অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तमिळनाडू राज्य

तमिळनाडू राज्य

भारतीय द्वीपकल्पाच्या आग्नेय भागातील राज्य. क्षेत्रफळ १,३०,०६९ चौ. किमी. लोकसंख्या ४,११,९९,१६८ (१९७१). विस्तार ८° ४′ उ. ते १३° ५०′ उ. आणि ७६° पू. ते ८०° २१′ पू. यांदरम्यान. याच्या पश्चिमेस केरळ राज्य, उत्तरेस आंध्र प्रदेश राज्य व कर्नाटक राज्य,पूर्वेस बंगालचा उपसागर आणि दक्षिणेस हिंदी महासागर व आग्नेय किनारा आणि श्रीलंका यांदरम्यान त्याचे पाल्कची सामुद्रधुनी व मानारचे आखात हे भाग आहेत.

भूवर्णन

या राज्याचे १५० मी. च्या समोच्चरेषेने पूर्वेचा सखल मैदानी प्रदेश व पश्चिमेचा पठारी,डोंगराळ प्रदेश असे दोन स्पष्ट भाग पडतात. पूर्वेकडील समुद्रकिनारा अगदी सरळ असून त्यावर त्याच्या लांबीच्या मानाने बंदरे थोडीच आहेत. त्यावर मद्रासची प्रसिद्ध मरीना बीच व इतर पुळणी तयार झालेल्या आहेत. सामान्यतः हा किनारा उद्‌गमनाचा आहे; तथापि त्यावर महाबलीपुर,तंजावरचा काही भाग इ. ठिकाणी अधोगमनाने काही प्रदेश समुद्रात बुडल्याचाही पुरावा आढळतो. बऱ्याच ठिकाणी नदीमुखाजवळ वालुकाभित्ती निर्माण झालेल्या दिसतात. रामेश्वर द्वीप हे याचेच उदाहरण होय. मानारचे आखात आणि पाल्कची सामुद्रधुनी यांदरम्यान छोटीछोटी प्रवाळ द्वीपे बनलेली दिसतात. रामेश्वरच्या टोकाशी असलेले धनुष्कोडी आणि त्यासमोरचे श्रीलंकेचे तलाई मानार यांना जोडणारी जलांतर्गत खडकांची रांग म्हणजेच सुप्रसिद्ध रामाचा सेतू होय. यालाच ॲडम्स ब्रिज असेही नाव आहे. रामनाथपुरम् व तिरुनेलवेली जिल्ह्यांत समुद्रकाठी सु. ३० ते ६५ मी. उंचीचे छोटे वालुकागिरी निर्माण झालेले दिसतात. त्यांना ‘तेरी’ म्हणतात. त्यांवरील ताडाच्या झाडांमुळे वाळू व माती धरून ठेवली जाते. किनाऱ्यावर खारकच्छही निर्माण झाले आहेत. मद्रासपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या मैदानी प्रदेशाची भूमी मुख्यतः कावेरीने व इतर नद्यांनी आणलेल्या जलोढाने तयार झाली आहे. कावेरीचा १०,४०० चौ.किमी. विस्ताराचा त्रिभुज प्रदेश हा एक अतिविस्तृत, सुपीक व समृद्ध प्रदेश आहे. मैदानी प्रदेशात विखुरलेले विशेषतः पालार आणि आड्यार नद्यांदरम्यान काही अवशिष्ट शैल दिसून येतात. पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून आलेल्या पालार, पोन्नाइय्यार (पेन्नार), कावेरी, वैगई आणि ताम्रपर्णी या प्रमुख नद्या या मैदानी प्रदेशातून पूर्वेकडे वाहत जातात. त्यांशिवाय चेयूर, मोयार, भवानी, अमरावती, चित्तार, नोयिल, कूम, कोट्टेलियार इ. अनेक नद्या या राज्याचे जलवाहन करतात. पुलिकत सरोवराचा दक्षिण भाग या राज्यात येतो.

तमिळनाडूच्या पश्चिम सीमेवर उत्तरेकडे निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल प्रदेश आहे. तेथे भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील उत्तर सह्याद्री आणि पूर्वेकडील पूर्वघाट या श्रेणी एकत्र येतात. निलगिरीचे दोडाबेट्टा शिखर २,६३७ मी. उंचीचे आहे. निलगिरीच्या दक्षिणेकडील पालघाट खिंडीच्या दक्षिणेस दक्षिण सह्याद्रीच्या अन्नमलई व एलाचल रांगा दक्षिणोत्तर गेल्या असून पलनी टेकड्या हा त्यांचाच एक पूर्वेकडील फाटा आहे. केरळचा क्विलॉन व तमिळनाडूचा तिरुनेलवेली या जिल्ह्यांस जोडणाऱ्या शेनकोटा खिंडीच्या दक्षिणेस थेट कन्याकुमारी जिल्ह्यात १,६५४ मी. उंचीच्या महेंद्रगिरी डोंगराने दक्षिण सह्याद्रीचा शेवट झालेला आहे.

दक्षिण सह्याद्रीच्या रांगा व मैदानी प्रदेश यांदरम्यानच्या पठारी प्रदेशावर तमिळनाडूचे डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावाडी (१,१६० मी.), शेवराय (१,६४७ मी) आणि कलरायन व पछिमलई या टेकड्या जलप्रवाहांनी अलग होऊन तुटक तुटक उभ्या आहेत. पलनी टेकड्यांच्या पूर्वेस वैगईच्या दोन्ही बाजूंस आंदीपट्टी व वरुषनाड या टेकड्या आहेत. कोईमतूरजवळ पठारी प्रदेशाची उंची सु. ४५० मी. आहे.

मृदा

तमिळनाडूच्या मैदानी प्रदेशाचा बराचसा भाग नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने निर्माण झाला आहे. कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशातील मृदा सुपीक गाळाची असून अतिशय उपजाऊ आहे. उत्तर भागात रेती आणि गाळमिश्रित लोम प्रकारची मृदा सापडते. या मृदेच्या प्रदेशात नारळाची झाडे चांगली येतात. मध्यवर्ती भागात तांबडी मृदा आढळते. ही शेतीच्या दृष्टीने विशेष उपजाऊ नाही. मदुराई, रामनाथपुरम् व तिरुनेलवेली जिल्ह्यांत काही भागात काळी मृदा आहे. ही मृदा कापसाच्या पिकासाठी उत्तम असते. चिंगलपुट, तंजावर वगैरे भागांत लॅटेराइट–जांभा दगडाची मृदा आहे.

हवामान

विषुववृत्तापासून फक्त सु. ८८० ते १,५५० किमी दूर असल्याने हवामान उष्ण आहे; परंतु समुद्रसान्निध्याचा फायदा मिळत असल्याने भारताच्या उत्तर भागांप्रमाणे हवामान विषम नाही. उन्हाळ्यात मे महिन्याचे सरासरी तापमान २१° से. व जास्तीत जास्त तपमान ४३° सें. आणि हिवाळ्यात जानेवारी महिन्याचे सरासरी तपमान २४° सें. व कमीत कमी तपमान १८° से. असते. किमान मासिक सरासरी तपमान डिसेंबर वेल्लोरला १३·४° सें. व सेलमला १६° सें. असते. वार्षिक पर्जन्यमान स्थलपरत्वे ७० सेंमी ते १५० सेंमी असून किनारी प्रदेशात परतीच्या मोसमी वाऱ्यांपासून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे पावसाचे प्रमाण जून ते सप्टेंबरच्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसापेक्षा जास्त असते. याच वेळी आवर्तांपासूनही काही पाऊस पडतो. एप्रिल आणि मे महिन्यांत थोडा पाऊस पडतो. त्यालाच ‘आम्र वर्षा’ म्हणतात, कारण आंबे परिपक्व होण्याच्या सुमारास हा पाऊस पडतो. पर्वतीय प्रदेशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून विशेषतः निलगिरी पर्वत भागात १०० ते २०० सेंमी पेक्षाही जास्त पाऊस पडतो. तमिळनाडू डोंगरांवर ६० सेंमीपर्यंत तर पालघाट खिंडीजवळच्या प्रदेशात १२० सेंमी. पाऊस पडतो. मैदानी प्रदेशात उत्तरेकडून दक्षिणेकडे व पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण कमी असते. रामनाथपुरम् व तिरुनेलवेली जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अगदी कमी असते.

वनस्पती

राज्याचा १९७३–७४ मध्ये १५·५% प्रदेश वनाच्छादित होता. पर्वतीय प्रदेशात दाट अरण्ये आहेत. सागवान,रोझवुड, निलगिरी व चंदनाची झाडे जास्त आढळतात. कोईमतूर व निलगिरी पर्वत भागांत सागवानाची दाट जंगले आहेत. तसेच पर्वत भागात बांबूची वने आढळतात. रबराची झाडेही येऊ शकतात. नेली, एली, अगस्ती, नारळ, सुपारी, ताड, आंबा,फणस, वड, पिंपळ. इ. झाडे तमिळनाडूत आढळतात. १९७१–७२ मध्ये येथील अरण्यातून ३०,८१० घ. मी. इमारती लाकूड;३,२०,३३२ घ. मी. जळाऊ लाकूड; १·५ कोटी रुपये किंमतीचा रबराचा चीक व १,३७० टन चंदनी लाकूड असे उत्पादन झाले. किनाऱ्यालगतच्या भागात नारळाची व ताडाची झाडे आहेत. आग्नेय किनारी प्रदेशात बाभळीची बने व इतर काटेरी वनस्पती आढळतात.

प्राणी

निलगिरी भागात व पर्वतप्रदेशात रानटी हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इ. वन्य प्राणी आढळतात. त्यांच्यासाठी मदुमलई अभयारण्य राखून ठेवलेले आहे. तसेच कावेरी त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिण टोकावरील पॉइंट कॅलिमियर येथे पाणपक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. तेथे स्थलांतरी हंसक येतात. गिंडी येथील राजभवनात काळवीट, चितळ व इतर छोट्या प्राण्यांसाठी राखीव उद्यान आहे. पुलिकत सरोवरावरही स्थलांतरी हंसक, बगळे, क्वाक, बदके, करकोचे इ. पाणपक्षी दिसतात. मद्रासच्या दक्षिणेस वेडंतंगल येथे पक्ष्यांसाठी अभयारण्ये आहे. तेथे पांढरा आयबेक्स क्वाक, स्पूनबिल,उघड्या चोचीचा बलाक, पाणबुडा, ढोक, बगळा, पाणकावळा इ. पक्षी विशेष आढळतात. इतरत्र नेहमीचे भारतीय पशुपक्षी,सर्प, कीटक वगैरे आढळतात.

 

दाते, सु. प्र.; दाते, संजीवनी

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate