भारतातील लोकसंख्येत पहिल्या क्रमांकाचे व क्षेत्रफळात चौथ्या क्रमांकाचे राज्य. क्षेत्रफळाचे २,९४,४१३ चौ. किमी.लोकसंख्या ८,८३,४१,१४४ (१९७१). २३०५२' उ. ते ३१०१८ उ. आणि ७७०३ पू. ते ८४०३९ पू. याच्या वायव्येस हिमाचल प्रदेश, उत्तरेस तिबेट व नेपाळ, पूर्वेस नेपाळ व बिहार, दक्षिणेस मध्य प्रदेश आणि पश्चिमेस राजस्थान, दिल्ली व हरयाणा आहे. लखनौ ही राज्याची राजधानी आहे.
उत्तर प्रदेशाचे चार नैसर्गिक विभाग पडतात
(अ) उत्तरेकडील हिमालयाचा पर्वतीय प्रदेश हा एखाद्या प्रचंड भिंतीसारखा पूर्व पश्चिम पसरला आहे अगदी उत्तरेस सरासरी ६,१०० मी. उंचीच्या मुख्य हिमालयश्रेणी असून त्यात कामेट, त्रिशूल, नंदादेवी यांसारखी उत्तुंग शिखरे आहेत त्यांच्या अलीकडे सरासरी ३,७२० मी. उंचीच्या मध्य हिमालयाच्या श्रेणी आणि त्यांच्या दक्षिणेस सरासरी १,५५० मी. उंचीच्या बाह्य हिमालय किंवा शिवालिक पर्वतश्रेणी असून त्यांत नैनिताल, मसूरी, अलमोडा, रानीखेत यांसारखी गिरिस्थाने आहेत. शिवालिक रांगां मधील ‘दून’ नामक उत्तम हवा पाण्याच्या व सुपीक खोर्यांना उत्तर प्रदेशाचे उद्यान म्हणतात. यांच्याही दक्षिणेस पसरलेल्या पायथा टेकड्या शिवालिक रांगांचेच फाटे आहेत व त्यांना लागूनच नद्यांनी वाहून आणलेल्या दगडवाळूचा ‘भाबर’ पट्टा पश्चिमेस सु. ३२ किमी. रुंद असून पूर्वेकडे अरुंद होत गेला आहे. त्याच्या खालून जलप्रवाह वाहतात.
(आ) तराई भाबर पट्ट्यातील भूमिगत प्रवाह ज्या भूप्रदेशात पुन्हा वर येतात, त्याचे नाव तराई असून त्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे तो डबकी, सरोवरे, उंच गवत व दाट जंगलांनी व्यापलेला आहे. तराईमधील हवा दमट व मच्छरांच्या उपद्रवाने रोगट आहे. त्यामुळे तेथे वस्ती कमी असून पिके काढण्यासाठी पर्वतप्रदेशातून व मैदानभागातून हंगामापुरते येणारे लोक कापण्या होताच परत जातात. तराई संपून गंगेचे मैदान ज्या सीमेवर सुरू होते त्या सीमेवर सहारनपूर, पीलीभीत, बहरइच, गोरखपूर अशी शहरे आहेत आणि त्यांच्या आधारावर तराईतील झाडी व दलदल कमी करून शेतीयोग्य जमीन वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
(इ) गंगेचे मैदान हा उत्तर प्रदेशाचा अधिकांश भाग आहे. गंगा व तिला मिळणार्या यमुना, रामगंगा, घागरा इ. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने हा सपाट, जलसमृद्ध व सुपीक विभाग बनलेला आहे. सहारनपूरपासून अलाहाबादपर्यंत समुद्रसपाटीपासून २५० ते १२५ मी. उतरत आलेले व वार्षिक सरासरी १०० सेंमी. पावसाचे क्षेत्र हे गंगेचे वरचे मैदान असून यात मुख्यतः गंगा-यमुना दुआबाचा अंतर्भाव होतो. गंगेचे मधले मैदान अलाहाबादपासून पूर्वेस बिहारची राजधानी पाटणापर्यंत पोहोचते. याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान १०० ते १५० सेंमी. असून घागरा, गंडक, शोण इ. उपनद्या गंगेत विपुल पाणी आणून ओततात; तथापि त्यांना महापूर येतात आणि त्यांचा गाळ साचून पात्रेही बदलत राहतात. त्यामुळे गंगेच्या मध्य मैदानात अनेक तुटक जलाशय, दलदली आणि खाजणे निर्माण झाली आहेत.
(ई) दक्षिणेचा पठारी प्रदेश हा दोन प्रकारांचा आहे. एक झांशीभोवतालच्या मध्य प्रदेशाच्या बुंदेलखंड पठाराचा ‘नीस’ खडकाचा भाग आणि दुसरा त्याच्या पूर्वेस विंध्याचल श्रेणीचा शोण नदीच्या उत्तर-दक्षिणेचा प्राचीन खडकांचा भाग याच्या उत्तरेच्या मिर्झापूरवरून याला मिर्झापूर पठार म्हणतात. हा प्रदेश उंचसखल असून तुटक खडक, सुटे डोंगर व लहान लहान दर्या यांचा बनलेला आहे.
मुख्य हिमालय पर्वतप्रदेश अनेक जातींच्या प्राचीन खडकांचा, बाह्य हिमालय मागाहून वर आलेल्या नदीनिक्षेपांचा आणि पायथाटेकड्या वाळू-मुरुमाच्या आहेत. हिमालयाच्या रांगा घड्या पडलेल्या पर्वताच्या असून त्याला उंच ढकलणारी भूशक्ती अजून जागृत असल्याने त्या भागात भूकंपाचा संभव नेहमी असतो. जास्त जाडीची दून खोरी हे नदीगाळाचे प्रदेश आहेत आणि गंगेचे मैदान हा तर ९०० मी. हून जास्त जाडीच्या गाळाचा थर आहे. जुन्या गाळाचे पुरांच्या पाण्यापासून सुरक्षित प्रदेश ते बांगर व पुराखाली जाणारे ते खादर अशा स्थानिक संज्ञा आहेत. अतिप्राचीन खडकांचा मिर्झापूर पठारप्रदेश अनेक नद्यांनी कोरून काढलेला आहे. शोण नदीच्या उत्तरेकडचा भाग विंध्य पठाराच्या अवशिष्ट पर्वतांचा असून त्यात मुख्यतः सिकताश्म, थरांचे अनेक खडक व चुनखडक आहेत; दक्षिणेकडचा भाग सातपुड्याच्या पूर्वरांगांतील अग्निजन्य व रूपांतरीत खडकांचा आहे. बुंदेलखंडातील खडक प्राचीन ग्रॅनाइट व नाईस जातीचे आहेत.
उत्तर प्रदेश अधिकांश नदीगाळाचा असल्यामुळे ती थोडीबहुत खनिजे सापडतात ती डोंगराळ भागात. नैनिताल, झांशी व मिर्झापूर जिल्ह्यांत थोडे लोहधातुक आढळले आहे. अलीकडे जिप्सम गढवाल जिल्ह्यात, मॅग्नेसाइट, तांबे व शिसे अलमोडा व गढवाल, टेहरी-गढवाल वगैरे जिल्ह्यांत आणि फॉस्फोराइट गढवाल व डेहराडून जिल्ह्यांत मिळण्याची शक्यता दिसली आहे पण वाहतुकीच्या व इतर अडचणींमुळे ही खनिजे काढणे अद्याप नफ्यात पडत नाही.
खनिज तेलाचाही मोठा संचय हिमालयात असेल असे अनुमान आहे. चुनखडक व स्लेट (पाटीचा खडक) हिमालयाच्या वेगवेगळ्या भागांत मिळतात. लोहधातुक व कनिष्ठ प्रतीचा कोळसा मिर्झापूर पठाराच्या सिंगरौली भागात उपलब्ध आहे, पण उत्पादन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासारखे नाही. चुनखडक मात्र या क्षेत्रात भरपूर असून चुर्क येथे सिमेंटचा एक मोठा कारखाना चालत आहे त्याशिवाय चुन्याचे व इमारतींच्या सजावटीत उपयोगी अशा नानारंगी चुनखडींचेही उत्पादन बरेच होते.
विंध्य पर्वतरांगेतील सिकताश्म बांधकामाच्या दगडांसाठी उपयुक्त असल्याने त्याचा वापर राज्यात पुष्कळ होतो व मिर्झापूर जिल्ह्यात त्याच्या अनेक खाणी आहेत. मैदानी भागात रस्त्यांना उपयोगी मुरुम, चिकण माती व काचेसाठी लागणारी वाळू भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. भारतातील सिलिका वाळूचे ८०% उत्पादन उत्तर प्रदेशात होते. लोणा आलेल्या जमिनीवरच्या खारापासून सोरा-उत्पादन होते. झांशी जिल्ह्याच्या चरखरी तालुक्यात पूर्वी हिरेही सापडले आहेत.
दून खोऱ्यातील व गंगामैदानातील गाळमाती सुपीक आहे. नद्यांच्या किनार्यालगत खादर माती बारीक रेतीमिश्र असेल आणि बांगर भागात पाण्याचा निचरा नीट असेल तर दगड खड्यांच्या थरावर दुमट माती असते. रेताड, दुमट, चिकण आणि मिश्रजातींच्या मृदा राज्यात सर्वत्र आढळतात. पूर्वभागाच्या सखल प्रदेशात चिकण व काळी माती असून ती पाटाच्या पाण्यावर चांगली पिके देते.
बुंदेलखंड पठारभागाच्या आणि फत्तेगढ, कानपूर व अलाहाबाद जिल्ह्यांत सापडणार्या ‘काबर’, ‘राकर’ , ‘परवा’ , ‘मार’ अशा जातींच्या मृदा तुलनेत कोरड्या पण सुपीक असतात. निर्जल भागातील रेह नावाची खार माती नापीक असते, ती गंगा-घागरा दुआबात अधिक प्रमाणात आढळते. चंबळ, बेटवा, यमुना, गोमती या नद्यांच्या खोर्यांत मातीची धूप होऊन मोठमोठ्या घळी व खड्डे तयार झाले आहेत.
राज्याची मुख्य नदी गंगा. तिला डाव्या अंगाने रामगंगा, गोमती, व घागरा आणि उजव्या बाजूने यमुना या नद्या मिळतात. टेहरीगढवालमध्ये गंगोत्रीला उगम पावली, तरी अलकानंदा-भागीरथी संगमापासून गंगा ही गंगा म्हणून सुरू होते, ती हरद्वारजवळ मैदानात उतरून राज्याच्या आग्नेयीस वाहत जाते. यमुनेचा उगम गंगेच्या पश्चिमेस होऊन ती राज्याच्या पश्चिम सीमेवरून काही अंतर वाहून अलाहाबादजवळ गंगेला मिळते. दक्षिण पठारी भागातून यमुनेला चंबळ, सिंद, बेटवा व केन या नद्या मिळतात. मिर्झापूर जिल्ह्यातून शोण नदी पश्चिमपूर्व वाहते तिला मिळणार्या रिहांड नदीवरच्या धरणामुळे झालेला जलाशय अधिकांश उत्तर प्रदेशात येतो. त्याखेरीज मोठे जलसंचय या राज्यात नाहीत.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/20/2020