बंगालच्या उपसागरात उ. अक्षांश ६० ४५’ ते १३० ४५’ व पू. रेखांश ९२० १५’ ते ९४०१३’ यांच्या दरम्यान वसलेला भारताचा केंद्रशासित प्रदेश. अंदमान (६,३४०) व निकोबार (१,९५३) मिळून एकूण क्षेत्रफळ ८,२९३ चौ.किमी. व लोकसंख्या ११५,०९० (१९७१). याच्या पूर्वेकडील समुद्रास ‘अंदमान समुद्र’ म्हणतात. उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान, बाराटांग व रटलंड या पाच बेटांनी मिळून झालेले मोठे अंदमान, त्याच्या दक्षिणेचे छोटे अंदमान, पूर्वेकडील रिची द्वीपसमूह व इतर लहानमोठी धरून एकूण २५७ बेटे मिळून अंदमान बेटे होतात.
१०० उत्तर अक्षवृत्ताच्या दक्षिणेस, छोट्या अंदमानपासून ९६ किमी. वरील कारनिकोबार, तेरेसा, कामोर्ता, त्रिंकत, नानकवरी, काचाल, छोटेनिकोबार, मोठे निकोबार इ. एकूण ६२ बेटे मिळून निकोबार बेटे होतात. अंदमान बेटांची एकूण लांबी ३५२ व निकोबारांची २३२ किमी. आहे. सरासरी रुंदी सु. २५ किमी. आहे. हुगळीच्या मुखापासून आग्नेयीस ही बेटे ९५० कि.मी. ब्रह्मदेशातील नेग्राईस भूशिराच्या दक्षिणेस १९३ किमी. व सुमात्रा बेटाच्या अॅचिनहेड टोकाच्या पश्चिमेस १४६ किमी. अंतरावर आहेत. त्यांचे हे स्थान भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने मोक्याचे आहे. पोर्ट ब्लेअर हे राजधानीचे शहर कलकत्ता व मद्रासपासून अनुक्रमे १,२५५ व १,१९१ किमी. दूर आहे. अंदमानला शहीद द्वीप व निकोबारला स्वराज्य द्वीप अशी नवी नावे सुचविली आहेत.
ही बेटे म्हणजे समुद्रतळावरील सुं. ७,००० मी. उंचीच्या पर्वतश्रेणींचा माथ्याचा भाग असून त्यांची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची सु. ३३५ मी. आहे. कारनिकोबार व छोटे अंदमान ही बहुतेक सपाट आहेत. बाकी सर्व डोंगराळ आहेत. उत्तर अंदमानामधील सॅडल शिखर ७३१⋅५ मी. व ग्रेट निकोबारमधील मौंट थुलियर ६४२ मी. उंच आहे. टेकड्याटेकड्यांमधील सखल भागांत काही ठिकाणी समुद्राचे फाटे आलेले आहेत, तर काही ठिकाणी सपाट मैदानी प्रदेश आहेत. किनारा अतिशय दंतुर असून त्यावर अनेक खाड्या व सुरक्षित बंदरे आहेत.
बेटांचा कोणताही भाग समुद्रापासून १६ किमी. पेक्षा अधिक दूर नाही. अंदमानच्या उत्तरेकडील प्रिपॅरिस खाडी (सु.१,००० मी. खोल), अंदमान व निकोबार यांमधील १० अक्षांश (टेन डिग्री) खाडी (सु. ८०० मी. खोल) व ग्रेरेट निकोबार आणि सुमात्रा यांमधील ग्रेट खाडी (सु. १,५०० मी. खोल ) यांखेरीज बेटांजवळचा समुद्र उथळ (सु. २०० मी. खोल) आहे. पश्चिमेस सु. ५० किमी. पलीकडे बंगालचा उपसागर व पूर्वेस सु. १५० किमी. पलीकडे अंदमान समुद्र हे सु. ४,००० मी. खोल आहेत.
मुख्य बेटांपासून सु. १००-१२५ किमी. दूर असलेली बेटे म्हणजे पश्चिमेस सेंटिनल बेटे व पूर्वेस बॅरन आणि नारकोंडम ही बेटे होत. बॅरन बेट हा एक सुप्त ज्वालामुखी १५३ मी. उंच आहे. १९ व्या शतकाच्या सुरवातीस त्याचा स्फोट झाला होता. नारकोंढम हा ७१० मी. उंचीचा एक मृत ज्वालामुखी असून त्याच्या मुखाचा भिंतीसारखा भाग पार नाहीसा झाला आहे.
अंदमान व निकोबार बेटांतील भूस्तरांचे अनुक्रमे आराकान योमाशी व सुमात्रामधील भूस्तरांशी बरेच साम्य दिसते. इओसीन कालातील वालुकाश्म, त्यांत ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे घुसलेले डाइक, झिजेमुळे धारदार व टोकदार स्वरूप आलेले चुनखडक काही ठिकाणी सर्पेटाइन खडक, निळसर झाक असलेले पंकाश्म, पिंडाश्म, प्रवाली खडक व उत्थानाने तयार झालेल्या पुळणी, असे येथील भूरचनेचे निरनिराळ्या भागांतील सामान्य स्वरुप आहे.
समुद्रातही प्रवाली खडकांच्या ओळी आढळतात. या बेटांतील डोंगरकणे क्रेटेशियस कालखंडात तयार झाले असावेत. निकोबार बेटे व बॅरन आणि नारकोंडम बेटे यांना जोडणाऱ्या रेषेवर पृथ्वीचा पृष्ठभाग काहीसा अधू आहे त्यामुळे निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के वारंवार बसतात.
अंदमानातील जलप्रवाह लहान, उन्हाळयात आटणारे, परंतु वेगवान आहेत. त्यातल्या त्यात दक्षिण अंदमानमधील प्रवाह थोडेसे लांब व बारमाही आढळतात. ग्रेट निकोबारमध्ये काही नद्या आहेत.
एकंदर हवामान नेहमी दमट व उष्ण असते, परंतु खाऱ्या वाऱ्यांमुळे ते थोडेसे आल्हाददायक होते. जवळजवळ सर्व ठिकाणी कमाल तपमान २९० ते ३१० से. असून किमान तपमान २४० ते २५० से. असते. नैऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे या बेटांत पाऊस पडतो. दक्षिण अंदमानमध्ये व निकोबार बेटांत तो जवळजवळ वर्षभर असतो. पर्जन्यमान दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी कमी होत जाते. या बेटांवरील सरासरी पर्जन्यमान ३१२ सेंमी. आहे. वर्षभर येथे सोसाट्याचे वारे असतात व वर्षातून साधारणपणे ४५ दिवस झंझावातांचा त्रास होतो.
एकूण जमिनीच्या ७७ टक्के भाग जंगलव्याप्त असल्याने सर्वत्र घनदाट वनस्पतीचे आच्छादन दिसते. अंदमानमधील वनस्पतींचे तीन भाग पडतात: सदाहरित, पानझडी व किनारपट्टीवरील वृक्षराजी. अंदमानमधील जंगलसंपत्ती भारतीय अर्थकारणाच्या-परकीय चलन मिळविण्याच्या-दृष्टीने अतिशय महत्वाची आहे.
फणस, बांबू, पळस, नारळ, सुपारी, सागाच्या काही जाती, शिसवी, गरजन, सॅटीनवुड, कोको, पडाउक, मार्बलवुड, चुई, पपीता वगैरे झाडे आहेत. बांधकाम व रेल्वे स्लीपर्सकरिता यांपैकी काही झाडे उपयोगी आहेत. बऱ्याच ठिकाणी एकाच जातीची झाडे जवळजवळ आढळतात, हे व्यापारी दृष्ट्या फायदेशीर ठरते. कठिण व मऊ दोन्ही प्रकारचे लाकूड मिळते आणि प्लायवुड (गरजन) व आगकाड्या (पपीता) यांना उपयुक्त लाकूडही पुष्कळ मिळते. निकोबारमध्ये नारळ प्रमुख असून सुपारी, अनेक प्रकारचे सुंदर ताडवृक्ष व काही इमारती लाकूड देणारे वृक्ष येथे आढळतात.
पावसाच्या परिणामामुळे ६०० ते ९०० मी. उंचीच्या प्रदेशात जांभ्या दगडापासून तयार झालेली जमीन आढळून येते. नद्यांच्या खोऱ्यांत गाळाच्या जमिनी आढळतात, तर किनारपट्टयांवरील जमिनीत रेतीचे प्रमाण जास्त असते. दमट व उष्ण प्रदेशात तयार होणाऱ्या जांभ्या दगडाच्या जमिनीत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी आढळून येते व पावसामुळे त्यांची धूपही जास्त होते. गाळाच्या जमिनीत मात्र चिकण मातीचे प्रमाण ५०% असून ती सिलिका द्रव्याने युक्त असते. किनाऱ्यावरील जमिनीत क्षारांचे प्रमाण जास्त आहे.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/22/2020