অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाटणा

पाटणा

पाटणा

प्राचीन पाटलिपुत्र, आधुनिक पाटणा हे भारतातील बिहार राज्याच्या राजधानीचे शहर असून ते गंगा व गंडक ह्यांच्या संगमावर, गंगेच्या पूरबांध असलेल्या दक्षिण तीरावर वसले आहे. महानगरीय लोकसंख्या ४,९१,२१७ (१९७१). या नगरसमूहात जुनी व नवी वस्ती, पाटलिपुत्र वसाहत आणि फूलवारी ह्यांचा समावेश होतो. गंगेस येणाऱ्या पुरांमुळे इतिहासकाळात पाटण्याचे स्थान कमी अधिक प्रमाणात वारंवार बदलत राहिले. पुराचा धोक हा पाटण्याचा नैसर्गिक दुबकेपणा होय.पाटणाप्राचीन पाटलिपुत्र सध्याच्या पाटणा शहराच्या पश्चिमेस गंगा व शोण ह्यांच्या संगमावर होते. या नगरीला सु. २,५०० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. प्राचीन मगध साम्राज्याची ही राजधानी. पाटलिपुत्राची ‘कुसुमपुर’, ‘पुष्पपुर’, ‘कुसुमध्वज’ अशी इतरही नावे आढळतात.

नंद साम्राज्याच्या काळात ‘पद्मावती’ असेही नाव रूढ असल्याचे दिसते. मौर्य, शुंग, गुप्त या राजधराण्यांनी पाटलिपुत्राचे वैभव वाढविले. वैदिक, बौद्ध, जैन या तीनही धार्मिक परंपरांनी पाटलिपुत्र संपन्न बनविले. कथासरित्सागर व वायुपुराण यांतून या नगरीचे उल्लेख आढळतात. इ. स. पू. पाचव्या शतकाच्या उत्तरार्घात अजातशत्रूच्या सुनिधी आणि वस्स्कार या दोन मंत्र्यांनी वज्जींच्या आक्रमणापासून संरक्षण व्हावे, म्हणून हे शहर वसविले असे म्हणतात.

मेगॅस्थिनीझने पाटलिपुत्राचा उल्लेख ‘पोलीबोश्रा’ असा केलेला असून ‘नगराच्या जोहोबांजूंनी ४५ हात खोल व ४०० हात रुंद खंदक आहेत. नगराभोवतीच्या लाकडी तटबंदीत ६४ दरवाचे व ५७० बुरूज आहेत’ असेही म्हटले आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील निर्देशांनुसार पाटलिपुत्रातील रस्ते खूपच रुंद होते. सम्राट अशोकाने तिसरी बौद्ध धर्म संगीता (परिषद) पाटलिपुत्र येथे भरविली होती (इ. स. पू. २४०). मौर्यकालीन पाटलिपुत्र अत्यंत समृद्ध होते व त्याची लोकसंख्या अंदाजे चार लाख असावी. नगरातील मौर्यकालीन राजवाडा लाकडी होता.

शुंगांचीही पाटलिपुत्र हीच राजधानी होती. गुप्तकाळात (३२१-५५०) पाटलिपुत्रास पुन्हा वैभव प्राप्त झाले. पाचव्या शतकाच्या सुरुवातीस फाहियान हा चिनी प्रवासी येथे राहिला होता. त्याने संस्कृत भाषेचा अभ्यास करून अनेक ग्रंथांची हस्तलिखते बरोबर नेली. गुप्त साम्राज्याच्या अस्ताबरोबर पाटलिपुत्राचे वैभव कमी झाले. बौद्ध परंपरेप्रमाणेच येथील जैन परंपराही मोठी आहे.

येथील संप्रती नावाच्या राजाने जैन धर्माचा स्वीकार करून तीर्थकरांची अनेक मंदिरे वांधली. गुप्तकाळात विद्येच्या क्षेत्रात पाटलिपुत्रास महत्त्व प्राप्त झाले होते. कौटिल्यासारखे थोर अर्थशास्त्रज्ञ येथेच होऊन गेले. प्रसिद्ध भारतीय ज्योतिषशास्त्रवेत्ता आणि गणितज्ञ आर्यभट्ट याचा जन्म कुसुमपुर (पाटलीपुत्र) येथेच ४७६ मध्ये झाला, असे सांगितले जाते.

प्राचीन पाटलिपुत्राच्या परिसरात १९१२-१६ यांदरण्यान केलेल्या उत्खननांतून अनेक मौर्यकालीन आणि गुप्तकालीन अवशेष उपलब्ध झाले. त्यांपैकी ८४ स्तंभ असलेली राजदरबाराची वास्तू उल्लेखनीय आहे.

डॉ. अ. स अळतेकरांना शोण नदीच्या काठी नाल्याजवळ एक जिना, एक विटांचा स्तूप व आरोग्यविहार यांचे अवशेष आढळले. १९५३ पासूनच्या उत्खननांतही अनेक मौर्यकालीन व गुप्तकालीन अवशेष मिळाले. त्यांतील मौर्यकालीन बहुस्तंभी प्रासाद, नगराच्या तटबंदीचा लाकडी साचा, चमक असलेली उत्कृष्ट शिल्पे व मृत्पात्रे, शुंगकालीन मृण्मूर्ती व नाणी आणि कुशाणकालीन चांदीची व तांब्याची नाणी तसेच अनेक विहार उल्लेखनीय आहेत. या परिसरात भूमिगत पाणी फार वर असल्याने सखोल उत्खनन करणे व उत्खनित अवशेषांचे जतन करणे, या गोष्टी अवघड ठरतात.या नगरीचा इ. स. सातव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंतचा इतिहास विशेष उल्लेखनीय नाही.

१५४१ मध्ये शेरशाहने पाटणा शहराची पुन्हा स्थापना केली. मोगल काळात बिहार सुभ्याचे राजधानीचे शहर म्हणून त्यास महत्त्व प्राप्त झाले. औरंगजेबाने आपला नातू अझीम याच्या स्मरणार्थ पाटण्याचे ‘अझीमाबाद’ असे नाव ठेवले. १८६५ मध्ये पाटणा ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. १९१२ मध्ये बंगाल इलाख्यातून बिहार-ओरिसा असा एक स्वतंत्र प्रांत बनविण्यात आला व पाटणा ही त्याची राजधानी करण्यात आली. १९३६ मध्ये ओरिसा हा स्वतंत्र प्रांत केल्यापासून पाटणा ही फक्त बिहारची राजधानी राहिली.

 

संदर्भ : Patil, D. R. The Antiquarian Remains in Bihar, Patna, 1963.

लेखक -गद्रे, वि. रा.; ,देव, शां. भा.;,परळीकर, नरेश

स्रोत - मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate