অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कर्नाटक राज्य

कर्नाटक राज्य

भारतीय संघराज्यातील एक घटक राज्य. १९५६-१९७३ म्हैसूर या नावाने प्रसिद्ध. क्षेत्रफळ १,९१,७७३ चौ. किमी. लोकसंख्या २,९२,९९,०१४ (१९७१); ११० ३०’उ. ते १८० २७’उ. व ७४० ६’ पू. ते ७८० ३ ६’पू. दक्षिणोत्तर विस्तार सु. ७५० किमी., पूर्वपश्चिम विस्तार सु. ४०० किमी. व किनारा सु. ३०० किमी. याच्या उत्तरेस महाराष्ट्र, पूर्वेस आंध्र प्रदेश, आग्नेयीस व दक्षिणेस तमिळनाडू, नैऋत्येस केरळ, पश्चिमेस अरबी समुद्र व वायव्येस गोवा राज्य आहे. भारतात क्षेत्रफळाच्या व लोकसंख्येच्याही दृष्टीने आठवे राज्य असलेल्या कर्नाटकची राजधानी बंगलोर आहे.

भूवर्णन

भूवैज्ञानिक दृष्ट्या कर्नाटक प्राचीन, कठीण, स्फटिकी खडकांचा स्थिरप्रदेश असून भूकंप व भूमिपात यांची भीती जवळजवळ नाहीच. पृथ्वीचे कवच बनले त्यावेळेसच कर्नाटकचा ढालप्रदेश बनला. त्यानंतर या भागात झालेल्या अनेक भूगर्भीय घडामोडींमुळे येथे विविधता आढळते. येथील बहुतांशी भाग डेक्कन ट्रॅपचा असून धारवाड, कुर्नूल, कडप्पा,कलादगी, भीमा इ. प्रणालींचे निक्षेप येथे आढळतात. भौगोलिक दृष्ट्या राज्याचे तीन प्रमुख भाग पडतात : पश्चिमेकडील किनारपट्टी,सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश आणि पूर्वेचे विस्तीर्ण पठार, पश्चिमेकडील किनारपट्टी सखल व अरुंद (उत्तरेकडे १३-३२ किमी. तर दक्षिणेकडे ४८-६४ किमी.) असून त्यावर जांभा खडकाची लहानलहान पठारे आहेत. किनार्‍यावर वाळूचे दांडे व पुळणीचे पट्टे आहेत. पूर्वपश्चिम वाहणार्या नद्यांची खोरी सखल असून त्यांचा वरचा भाग सुपीक आहे. किनार्‍यावरील खाड्या दळणवळणाच्या दृष्टीनेसोयीस्कर आहेत.

सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश दक्षिणोत्तर पसरलेला आहे. याची सरासरी उंची सु. ६००-१,००० मी. आहे. घाटाच्या पायथ्याकडीलभागास मलनाड असे म्हणतात. घाटाच्या पश्चिमेकडील उतार बहुतांशी खड्या चढणीचा व तुटलेल्या कड्याचा आहे. पूर्वेच्या बाजूलागेलेले त्याचे फाटे म्हणजे अवशिष्ट पर्वतांच्या रांगा होत. कड्यावरून वाहणार्‍या अनेक पश्चिमवाहिनी नद्यांच्या मार्गांत धबधबेअसून या नद्यांपैकी शरावती, काळी या नद्या विशेषतः उल्लेखनीय आहेत.

सह्याद्रीच्या प्रमुख श्रेणीस काही स्थानिक नावे प्रचलितआहेत. उंची व निसर्गसौंदर्य यांसाठी बाबा बुढण डोंगर (१,९२३ मी.), मल्लिआनगिरी व कुद्रेमुख प्रसिद्ध आहेत. नंदी व केमेनगुडी हीप्रसिद्ध गिरिस्थाने आहेत. देवीमने, अगुंबे, शिराडी, चारमाडी इ. घाटमार्गांनी पठार किनारपट्टीशी जोडले गेले आहे.

पूर्वेचे विस्तीर्ण पठार बैलसीमे या नावाने ओळखले जाते. त्याची सरासरी उंची ४०० मी. आहे. याचा उत्तर भाग मैदानी तर दक्षिणभाग खडकाळ आहे. तथापि सर्वच भागांत अवशिष्ट पर्वतरांगा असून उत्तरेकडील मलप्रभा-घटप्रभा नद्यांजवळील डोंगर वदक्षिणेकडील नंदी डोंगर हे त्यांपैकीच होत.

नद्या

सह्याद्री पर्वताची रांग हा कर्नाटकचा मुख्य जलविभाजक भाग असल्याने, तेथून पश्चिमेकडील भागाचे जलोत्सारणअरबी समुद्रास व पूर्वेकडील भागाचे बंगालच्या उपसागरास होते. पश्चिमवाहिनी नद्या संख्येने बर्‍याच असल्या, तरी प्रत्येकीचे खोरेतीव्र उताराचे पण मर्यादित असून त्यांच्या पाण्याचा प्रवाह ऋतुमानाप्रमाणे पावसाळ्यात अत्यंत वेगाचा व इतर ऋतूंत संथ वआखुडलेला असतो. यांपैकी काळी, गंगावळी, शरावती, बेडती, ताद्री व नेत्रावती या मुख्य नद्या आहेत. सह्याद्रीच्या कड्यावरूनकिनारपट्टीवर त्यांचे प्रवाह कोसळत असल्यामुळे, जगप्रसिद्ध गिरसप्पा अथवा जोग (२५३ मी. उंच) व इतर लहानसहान धबधब्यांनीहा प्रदेश सुशोभित झाला आहे. शरावतीवर विद्युत्‌ उत्पादनाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू झाले असून त्या प्रकारचा प्रकल्प काळीनदीवर योजला आहे.

पूर्ववाहिनी नद्यांपैकी कृष्णा आणि तिच्या मुख्य उपनद्या घटप्रभा, मलप्रभा व तुंगभद्रा यांच्या पाणलोटाचा प्रदेश पठाराच्या६०% क्षेत्रफळाचा आहे. घटप्रभेवरील गोकाकजवळील धबधबा सौंदर्य आणि विद्युत्‌ निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे. दुसरा प्रदेश म्हणजेदक्षिणेकडील कावेरी व तिच्या उपनद्या शिंशा, अकविती व कब्बनी (कपिला) आणि पेन्नार व पोईयार यांच्या पाणलोटाचा प्रदेश.कावेरीचे गगनचुक्की व भारचुक्की हे दोन प्रवाह ९७ मी. वरून पडून प्रसिद्ध शिवसमुद्रम धबधबा बनला असून, येथे भारतातील पहिलीजलविद्युत्‌ निर्मिती झाली. कावेरी ही दक्षिणेकडील गंगा; तिच्यामधील तीन प्रसिद्ध बेटे ही श्रीरंगाची वसतिस्थाने : आदिरंगाश्रीरंगपटण येथे व मध्यरंगा शिवसमुद्रम्‌ येथे असून तिसरे श्रीरंगा तमिळनाडूत आहे.

कर्नाटकातील पूर्ववाहिनी नद्यांची खोरी विस्तीर्ण असून प्रवाहाची पात्रेही मोठी आहेत. ऋतुमानाप्रमाणे प्रवाहात फारच फरक होतअसल्याने त्या नद्यांचा जलवाहतुकीस उपयोग जवळजवळ नाहीच; पण जलसिंचनाकरिता अशा नद्यांवर सोयीच्या ठिकाणी बांधघालावे लागतात. जवळजवळ सर्वच मुख्य नद्यांवर असे बांध घालून कालव्याने जलसिंचन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. उत्तरकर्नाटकातील अगदी कमी पर्जन्य असलेल्या भागात डोण व बेण्णीहळ्‌ळा हे दोन खारे स्थानिक प्रवाह आहेत.

मृदा

कर्नाटकात ‘रेगूर’ व रेतीयुक्त ‘लाल माती’ हे मृदांचे दोन मुख्य प्रकार आढळतात. रेगूरचा विस्तार प्रामुख्याने उत्तरकर्नाटकात बेसाल्टच्या प्रदेशात आहे. रेगूरमध्ये रंगाप्रमाणे अत्यंत सुपीक काळी, भुरट्या रंगाची, मध्यम व करड्या रंगाची कनिष्ठअशी प्रतवारी दिसून येते. कनिष्ठ प्रतीच्या मृदा ‘मुरूम’ म्हणून ओळखल्या जातात. रेगूरमधील ओलावा जास्त दिवस टिकून रहातअसल्याने रब्बी पिकांना अशा मृदांच्या विभागात जास्त महत्त्व आहे.

रेतीयुक्त लाल रंगाची माती प्रामुख्याने घटप्रभा-मलप्रभानद्यांच्या जवळील अवशिष्ट डोंगरभागात व दक्षिणेस ग्रॅनाइटने व्यापलेल्या प्रदेशात आढळून येते. उत्तरेकडील मृदा जास्त लालरंगाची व दक्षिणेकडील फिकट रंगाची आहे. पण एकूण ही मृदा रेगूरपेक्षा कमी कसाची असते.

अन्य स्थानिक प्रकारच्या मृदांपैकीधारवाड खडकांवरील पिवळी शाडूची मृदा, ठिकठिकाणी दर्‍याखोर्‍यांत साचणारी गाळाची मृदा, किनारपट्टीवरील पुळणीची मृदा वजांभा दगडापासून उद्भवलेली लाल-जांभळी माती या विशेष महत्त्वाच्या आहेत. जांभा दगडावरील माती व काळ्या मातीच्या प्रदेशात,लोण चढलेली माती हे राज्यातील अगदी निकृष्ट मृदांचे प्रकार आहेत.

खनिजे

या राज्यात नाना तऱ्हेची खनिजे उपलब्ध होतात. लोहधातुकाच्या खाणी मुख्यत्वे बेल्लारी जिल्ह्यात असून चित्रदुर्ग,चिकमंगळूर आणि उत्तर कॅनरा (कानडा) ह्या भागांतही काही प्रमाणात लोहधातुक सापडते. चुनखडीच्या खडकाचे साठे मुख्यत्वेगुलबर्गा, तुमकूर व विजापूर या जिल्ह्यांत असून त्यांना सिमेंट उद्योगामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

उत्पादनात ह्याखनिजाचा दुसरा क्रमांक लागतो. मँगॅनीज ह्या धातूचा तिसरा क्रमांक लागतो. बेल्लारी जिल्ह्यात, विशेषतः सांडूर भागात, मुख्यउत्पादन होते. उत्तर कानडा व शिमोगा भागांतही ह्या धातूचे उत्पादन बर्‍याच प्रमाणात होते. सुप्रसिद्ध कोलार खाणीतून सोन्याचेउत्पादन होते.

रायचूर जिल्ह्यातही काही ठिकाणी सोने काढले जाते. क्रोमाइट उत्पादनात या राज्याचा भारतात ओरिसानंतर क्रमलागतो. ह्या धातूचे उत्पादन हसन जिल्ह्यात होते. याव्यतिरिक्त क्वॉर्टझ (शिमोगा), बॉक्साइट (बेळगाव), मॅग्नेसाइट (म्हैसूर वकूर्ग), ऍस्बेस्टस (हसन), थोड्या प्रमाणात रुपे (कोलार व रायचूर); तसेच तांबे, शिसे, चिनी माती यांचे उत्पादन होते.

अर्थातच व्यापारीसंदर्भात सोन्याला व औद्योगिक धंद्यात लोह, मँगॅनीज व चुनखडीचे खडक या कर्नाटकातील खनिजांचा विशेष स्थान आहे. ग्रॅनाइटव बेसाल्टचा उपयोग मुख्यत्वे इमारती व रस्ते तयार करण्यास होतो.

श्रवणबेळगोळची श्री गोमटेश्वराची भव्य मूर्ती, बंगलोरमध्येअगदी अलीकडे बांधलेली विधान सौध इमारत तसेच विजयानगर, हळेबीड, बादामी अशा ऐतिहासिक व पुरातात्त्विक महत्त्वाच्याठिकाणच्या वास्तूंत या दोन्ही खनिजांचा सुंदर उपयोग केला आहे. त्याचप्रमाणे बेलूरचे सुप्रसिद्ध चेन्नकेशव मंदिर, हे बळूच्या दगडाचा(सोपस्टोन) सुंदर कोरीव कामासाठी कसा उपयोग केला जातो, याची साक्ष देते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate