অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जयपूर संस्थान

जयपूर संस्थान

जयपूर संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील राजस्थानमधील एक मोठे संस्थान. क्षेत्रफळ ३८,९५० चौ. किमी., लोकसंख्या तीस लाखावर (१९४१) आणि वार्षिक उत्पन्न सु. १,२९,७७,००० रुपये. उत्तरेस बिकानेर, लोहारू, पतियाळा; पश्चिमेस बिकानेर,जोधपूर, किशनगढ ही संस्थाने व ब्रिटिशांकित अजमेर जिल्हा; दक्षिणेस उदेपूर, बूंदी, टोंक, कोटा, ग्वाल्हेर व पूर्वेस करौली, भरतपूर,अलवर संस्थाने यांनी सीमित झाले होते.

दहाव्या शतकात राज्य वाढू लागलेल्या कच्छवाह राजपुतांपैकी दुल्हा राय याने अकराव्या शतकाच्या सुरुवातीस सासऱ्याकडून दूंढारची जहागीर मिळविली; त्याची राजधानी दौसा येथे होती. येथूनच संस्थानचा प्रारंभ झाला. दुल्हा रायचा मुलगा कंकल याने आमारा (आमेर) जिंकल्यावर राजधानी तेथे हलविली (१०३७). चौदाव्या शतकात उदयकर्णाने शेखावती भाग राज्याला जोडला. नंतर संस्थानचा उत्कर्ष झाला. मोगलांची एकनिष्ठ सेवा केल्यामुळे आणि त्यांच्याशी शरीरसंबंध जोडण्यासाठी बहारमलने (१५४८–७४)अकबराला आपली मुलगी दिली व पंचहजारी मनसब मिळविली. त्याचा मुलगा भगवानदास हा अकबराचा महत्त्वाचा दरबारी व मित्र होता. भगवानदासाचा दत्तकपुत्र राजा मानसिंग (१५८९–१६१४) हा मोगल साम्राज्यात अनेक सुभ्यांत अधिकारी व सेनापती होता.त्याला सातहजारी मनसब होती. मिर्झा राजा जयसिंहानेही (१६२७–६७) सर्व मोगल साम्राज्यभर त्यांच्यासाठी लढाया केल्या व औरंगजेबाची बाजू घेतली; तरीही त्याला औरंगजेबाचा विश्वास संपादता आला नाही. पुरंदरचा तह करुन शिवाजीला आग्ऱ्याला पाठविण्याची कामगिरी त्यानेच केली.

संभाजीने त्याचा मुलगा रामसिंग याचे साहाय्य मिळविण्याचा प्रयत्न केला. आसामच्या स्वारीत रामसिंगाला यश न आल्याने औरंगजेबाचा त्याच्यावरचाही विश्वास कमी झाला. मोगलांच्या पडत्या काळात ⇨सवाई जयसिंग (१७००–१७४३) याने बहादुरशाहाला गादीवर बसविण्यात मदत केली नाही, म्हणून त्याने सवाई जयसिंगाच्या धाकट्या भावाला काही काळ संस्थानावर नेमले (१७८७–८८); परंतु नंतर समझोता झाला. सय्यद-बंधूंनंतर मोगल राजकारणावर सवाईजयसिंगाचा बराच प्रभाव पडला होता. त्याने बूंदी, बिकानेर व जोधपूर यांच्या अंतःकलहांचा फायदा घेऊन राजपुतान्याच्याराजकारणावरही वर्चस्व स्थापिले. अखेरच्या काळात मराठ्यांशी मैत्री संपादून त्याने त्यास माळव्याची सुभेदारी मोगलांकडूनदेवविली. सवाई जयसिंगाने जयपूर वसवले (१७२८). तो ज्योतिर्विद असून त्याने जयपूर, उज्जयिनी, दिल्ली व काशी येथे वेधशाळाबांधल्या आणि विद्या व कला यांना आश्रय दिला.

त्याच्या मृत्यूनंतर जयपूरला उतरती कळा लागली. गादीसाठी सवाई जयसिंगाच्या मुलांत लागलेल्या तंट्यात मराठ्यांनी भागघेतला. त्यात ईश्वरसिंगाने आत्महत्या केली, तर माधोसिंग मराठ्यांचा शत्रू झाला. अब्दालीला उत्तेजन देण्यात तो एक होता.अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात शिंदे, होळकर, पवार जयपूरकडून खंडणी वसूल करीत. याच काळात जयपूरच्या मांडलिकीखालीलअलवर स्वतंत्र झाले. होळकरांनी रामपुरा घेतले. भरतपूरकराने कामा, खोडी व पहाडी परगणे घेतले. वल्लभगढने फरीदाबाद, काथोड(कातोड), कंती व नारनोळ, इंग्रजांनी होडल, पलवल, अमीरखाँ पेंढाऱ्याने टोंक घेतल्यामुळे संस्थानचा संकोच झाला. महादजी शिंद्यांचेप्रभुत्व होतेच. याचे १ कोटीच्या आसपासचे उत्पन्न ८० लाखांवर आले, तरी सरंजामदारांच्या फौजा मिळून सु. ३०,००० सैन्य होते.शिंद्यांविरुद्ध संरक्षण म्हणून संस्थानाने १८०३ मध्ये इंग्रजांशी तह केला; पण यशवंतराव होळकराला मदत केली या सबबीवरइंग्रजांनीच दोन वर्षांनी तो मोडला. पुढील १५ वर्षांत उदयपूरच्या कृष्णाकुमारीसाठी जोधपूरशी केलेल युद्ध, शिंदे-पेंढाऱ्यांची आक्रमणे,अंतर्गत बंडाळ्या यांमुळे संस्थानाची शक्ती क्षीण झाली. अखेर १८१८ मध्ये संस्थान ब्रिटिशांचे कायमचे मांडलिक झाले. संरक्षणाच्यामोबदल्यात दरवर्षी वाढत जाणारी ८ लाखांपर्यंत खंडणी व लागेल तेव्हा सैन्य जयपूरने पुरवावयाचे ठरले.

तिसरा जयसिंग अल्पवयीनअसल्याने राणीने दिवाण जोतारामाच्या मदतीने सत्ता आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा १८३५ मध्ये इंग्रजांनी शेखावती-टोडावती भाग तात्पुरता आपल्या अंमलाखाली आणला. १८४२ मध्ये खंडणी ४ लाख ठरली; पण सांभर जिल्हा कायमचा ब्रिटिश सत्तेतआला. शिवाय शेखावतीच्या संरक्षणासाठी ठेवलेल्या सैन्याचा खर्च संस्थानालाच द्यावा लागे. १८४७ मध्ये जमीन महसूल सोडूनसंस्थानचे उत्पन्न सु. ३० लाख होते. १८५७ च्या उठावात संस्थान एकनिष्ठ राहिल्याबद्दल इंग्रजांनी काही प्रदेश बक्षिसादाखल दिला.

महाराजा रामसिंग (१८३७–९०) याच्या कारकीर्दीत संस्थानच्या प्रगतीचा पाया घातला गेला. शिक्षण, आरोग्य, पोलीस यांसाठी वेगळीखाती झाली. संस्थानाचे ५ शासकीय विभाग पाडून त्यांवर नाझिम हा विभागीय अधिकारी नेमला गेला. जयपूरच्या पाणीपुरवठ्याचीव्यवस्था झाली. सती व गुलामगिरीविरुद्ध कायदे मंजूर झाले. भाट-चारणांना मिळणाऱ्या देणग्यांचे नियमन झाले. पोलीस संहितातयार झाली. कारभारासाठी १८६७ मध्ये ८ जणांचे मंडळ नेमले गेले. त्यात पुढे आणखी दोन सभासद वाढले. ब्रिटिश डाकतारपद्धतीखेरीज संस्थानची स्वतःची डाकव्यवस्था होती, तसेच झाडशाही नाणी प्रचारात होती. रेल्वे, पक्क्या सडकांची सुरुवात झाली.सांभर येथील मिठावर ब्रिटिशांची मालकी असे.

विविध जमातींच्या टोळ्यांपासून संस्थानाला बराच उपद्रव असे. संस्थानाचे स्वतःचेसु. ५,००० सैन्य, याशिवाय घोडदळ, उंटदल, तोफखाना वगैरे होता. संस्थानचा २/५ प्रदेश जहागिरीत वाटला होता. जहागिरीपैकीसामोद, चुमु, झेल्ली, उनियारा, दिग्गी या जुन्या व महत्त्वाच्या तर शेखावती भागातील खांडेल, मनोहरपूर, सीकर आणि खेमी या फारमोठ्या जहागिरी होत्या. उरलेल्या ३/५ खालसा प्रदेशाचे सवाई जयपूर, दौसा, गंगापूर, हिंदौन, कोट कासिम, सवाई माधोपूर, मालपुरा,सांभर, शेखावती (वाटी), टोडावती (वाटी) असे जिल्हे पाडलेले होते. जयपूरखेरीज सीकर, फतेपूर, नवलगढ, रामगढ, लछमनगढ,हिंदौन, सवाई माधोपूर (रणथंभोरचा सुप्रसिद्ध किल्ला येथून ११ किमी. वर) वगैरे लहानमोठी २८ शहरे व ५,७३५ खेडी होती. आरोग्यावर४१/२ लाख रु. खर्च होई. दवाखाने ५३ होते. कच्च्या व बांधणीच्या साड्या, जरीचे काम, सोने, लाख, संगमरवर यांवरील कलाकुसरीच्याकामाबद्दल संस्थानाची प्रसिद्धी होती. मिर्झा ईस्माईलसारख्या दिवाणांनी संस्थानाच्या प्रगतीला हातभार लावला.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सेठ जुगल किशोर, अर्जुनलाल सेठी यांच्या सशस्त्र क्रांतीच्या कल्पनांनी मूळ धरले नाही. १९३१ मध्येप्रजामंडळ स्थापन झाले. त्यावर १९३९ मध्ये संस्थानाने बंदी घातली; पण ती नंतर उठवली. तिचे अध्यक्ष सेठ जमनालाल बजाजकाही काळ कैदेतही होते. खेमीच्या जहागिरदाराचे विवेकानंदांशी घनिष्ठ संबंध होते. सीकर भागात महसूल वाढीविरुद्ध बरेच आंदोलनझाले. १९२७ मध्ये जबाबदार राज्यपद्धतीची मागणी झाली; पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनाच दिवाण नेमायचे धोरण चालू राहिले. १९३७मध्ये हरिजन सेवक संघाची कचेरी जयपूरला आली. १८६१ मध्येच महाराजांना इंपीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये प्रतिनिधित्वहोते. १९४७ मध्ये ते संविधान समितीचेही सभासद झाले. १९४९ मध्ये संस्थान राजस्थान संघात सामील झाले आणि महाराज त्यागटाचे राजप्रमुख झाले. १ नोव्हेंबर १९५६ पासून संस्थान राजस्थान राज्याचा एक भाग बनले.

 

कुलकर्णी, ना. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate