सोळाव्या शतकापर्यंत सिंध-गुजरातचे राज्यकर्ते कच्छवरही अंमल चालवीत. नवव्या शतकात सिंधमधील सम्मा राजपुतांचा कच्छशी संबंध आला. त्यांच्याच एका शाखेतील जाडेजा राजपुतांपैकी खेंगारने सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस स्वायत्त संस्थान स्थापिले. राजधानी भूज येथे होती. जहांगीरने हाज यात्रेकरूंच्या कच्छी जहाजातील मुक्त प्रवासाच्या बदल्यात खंडणी माफ केली; टाकसाळीचा परवाना दिला. प्रागमल (१६९८), लाखो (१७४१) या राजपुत्रांनी गादी बळकावण्यासाठी कारस्थाने केली. लाखोने मोगलांकडून माहीमरातिबचा मानही मिळविला (१७५७). १७३० मध्ये गुजरातच्या सरबुलंदखानाने आणि १७६२ मध्ये सिंधच्या गुलामशाह काल्होराने केलेल्या स्वाऱ्यांचा यशस्वी प्रतिकार झाला. अठराव्या शतकात कलावंत रामसिंग मालम याने कलावैभव कळसाला नेले,राजकारणावर दिवाण देवकरण, त्याचा मुलगा पुंजासेठ यांचा प्रभाव राहिला. महाराव गोदजी (१७६१ - ७८) याने फौज वाढवली. व्यापाराला उत्तेजन दिले,मांडवीला ४०० जहाजांचा ताफा राहू लागला. दुसऱ्या रायधनच्या (१७७८ - १८१३) काळात बजबजपुरी माजून सत्ता समादार फतह मुहम्मदच्या हाती गेली. चाचेगिरीला पायबंद घालण्यासाठी इंग्रजांनी हस्तक्षेप करून (१८०९) कच्छला मांडलिक संस्थान बनवले (१८१६, १८१९). तहान्वये भयताना (महारावचे भाऊबंद) दिलेले महत्त्व एकोणिसाव्या शतकात भोवले. त्यांचे उत्पन्न व अधिकार महारावपेक्षाही अधिक असत. मिठाच्या निर्यातीवर बंदी, मोरवीशी अढोईसाठी शतकभर चाललेला झगडा, काठेवाडातील संस्थानांचे वाढते नाविकी महत्त्व ही कच्छच्या प्रगतीला मारक ठरली. तरी भ्रुणहत्या, गुलामगिरी (विशेषत: झांझिबारशी संबंधित), सती पध्दती यांना आळा बसला आणि शिक्षण, वाहतूक, पाणीपुरवठा इ. सुधारणा झाल्या. तिसऱ्या खेंगारने (१८७८ -१९४२) रापड,भाचौ, मुंद्र, भूज, मांडवी, अब्दासा, लखपत, अंजार, नख्तराना असे शासकीय विभाग पाडले, चराऊ कुरणे राखीव केली व कांडला बंदराचा पाया घातला. सतरावे महाराव मदनसिंहजी यांनी विलीनीकरणाला मान्यता दिली (१ जून १९४८). १९५६ पर्यंत कच्छ मुख्यायुक्ताचा प्रांत व १९६० पर्यंत द्विभाषिक मुंबई राज्याचा एक भाग होता. त्यानंतर कच्छ गुजरात राज्यात समाविष्ट झाले. १९६५ मध्ये सिंध-कच्छचा सीमाप्रश्न चिघळला आणि पाकिस्तानने कच्छवर हल्ला केला. आंतरराष्ट्रीय लवादमंडळाने रणाचा सु. ८३७ चौ. किमी. भाग पाकिस्तानला दिला. सीमांकन १९६९ मध्ये पूर्ण झाले. १९७१ च्या भारत-पाक संघर्षात भारताने यातील बहुतेक मुलूख परत मिळविला. परंतु सिमला कराराने तो परत पाकिस्तानला मिळाला.
संदर्भ : Williams, L. F. Rushbrook, The Black Hills, London, 1958.
ओक, शा. नि; खरे, ग. ह.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/3/2020
इस्लामी वास्तुकलेच्या झालेल्या परिणामांतून भारतीय-...
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील विद्यापीठ.
गुजरात राज्यातील एक प्रसिद्ध विद्यापीठ.
गुजरात राज्यातील शुद्ध आयुर्वेदीय शिक्षण देणारे प्...