत वास्तवाची हास्योत्पादक हाताळणी करायची, ही त्यांची विशिष्ट पद्धती बनली. तदनुसार लिहिलेले व खाडिलकरी पदांचे बेमालूम विडंबन करणारे विनोद (१९१६) हे त्यांचे नाटक खूपच यशस्वी झाले. पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाने सुरू केलेल्या सामजिक सुधारणांचे घातक परिणाम हे त्यातील विनोदाचे लक्ष्य आहे. त्यांनी मनोरंजन (१९१६), पुनर्जन्म नाटक (सावित्री) (१९३१), यांसारखी पौराणिक; स्थानिक स्वराज्य अथवा सचित्र म्युनिसिपालिटी (१९२५), वऱ्हाडचा पाटील (१९२८), गिरणीवाला नाटक अथवा मालक-मजूर (१९२९) ह्यांसारखी हेतुप्रधान सामजिक, आणि वशीकरण (१९३२), पैसाच पैसा  (१९३५), प्रोफेसर शहाणे (१९३६), उधार उसनवार (१९४६) यांसारखी आटोपशीर सामाजिक प्रहसने लिहिली. वेशांतरजन्य फसगमती, नमुनेवजा पात्रांच्या दुकली, बोलभाषेतील वैचित्र्यपूर्ण संवाद, उडत्या चालींची चलनसुलभ पदे, अश्लीलतेकडे झुकणारा उच्छृंखल विनोद हीच त्यांच्या उपहासप्रधान नाट्यकलेची वैशिष्ट्ये राहिली. लोकशाहीच्या जमान्यात नालायक माणसे निवडली गेल्यास सार्वजनिक संस्थांचा खेळखंडोबा कसा उडतो, ह्या सार्वत्रिक अनुभवाचे विदारक पण वास्तव विडंबनचित्र रेखाटणारे त्यांचे स्थानिक स्वराज्य अथवा सचित्र म्युनिसिपालीटी  हे नाटक मराठीच्या नाट्यसंभारात अपूर्व ठरले आहे. पुणे येथे ते निधन पावले.

लेखक : स. गं. मालशे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate