राजस्थान राज्यातील धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर. लोकसंख्या २,६२,४८० (१९७१). अरवलीशाखांपैकी तारागड डोंगराच्या पायथ्याशी, अनासागर तलावाकाठी ते वसलेले आहे. अजयमेरूवरून इ.स. १४५ मध्ये नाव पडले असावे. अजयपाल चौहानाने ह्याची खूप वाढ केली, म्हणून त्यानेच ते वसविले असल्याचे सांगण्यात येते. तारागड डोंगरावरील तारागड किल्ला यानेच बांधला असावा. चौहान राजपुतांची राजधानी या ठिकाणी होती.
अकबरापूर्वी मुसलमानांच्या लूटमारीत हे शहर नेहमी सापडत असे. परंतु १५५६ मध्ये अकबराच्या ताब्यात गेल्यावर मात्र गुजरात व राजपुताना जिंकण्याच्या दृष्टीने या ठिकाणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याने आपल्या सैन्याचे प्रमुख ठाणे येथे ठेवले. जुन्या किल्ल्याची डागडुजी केली व आणखी एक भक्कम किल्ला बांधला. याच वेळी चिस्ती या मुसलमान साधूच्या दर्ग्यामुळे ते मुसलमानधर्मीयांचे पवित्र ठिकाण झाले होते.
अकबर बादशहा दर वर्षी तेथे जात असे. जहांगीर, शहाजहान व नंतरच्या बादशहांनी शहराचे पावित्र्य कायम राखण्याकडे लक्ष दिले व शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न केला. जहांगीरने इंग्लंडच्या पहिल्या जेम्सच्या राजदूताची भेट येथील किल्ल्यात घेतली. मोगलांच्या नंतर अजितसिंग राठोडाकडे व काही वर्षे मराठ्यांकडे हा भाग होता. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी हे शहर ताब्यात घेतले.
ब्रिटिशांच्या कारकीर्दीत अजमीर-मारवाड हा भाग चीफ कमिशनरच्या ताब्यात होता. स्वातंत्र्यानंतर काही काळ हीच स्थिती होती. राजस्थान-राज्यनिर्मितीनंतर (१९५६) हा भाग त्या राज्यात विलीन करण्यात आला.
सध्या अजमीर जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण असून पश्चिम रेल्वेचे प्रस्थानक आहे. अजमीर जयपूरच्या नैर्ऋत्येस १३२, मुंबईच्या उत्तरेस ९८२ व दिल्लीच्या दक्षिणेस ४४४ किमी. अंतरावर आहे. ते राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर समजले जाते. अजमीर येथे मोठे रेल्वे वर्कशॉप असून तेथे सुती व गरम कापडाच्या आणि तेलाच्या गिरण्या आहेत. भरतकाम, कापड रंगविणे, लाकडावरील कोरीवकाम ह्या उद्योगधंद्यांसाठी ते प्रसिद्ध असून सांभर व रामसूर येथील मिठाची ही बाजारपेठ आहे. अजमीर शैक्षणिक संस्थांसाठीही प्रसिद्ध आहे. राजपुत्रांसाठी पब्लिक स्कूलच्या धर्तीवर १८७० मध्ये बांधलेले मेयो कॉलेज येथे असून राज्यशिक्षणसंस्था, लष्करी शाळा आणि अनेक महाविद्यालये आहेत. १८६९ पासून या ठिकाणी नगरपालिका आहे. फॉय नावाच्या तलावातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. हिंदू, मुसलमान, शीख, जैन, ख्रिस्ती अशा सर्व धर्मांचे लोक येथे राहतात व ते हिंदी आणि राजस्थानी भाषा बोलतात. अजमीर आज ⇨ ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती ह्यांच्या दर्ग्यात दर वर्षी भरणाऱ्या उरुसाकरिता प्रसिद्ध आहे. निरनिराळ्या धर्मांचे हजारो लोक त्यासाठी येतात. जुन्या इमारतींसाठी अजमीर प्रसिद्ध आहे. त्यांपैकी एक म्हणजे ‘अढाई दिनका झोपडा’. भव्य कमानींची ही लहानशीच पण सुंदर इमारत आहे. जुन्या संस्कृत पाठशाळेचे खांब तसेच ठेवून इतर इमारत महंमद घोरीच्या आदेशानुसार अडीच दिवसांत बांधली, असे म्हणतात. कमानींवर खालपासून वरपर्यंत वेलबुट्टीसारखी नक्षी दिसते. ती कुराणातली वचने आहेत. थोडेफार कोरीवकामही येथे पहायला मिळते. अकबराने बांधलेल्या किल्ल्यातील ‘मॅगझिन हॉल’ मधील ‘राजपुताना म्यूझियम’ प्रेक्षणीय आहे. प्राचीन शिल्पकृती, राजपूत कालखंडातील चित्रे या ठिकाणी पहावयास मिळतात. दोन टेकड्यांमध्ये बांध घालून अनाजी चौहान या राजाने बाराव्या शतकात बांधलेला ‘अनासागर’ तलाव व त्याच्याजवळ जहांगीरने बांधलेली ‘दौलतबाग’ (सध्याची सुभाषबाग) ही अजमीरची सौंदर्यस्थळे होत. शहाजहानने तलावाकाठी संगमरवरी कठडा व पाच विश्रामस्थाने बांधून येथील शोभा वाढविली आहे. अनासागरापासून थोड्या अंतरावर फॉय तलाव, ‘अंतेडकी माता मंदिर’, दिगंबर जैनांच्या आचार्यांचे निर्वाणस्थाल व त्यांचे शिलालेख असलेले चबुतरे अथवा छत्र्या असून विसला तलावाजवळ श्वेतांबर जैनांची पवित्र ‘दादावाडी’ व मंदिरे आहेत. याशिवाय शहराभोवती अनेक रमणीय ठिकाणे आहेत. मोठाले रस्ते व भव्य इमारती यांमुळेही शहरास शोभा प्राप्त झाली आहे. (चित्रपत्र ६७) दातार, नीला स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020