অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घाट

घाट

भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांना जवळजवळ समांतर असलेल्या पर्वतांच्या ओळींना उद्देशून अनुक्रमे पूर्व घाट व पश्चिम घाट अशी नावे रूढ झालेली आहेत; परंतु डोंगर या अर्थी घाट शब्द यूरोपीयांनी चुकीने वापरला आहे. आता पश्चिम घाट (वेस्टर्न घाट्स) याऐवजी सह्याद्री आणि दक्षिण घाट (सदर्न घाट्स म्हणजे पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील थेट कन्याकुमारीपर्यंतच्या पश्चिम किनाऱ्याकडील पर्वतराजी) ऐवजी दक्षिण सह्याद्री अशी नावे भारत सरकारच्या गॅझेटीअर क्र. १ मध्ये वापरली आहेत. पूर्व घाटाला मात्र पूर्व घाट (ईस्टर्न घाट्स) हेच नाव कायम ठेवले आहे.

भारतात, विशेषतः क्षेत्रांच्या गावी, नदीच्या पाण्यापर्यंत जाण्यायेण्याच्या वाटा दगडी पायऱ्यांनी बांधून काढलेल्या आढळतात. त्यांनाही घाट म्हणतात. शिलारसाच्या थरांवर थरांनी बनलेल्या सह्याद्रीच्या भागात डोंगरांचे उतार पायऱ्यापायऱ्यासारखे दिसतात, त्यावरून त्या डोंगरासच यूरोपीयांनी घाट म्हटले असावे किंवा पुढे वर्णिल्याप्रमाणे हे डोंगर चढून किंवा ओलांडून जाणाऱ्या वाटांस घाट म्हणतात आणि किनारपट्टीतील लोक डोंगरापलीकडच्या किंवा पठारावरच्या लोकांस घाटी किंवा घाटावरचे लोक म्हणतात. त्यावरूनही डोंगरासच चुकून घाट म्हटले गेले असावे.

डोंगर चढून पठारावर किंवा पलीकडे डोंगराच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी ज्या वाटा उपयोगी पडतात, त्यांनाही घाट म्हणतात. महाराष्ट्रात ही संज्ञा चांगलीच रूढ आहे; परंतु पालघाट, खैबर घाट यांतही तोच अर्थ आहे.

बहुतेक घाट त्यांच्या माथ्यावरील खिंडींतून जातात. महाराष्ट्रात सह्याद्री व त्याचे फाटे ओलांडून जाणारे अनेक घाट प्रसिद्ध आहेत. मुंबई-पुणे सडकेवर खोपोली ते खंडाळा व मुंबई-पुणे लोहमार्गावर कर्जत ते खंडाळा यांच्या दरम्यानचा बोर घाट तसेच मुंबई-नासिक सडकेवर व लोहमार्गावर कसारा व इगतपुरी यांच्या दरम्यानचा थळ घाट, हे घाट लोहमार्गांमुळे अधिक माहीत झाले आहेत.

महाराष्ट्रात व भारतात डोंगराळ भागांत हजारो घाट आहेत. त्यांतील काही केवळ पायवाटा आहेत, काही व्यापारासाठी ओझ्याची जनावरे नेण्यास उपयोगी पडत. काही घाटांतून बैलगाड्या जाऊ शकत. अलीकडे बऱ्याच महत्त्वाच्या घाटांतून मोटारी जाण्याजोगे रस्ते झाले आहेत, तर काही घाटांच्या अनुरोधाने लोहमार्ग झाले आहेत. पूर्वी महाराष्ट्रातील घाटांच्या संरक्षणासाठी आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष व ताबा ठेवण्यासाठी बऱ्याचशा घाटांच्या दोन्ही वा एका बाजूस किल्ले बांधलेले आढळतात.

महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध घाट पुढीलप्रमाणे

भडोच व सुरत ते सटाणा-पाटण-पैठण व जुन्नर-पैठण रस्त्यांवर कोंडाईवारी घाट व कसारवाडी घाट;

दमण ते सटाणा रस्त्यांवर पिंडवलवारी घाट; डांग-सटाणा रस्त्यावर बाभुळणा घाट;

सुरगाणा-कळवण रस्त्यावर कांचनमंचन व मोरकंडा घाट;

पेठ-दिंडोरी रस्त्यावर सावळ घाट; बलसाड व दमण ते पेठ रस्त्यावर राजबारी घाट;

दमण, पेठ ते नासिक रस्त्यावर सत्ती घाट;

डहाणू, जव्हार ते नासिक रस्त्यावर गोडा घाट व अंबोली घाट;

डहाणू-नासिक रस्त्यावर अव्हाट घाट;

वाडे-नाशिक रस्त्यावर शिरघाट;

सोपारा, कल्याण, चौल ते नासिक रस्त्यांवर थळ घाट, पिंबी घाट बोर घाट;

कल्याण-अकोला रस्त्यावर तोरण घाट;

शहापूर-अकोला रस्त्यावर मेंढ्या घाट व चेंढ्या घाट;

मुरबाड-ओतूर रस्त्यावर माळसेज घाट; मुरबाड-जुन्नर रस्त्यावर नाणे घाट;

मुरपाड-पोडे-आंबेगाव रस्त्यावर कोपाली घाट;

नेरळ-पनवेल ते घाडे, आंबेगाव रस्त्यावर भीमाशंकर घाट;

कर्जत ते खेड कडूस रस्त्यांवर कोळंबा घाट व सावळा घाट;

कर्जत ते आंध्र खोरे व नवलाख उंबरे रस्त्यावर कसूर घाट;

खालापूर-नाणे रस्त्यावर राजमाची किंवा कोकण दरवाजा घाट;

खोपोली ते लोणावळे-कार्ले रस्त्यावर बोर घाट;

पेण-लोणावळे रस्त्यावर उबरखिंड (घाट); चौल-पौड रस्त्यावर वाघजाई घाट;

जंजिरा-पौड रस्त्यावर ताम्हण घाट;

कोलाड-भोर रस्त्यावर लिंग घाट, देव घाट व कुंभ घाट;

माणगाव-भोर रस्त्यावर कावळ्या घाट व शेवत्या घाट;

महाड-भोर रस्त्यावर भोपे घाट, वंरधा घाट व कामठा घाट;

पोलादपुर – भोर रस्त्यावर ढवळा घाट;

महाड, पोलादपुर ते महाबळेश्वर रस्त्यावर पारघाट, फिट्झजेराल्ड घाट किंवा आंबेनळी ऊर्फ रडतोंडी घाट;

वाई-महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाट;

दापोली ते मेढे-सातारा रस्त्यावर हातलोट घाट;

खेड ते मेढे, सातारा रस्त्यावर आंबोली घाट;

दाभोळ-सातारा रस्त्यावर उत्तर तिवरा घाट;

चिपळूण, पाटण, कराड रस्त्यावर कुंभार्ली घाट;

संगमेश्वर-पाटण रस्त्यावर मळा घाट व दक्षिण तिवरा घाट;

देवरूख ते कोल्हापूर रस्त्यावर कुंडी घाट;

रत्नागिरी-साखरपे ते मलकापूर-कोल्हापूर रस्त्यावर आंबा घाट;

रत्नागिरी-मलकापूर रत्स्यावर विशाळगड घाट;

राजापूर-कोल्हापूर रस्त्यावर अणुस्कूरा घाट;

विजयदुर्ग, देवगड ते बावडा रस्त्यावर बावडा घाट;

विजयदुर्ग, देवगड ते कोल्हापूर रस्त्यावर फोंडा घाट;

मालवण-कोल्हापूर रस्त्यावर नरदाचा घाट;

मालवण-आजरे रस्त्यावर घोटगीचा घाट;

कुडाळ-आजरे रस्त्यावर रांगणा घाट;

वेंगुर्ले, सावंतवाडी ते बेळगाव रस्त्यावर आंबोली घाट;

गोवे-बेळगाव रस्त्यावर राम घाट;

गोवे-खानापूर रस्त्यावर केळ घाट;

गोवे-धारवाड रस्त्यावर किन्नई घाट;

पुणे – सातारा रस्त्यावर कात्रज घाट व खंडाळा घाट.

यांशिवाय दिवे घाट, साल्पे घाट, न्हावी घाट, कळढोण घाट, दिघी घाट, कुंडल घाट इ. अनेक घाट आहेत. वरील बहुतेक घाट सह्याद्री व त्याचे फाटे यांत आहेत.

महाराष्ट्राच्या व भारताच्या इतर डोंगराळ भागांतही असेच अनेक घाट आहेत.

रांचीच्या पठाराची झीज होऊ त्याच्या कडेला तटासारखे खडे चढ ‘कगार’ झाले आहेत. त्यांनाही स्थानिक नाव घाट असेच आहे.

 

संदर्भ : जोगळेकर, स. आ. सह्याद्रि, पुणे, १९५२.

कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate