অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भावनगर संस्थान

भावनगर संस्थान

भावनगर संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील सौराष्ट्रातील एक संस्थान. क्षेत्रफळ ७५८०.१६ चौ. किमी. वार्षिक उत्पन्न सु. दोन कोटी रूपये आणि लोकसंख्या ६,१८,४२९ (१९४१). उत्तरेस अहमदाबाद जिल्हा, पूर्वेस खंबायतचे आखात, दक्षिणेस अरबी समुद्र आणि सोरठ-हालाड प्रदेश यांनी ते सीमित झाले होते. तेराव्या शतकात गोहेल राजपुतांपैकी सेज्‍कजी हा पुरूष या भागात स्थायिक झाला (१२६०). त्याला राणोजी, सारंजी आणि शाहजी असे तीन मुलगे होते. त्यांपैकी राणोजीच्या वंशातील भाऊसिंगजी याने १७२३ मध्ये भावनगर वसविले. तो सुरतेच्या सिद्दीला संरक्षणासाठी बंदराच्या जकातीची चौथाई देई. तो हक्क मुंबईकर इंग्रजांनी सिद्दिकडून मिळविला (१७५९). भाऊसिंगजीचा मुलगा रावळ अखेराज्‍जी आणि पुढे नातू बखतसिंग यांनी चाचेगिरीचा बंदोबस्त करण्यात इंग्रजांनी सहकार्य दिले. त्यामुळे मुंबईकर इंग्रज आणि संस्थान यांत सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले. खंबायतच्या नवाबापासून संरक्षण मिळविण्यासाठी भावनगर इंग्रजांना चौथाई देई.

इ. स. १७७१ मध्ये रावळ अखेराज्‍जी याने इंग्रजांना चाचेगिरी करणाऱ्या कोळ्यांकडून तळाजा व माहुवा हे किल्ले मिळविण्यासाठी मदत केली आणि इंग्रजांकडून तळाजाचा किल्ला ७५००० रूपयाला विकत घेतला व राज्यविस्तार केला. १७७२ मध्ये गादीवर आलेल्या बखतसिंगनेही चाच्यांना आळा घालून व्यापार वाढविला आणि राज्यविस्तार केला. तो पेशव्यांना देत असलेल्या खंडणी पेशव्यांच्या अवनतीनंतर म्हणजे वसईच्या तहानुसार (१८०२) इंग्रजाना मिळू लागली. तसेच धंधुक आणि गोधा हे परगणे रू. ५२,००० च्या मोबदल्यात इंग्रजांनी घेतले (१८१६).

तत्पूर्वी १८०७ नंतरच्या गायकवाडांना भावनगराकडून मिळत असलेल्या खंडणीची वसुलीही इंग्रजच करू लागले. विसाव्या शतकात संस्थानाकडून ब्रिटीशांना रू. १,२८,०६० व बडोद्याला रू. २६,३३९ एवढी खंडणी अनुक्रमे मिळे. संस्थानाला कापसाचे उत्पन्न मोठे होते आणि त्याच्या व्यापारामुळे संस्थान सधन झाले होते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संस्थानात रेल्वे, पक्क्या सडका, तारायंत्र, शिक्षण, आरोग्य, बँका वगैरे अनेक सुधारणा झाल्या. दिवाण प्रभाशंकर पट्टजींनी (कार. १९१९-३१) संस्थानात अनेक प्रागतिक योजना राबवून सुधारणा केल्या. अखेरचे राजे कृष्णकुमारसिंह (कार. १९१९-४८) हे मद्रास राज्याचे स्वातंत्र्योत्तर काळात काही वर्षे राज्यपाल होते.

संस्थानच्या मालकीचे स्वतःचे छोटे सैन्य होते. संस्थानिकांना ११ तोफांच्या सलामीचा मान आणि दत्तक घेण्याची सनद होती; शिवाय न्यायदानाचे पूर्ण अधिकार होते. संस्थानात एकूण अकरा शहरे होती. त्यांपैकी दहा शहरांत नगरपालिका असून ६५५ खेडी होती. १८४८ मध्ये संस्थान सौराष्ट्र संघात विलीन झाले व १ मे १९६० पासून गुजरात राज्याचा भाग बनले.


कुलकर्णी, ना. इ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate