অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संत नामदेवांचे जन्मगाव : ‘नरसी नामदेव’

संत नामदेवांचे जन्मगाव : ‘नरसी नामदेव’

संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी भावनिक एकात्मता साधली आहे. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेवाचा जन्म हिंगोली तालुक्यातील नरसी येथे इ.स. १२७० साली भुयारात झाला. संत नामदेव हे मराठीतील चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यांच्या नावानेच आज हे गाव ‘नरसी नामदेव’ म्हणून ओळखले जाते. भाविकांबरोबरच पर्यटकांचाही येथे मोठा ओघ असतो. आज ४ नोव्हेंबर रोजी त्यांची जयंती. त्या निमित्त नरसी नामदेव बाबतची ही माहिती...

इतिहास

नरसी नामदेव या गावाविषयी माहिती देताना संस्थानचे विश्वस्त भिकुलाल बाहेती म्हणाले की, नरसी गावाजवळून कयाधू नावाची नदी वाहते. अशा या पावन भूमीत नामदेवांचा जन्म झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. नामदेवांचे वडील विठ्ठलाचे भक्त होते. दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली. पत्‍नी राजाई, मोठी बहीण आऊबाई, नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पूत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणाऱ्या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या. कयाधु नदीच्या बाजुला नामदेवांचं मंदीर आहे. मंदिरात नामदेवांची वस्त्र समाधी आहे. हिंदू धर्मातील मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेकडे असते, पण या मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिम मुखी आहे. कारण पूर्वी गावातील लोक संत नामदेव सिंधी असल्यामुळे त्यांना कीर्तन करू देत नसत, त्यामुळे नामदेव मंदिराच्या मागे कीर्तन करत होते. म्हणून मंदिर पश्चिम दिशेला फिरले, अशी आख्यायिका आहे.

गुरूद्वारा

नामदेवांनी नरसी सोडल्यानंतर पंजाबमध्ये आपले कार्ये सुरू ठेवले. आजही पंजाबमधून पर्यटक नरसीला भेट देत असतात. गावाच्या शेजारी मोठा गुरूद्वारा असल्याने नांदेडला येणारा पर्यटकही येथे नक्कीच भेट देत असतो. नामदेव महाराजांची त्या काळातली हिंदीमध्ये लिहिलेली ६३ पदे गुरूद्वारा मध्ये आहेत.

वारकरी शाळा

नरसी येथे वारकरी शाळा देखील आहे. या शाळेत ८ ते १० खोल्या असून सुमारे ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शालेय शिक्षणाबरोबरच त्यांना वारकरी शिकवण, अभंग याचे शिक्षण देखील दिल्या जाते. शिवाय पेटी, तबला, मृदंग वाजविणे देखील शिकविले जाते.

सोयी-सुविधा

नरसी येथे राज्यातीलच नाही तर परराज्यातून आणि विशेषत: पंजाबमधून अनेक पर्यटक येत असतात. त्यांच्या सोयी-सुविधांसाठी निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच लोकवर्गणीतून चार एकर जागा खरेदी करण्यात आली असून या जागेवर दोन मजली धर्मशाळा बांधण्यात आली आहे.

कसे पोहचाल

जवळचे विमानतळ - नांदेड- 108 किलोमीटर
जवळचे रेल्वेस्टेशन- नांदेड- 108 किलोमीटर
जवळचे बस स्थानक- हिंगोली- 18 किलोमीटर

संपर्क- श्री. भिकुलाल बाहेती ‘विश्वस्त’
9921136256

लेखक - जयश्री श्रीवास्तव

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 6/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate