অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गिलगिट

गिलगिट

गिलगिट

वायव्य काश्मीरमधील पूर्वीचा डोंगराळ जिल्हा. क्षेत्रफळ ८,०६० चौ. किमी. लोकसंख्या ३९,५२१ (१९४१). यापैकी काही भाग १९३४ मध्ये ब्रिटिशांनी रशियाच्या धास्तीने काश्मीरच्या महाराजाकडून दडपणाने भाडेपट्ट्याने घेऊन तेथे फौजफाटा ठेवला. बाकीचा गिलगिट वझारत म्हणजे हल्लीचा अस्तोर जिल्हा.

१८७८ पासून ब्रिटिश गिलगिट एजन्सीत असलेला ३८,०२१ चौ. किमी.चा ७६,५२६ (१९४१) लोकवस्तीचा प्रदेश १९४७ मध्ये पुन्हा काश्मीरच्या महाराजाकडे आला; परंतु तेथील सर्व संस्थाने पाकिस्तानला मिळाली. पाकिस्तानच्या गिलगिट एजन्सीत गुपिस, पुनियाल, अश्कुमान व यासीन जिल्हे, गिलगिट व अस्तोर उपविभाग, हुंझा व नगरसंस्थाने आणि चिलास सब एजन्सी एवढा प्रदेश आहे. प्राचीन दार्द लोकांच्या या प्रदेशात बौद्ध धर्माचा प्रभाव होता, तेव्हा त्याला सारगिन म्हणत.

नंतर गिलिट व गिलगिट नावे पडली. शेवटच्या श्रीबादल हिंदू राजानंतर

याखेन मुस्लिम घराण्याची, १८४२ नंतर पाच वर्षे शिखांची व त्यानंतर काश्मीरच्या डोग्रा राजांची सत्ता येथे होती. गिलगिट व हुंझा नद्यांच्या संगमाजवळ १,४९१ मी. उंचीवर मोक्याच्या जागी वसलेले गिलगिट हे पूर्वीपासून येथील मुख्य ठाणे आहे. ते राजदिआंगन व बुर्झिल खिंडीमार्गे श्रीनगरशी व बाबुसर खिंड आणि सिंधू नदीमार्गाने पाकिस्तानशी जोडलेले आहे.

गिलगिट नदीतीरी किल्ला व डाव्या तीरावर जाण्यासाठी झुलता पूल आहे. पाकिस्तानचे हसन अबदल रेल्वे केंद्र येथून ४०० किमी. आहे. गिलगिटला छोटासा विमानतळ, शाळा, बाजार इ. सोयी आहेत. येथून १०५ किमी. परिसरात ५,४९० ते ७,९३० मी. उंचीची ३२ पर्वतशिखरे आहेत. येथील हवामान थंड, कोरडे व आरोग्यप्रद आहे. पर्वतांच्या पायथ्याकडील भाग रुक्ष आहे. परंतु २,१०० ते ४,४०० मी. उंचीपर्यंत जूनिपर, फर, सिल्व्हरबर्च, पॉप्लर, पेन्सिल सीडार, पाइन इ. वृक्ष आढळतात. काही भागात गवत उगवते.

येथे आयबेक्स, मारखोर, स्नो औंस, रानकुत्रा, अस्वल इ. पशू; ग्रे पार्ट्रिज, स्नोकॉक, क्वेल, रानबदके व बरेचसे स्थलांतरी पक्षी आणि गवती भागात रानमेंढ्यांचे कळप आढळतात. वितळणाऱ्या बर्फाचे पाणी ‘कुल’ नावाच्या बांधीव छोट्या पाटांनी खेळवून त्यावर पायऱ्यापायऱ्यांच्या अरुंद पट्ट्यांत गहू, बार्ली, मका, भरड धान्ये, तांदूळ, राई, कडधान्ये इत्यादींचे व पीच, नासपती, अक्रोड, डाळिंब व मुख्यतः जरदाळू इ. फळांचे उत्पन्न काढतात.

गुरांसाठी लसूण घास लावतात. नद्यांच्या प्रवाहांत अगदी थोडे सोने सापडते. ते काढण्याचा व्यवसाय चिलासमध्ये चालतो. लोक स्वतःपुरते पट्टू नावाचे लोकरी कापड विणतात. लोक मुख्यतः सुन्नी मुस्लिम असून ते शिना किंवा पैशाची भाषा बोलतात. येथील लोक गोरे, बळकट, प्रसन्न व खेळकर असून ते दीर्घायुषी म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक देशांच्या सीमा जवळ असल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात गिलगिटला मोठे महत्त्व आहे.

 

ओक, द. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate