অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मध्यप्रदेश राज्य

मध्यप्रदेश राज्य

मध्यप्रदेश राज्य

भारताच्या २२ घटक राज्यांपैकी एक राज्य. देशातील मध्यवर्ती स्थानामुळे याला मध्य प्रदेश हे नाव पडले. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील हे सर्वात मोठे (४,४२,८४१ चौ.किमी.) तर लोकसंख्येच्या दृष्टीने सहाव्या क्रमांकाचे (५,२१,३८,४६७- १९८१ ) राज्य आहे. १७०४७ उ. ते २६०३५ उ. अक्षांश आणि ७४० पू. ते ८४०३० पू. रेशांश यादरम्यान पसरलेल्या वा राज्याच्या उत्तरेला उत्तर प्रदेश ,ईशान्येला उत्तर प्रदेश व बिहार, पूर्वेला बिहार व ओरिसा, दक्षिणेला आंध्र प्रदेश, नैऋत्येला, महाराष्ट्र, पश्चिमेला गुजरात आणि वायव्येला राजस्थान ही भारतातील घटक राज्ये आहेत. भोपाळ (लोक. ८,९५,८१५ -१९८१) ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन

भारतीय पठारावर वसलेले हे राज्य, भारतीय द्विरकल्पातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या तापी, नर्मदा, वैनगंगा ,महानदी इ. नद्यांचे उगमस्थान आहे. राज्याचा बहुतेक भूभाग समुद्रसपाटीपासून सु. ४८८ मी . उंचीचा पठारी प्रदेश असून तो तीव्र उताराच्या जंगलव्याप्त पर्वतरांगांनी व टेकड्यांनी, तसेच नदीखोऱ्यानी व्यापलेला आहे.

हा प्रदेश दख्खन पठाराच्या उत्तर सीमेवर असल्याने उत्तरे कडील गंगेचे मैदान व दख्खन पठार एकमेकांपासून अगल झाली आहेत. राज्यात सस. पासून ३००मी. पेक्षा कमी उंचीचा भूप्रदेश फारच थोडा आढळतो.

येथील बहुतेक पर्वतरांगा नैऋत्य ईशान्य दिशेने पसरलेल्या असून भूप्रदेशाचा उतार उत्तरेकडे असल्याने बहुतेक नद्या उत्तरवाहिनी बनल्या आहेत. राज्याचे पश्चिम, वायव्य व ईशान्य भाग विंध्य पर्वत, माळव्याचे पठार व कैसूर टेकड्यांनी ,तर दक्षिण भाग सातपुडा पर्वत व महादेवाच्या डोंगररांगा यांनी व्यापलेला असून पूर्व भागात मैकल डोंगररांग पसरलेली आहे.

शिवाय विंध्य पर्वताच्या उत्तरेस बुंदेलखंड पठार, राज्याच्या अगदी वायव्य टोकाला मध्य भारत पठार, ईशान्येस बाघेलखंड पठार, पूर्वेला छत्तीसगड द्रोणी, तर अगदी आग्नेय टोकाला बस्तर टेकड्या पसरलेल्या आहेत. भरचनेच्या दृष्टीने राज्याचे प्रमुख तीन विभाग केले जातात.

(१) ⇨विंध्य पर्वतप्रदेश व ⇨माळवा पठार यांचा या विभागात समावेश केला जातो. प्लाइस्टोसीन काळात निर्माण झालेल्या या प्रदेशाचा सर्वसामान्य उतार उत्तरेकडे असून येथील बहुतेक नद्या गंगा, यमुना यांच्या उपनद्या आहेत. हा भाग सस. पासुन सु. ४५०ते ६०० मी. उंचीचा आहे. राज्याच्या ईशान्य भागातील कैमूर टेकड्या म्हणजे विंध्य पर्वताचा विस्तारित भाग आहे. गोविंदगड हा इतिहासप्रसिध्द किल्ली याच भागात आहे. कैमूर टेकड्यांचा थोडाच भाग या राज्यात मोडतो.

(२) दुसऱ्या नैसर्गिक विभागात प्रामुख्याने नर्मदा नदीच्या लांब व रूंद खोऱ्याचा समावेश होतो. हा प्रदेश उत्तरेस विंध्य व दक्षिणेस सातपुडा या दोन पर्वतरांगानी सीमित झाला आहे. जबलपूरच्या ईशान्येस या नदीखोर्‍यांची रूंदी खूपच कमी असून (सरासरी ३०किमी). हे खोरे गाळाच्या संचयनाने बनले आहे. गहू उत्पादनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. या प्रदेशात मोह वनस्पतींची वाढही मोठ्या प्रमाणात होते. या प्रमुख नदीखोऱ्याशिवाय इतर लहान नदीखोर्‍यांचे जाळे या प्रदेशात पसरले आहे.

(३) नर्मदा नदीखोऱ्याच्या दक्षिणेला पसरलेली ⇨सातपुडा पर्वतरांग हा राज्यातील तिसरा नैसर्गिक प्रदेश आहे. ही रांग नैऋत्य ईशान्य दिशेने पसरलेली असून राज्याच्या मध्यभागी असलेले ⇨महादेवाचे डोंगर हे यावेच विस्तारित भाग आहेत. या वालुकाश्माच्या डोंगररांगांची निर्मिती कारबाँनिफेरस काळातील असून त्यांचा उत्तर-उतार मंद, तर दक्षिणेकडील उतार तीव्र आहे. सातपुडा पर्वतरांगेच्या पूर्वेस नैऋत्य ईशान्य दिशेने पसरलेल्या ⇨मैकल डोंगररांगेचाही समावेश याच नैसर्गिक विभागात केला जातो. हिची निर्मिती आर्कियन काळात झाली असून या डोंगरांगेने विंध्य व सातपुडा या पर्वतरांगा जोडल्या गेल्या आहेत. नर्मदा नदीचे उगमस्थान असलेले अमरकंटक हे ठिकाण याच डोंगररांगेत आहे.

या डोंगररांगांशिवाय राज्याच्या ईशान्य सीमेवर पन्ना टेकड्या, तर महादेव डोंगररांगेच्या ईशान्येस भानरेर डोंगररांग असून ती वालुकाश्मापासून बनलेली आहे.

राज्याचा पूर्व भाग सपाट मैदानी असून या भागात तुरळक जंगलव्याप्त लहानलहान टेकड्याही आढळतात. पश्चिमेकडील माळवा पठाराचा काही भाग चंबळ खोऱ्याने व्यापलेला असून हे खोरे उत्खातबूमी (बॅडलँड) म्हणून कुप्रसिध्द आहे. राज्यातील माळवा पठार, नर्मदेचे खोरे व सातपुडा पर्वतरांगेचा काही भाग यांमध्ये काळी सुपीक मृदा आढळते. तर राज्याच्या पूर्व भागात मुख्यत्वे तांबडी व पिवळी मृदा असून ती काळ्या मृदेपेक्षा कमी प्रतीची व वाळूमिश्रित आहे.

ध्य प्रदेश राज्य अनेक लहानमोठ्या नदीखोर्‍यांनी व्यापलेले असून येथील बहुतेक नद्या उत्तरवाहिनी आहेत. तापी, नर्मदा, चंबळ, वैनगंगा, महानदी या येथील प्रमुख नद्या होत. तापी, नर्मदा,या दोन्ही नद्या पश्चिमवाहिनी असून त्या सातपुडा पर्वतरांगांत उगम पावतात. चंबळ, नदी राज्याच्या वायव्य भागात उगम पावून उत्तरेस वहात जाते. वैनगंगा नदी महादेव डोंगररांगेत उगम पावून दक्षिणेस वाहत जाते व पुढे गोदावरी नदीस जाऊन मिळते.महानदी राज्याच्या आग्नेय भागात उगम पावून प्रथम उत्तरेस व नंतर पूर्वेस ओरिसा राज्यात वहात जाते.

या नद्यांशिवाय राज्याच्या वायव्य भागातून कालीसिंध, पार्वती, उत्तर भागातून बेटचा सिंद, घसान, केन, शोण व पूर्व भागातून हसदो (हसदेव) ,रिहांड, पैरी इ. नद्या उत्तरेकडे वहात जातात.

शबरी ही राज्याच्या आग्नेय सरहद्दीवरील नदी दक्षिणेस सिलेरू नदीस जाऊन मिळते. तर इंद्रावती ही आग्नेय भागातील नदी राज्यातून पूर्वेकडून पश्चिमेकडे राज्याच्या सरहद्दीपर्यंत वहात जाऊन पुढे दक्षिणेस वळते आणि आणि सरहद्दवरून काही अंतर गेल्यावर आंध्र प्रदेश राज्यात प्रवेश करते. या नद्यांशिवाय राज्यात काही नैसर्गिक व कृत्रिम सरोवरेही आहेत. आग्नेय भागातील तंदुला तलाव, ईशान्य भागातील रिहांड धरणाचा जलाशय, वायव्य भागातील चंबळ नदीवरील गांधीसागर इ. जलाशय महत्वाचे आहेत.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate