पश्चिम बंगाल राज्यात ईशान्येतील जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या कुचबिहार ५३,६८४ व उपनगर गुडियाहाती८,९८०(१९७१). पूर्वी कोचवंशी यांच्या संस्थानी राज्याची ही राजधानी होती. तोरसा नदीच्या उजव्या तीरावर हे असून नगराची रचना आकर्षक व टुमदार आहे. अनेक सुंदर उद्याने व तलाव येथे असून संस्थानी काळातला राजवाडा, व्हिक्टोरिया कॉलेज वगैरे काही इमारती भव्य आहेत. सिलीगुडीहून अलीपूर दुआर्समार्गे ईशान्य सीमा लोहमार्गाने १८६ किमी. वर कुचबिहारला जाता येते. येथे विमानतळ असून कलकत्ता व शिलाँगशी नियमित वाहतूक आहे. येथून राज्यवाहतूक बसगाड्यांनी आसपासच्या सर्व शहरांशी दळणवळण चालते. विश्रांती-विहारासाठी आणि नजीकच्या जंगलातील वाघ, हत्ती, गवा इत्यादींच्या शिकारीसाठी कुचबिहारला सोयी आहेत. बांगला देशाला लागून असल्याने कुचबिहारला महत्त्व आले आहे.
ओक, शा. नि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020