भारतातील उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी लखनौ असून राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ २४०,९२८ इतके आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या १९,९५,८१,४७७ इतकी आहे. राज्याची साक्षरता 69.७२ टक्के आहे. राज्याच्या अधिकृत भाषा हिंदी आणि उर्दु या आहेत. उत्तर प्रदेश म्हणजे हिंदी भाषेचे हृदय. राज्यात ७५ जिल्हे समाविष्ट आहेत.
उत्तर प्रदेशचा इतिहास अतिशय प्राचीन व मनोरंजक आहे. ब्रम्हर्षी किंवा मध्य प्रदेश असा वैदिक युगात उल्लेख आहे. भारद्वाज, गौतम, याज्ञवल्क्य, वशिष्ट, विश्वामित्र आणि वाल्मिक अशांसारख्या तपस्वी, ऋषीमुनींची ही पावनभूमी आहे. रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यांची ही भूमी भारतासाठी नेहमी प्रेरणादायक आहे. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तरप्रदेशात जैन व बौद्ध धर्म स्थिरावला होता. अयोध्या, प्रयाग, वाराणसी, मथुरा ही उत्तर प्रदेशातील महत्त्वाची शिक्षणकेंद्रे व धार्मिक स्थळे आहेत. मध्ययुगीन काळात उत्तर प्रदेशावर मुस्लीमांचे राज्य आले.
आज हिंदू-मुस्लीम अशा मिश्र संस्कृतीचे दर्शन होते. उत्तर प्रदेश ही रामानंद, कवीर, तुळसीदास, सुरदास व अनेक संतांची जन्मभूमी आहे. ब्रिटीशांकडून आग्रा व औंध या दोन प्रांतांचे विलिनीकरण व संयुक्तच प्रांताची निर्मिती झाली. १९५० मध्ये संयुक्ता प्रांताचे उत्तर प्रदेश हे नामकरण झाले. उत्तर प्रदेशच्या उत्तरेला उत्तरांचल व हिमाचल, पश्चिमेला हरियाणा, दक्षिणेला मध्य प्रदेश, पूर्वेला बिहार अशी राज्य आहेत. उत्तर प्रदेशाची दोन विभागात विभागणी होते. एक, पर्वतीय प्रदेश आणि दोन, खोरे विभाग.
उत्तर प्रदेशचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. राज्यात ७८ टक्के लोक शेती करतात. लागवडी खालील शेती क्षेत्र 168.१९ लाख हेक्टर इतके आहे. अन्नधान्य उत्पन्न प्रंचड प्रमाणात होत असते. ऊसांमुळे साखरेचे उत्पादन होते. ६८ वस्त्रोद्योग, ३२ ऑटोमोबाईल उद्योग उत्तर भारतात आहेत. या उद्योगांमुळे राज्यातील २५ टक्के लोकांना रोजगार मिळतो. न्यू ओखला औद्योगिक विकास प्राधिकरण (नोएडा) आहे. नोएडाला १०२ उद्योग कार्यरत आहेत. कानपूर येथे सॉप्टवेअर तंत्रज्ञान उद्यानाची उभारणी झाली आहे.
अयोध्या हे प्रभू रामचंद्राचे जन्मस्थान. अयोध्या व फैजाबाद ही जुळी शहरे आहेत. अलाहाबाद म्हणजे प्रयाग. गंगा, यमुना व गुप्त सरस्वती या नद्यांच्या संगमावरील त्रिस्थळी यात्रेपैकी एक. आग्रा येथील ताजमहाल, आग्रा फोर्ट व दयाल बागा ही प्रमुख पर्यटन आकर्षणे आहेत. कनौज ही ऐतिहासिक राजधानी. कानपूर हे औद्यागिक शहर. कुशीनगर बुद्धाचे महापरिनिर्वाण स्थान. चित्रकूट हे निसर्गसुंदर स्थान. झाशी हे ऐतिहासिक शहर. मथुरा हे यमुना नदीवरील प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक स्थान. मेरठ येथील मंगलपांडेचे स्मारक. लखनौ हे गोमती नदीवरील शहर आहे. उत्तर प्रदेशची राजधानी व ऐतिहासिक शहर आणि पक्षी अभयारण्य. सारनाथ अशोकाची राजधानी होती (म्हणून हे ऐतिहासिक शहर आहे. पुरातत्वीय शास्त्रानुसारही हे महत्त्वाचे आहे.) वाराणसी हे धार्मिक शहर तर श्रावस्ती येथील बौद्धकालीन अवशेष पहायला पर्यटक गर्दी करतात.
विंद्याचल, चित्रकुट, प्रयाग, नैमिश्यारन्य, देवा शरीफ, फत्तेपुर, सिक्री येथील दर्गा. श्रावस्ती, कुशीनगर, संखिसा, कापिल्य, पिपरहवा, कोलंबी, झाशी, गोरखपूर, जैनपूर ही महत्त्वाची ठिकाणे. शिल्पकला आणि संस्कृती केंद्रे म्हणता येतील अशी स्थळे.
उत्तर प्रदेशात हिंदी आणि उर्दु या मुख्य भाषा बोलल्या जात असल्या तरी काही घटकबोलीही या राज्यात बोलल्या जातात. त्यापैकी कोणत्या भाषा कोणते लोक बोलतात त्याचे कोष्टक खालील प्रमाणे :
भाषा व ती कोण बोलतं ते पुढीलप्रमाणे : अगरिया - अगरिया, भोटीया – भोटीया, जंगली - राजी, थारू – थारू.
या व्यतिरिक्ता भोटीया, बुकसा, जाउन्सारी, राजी, थारू आदी आदिवासी लोक उत्तर प्रदेशात राहतात.
उत्तर प्रदेशातल्या लोकांचा पेहराव हा पारंपरिक आणि नवीन असा दोन्ही प्रकारचा आहे. स्त्रियांच्या रंगीबेरंगी साड्या. पुरूषांचे धोतर आणि लुंगी ही पारंपरिक परिधान वस्त्रे. स्त्रियांचा सलवार कमीज आणि पुरूषांचा कुर्ता पायजमा हे आताचे पोषाख. पुरूष डोक्यावर टोपी अथवा पगडीही घालतात. शेरवानी आणि चुडीदार हे ड्रेसही आता सर्वमान्य होत आहेत.
रामलीला ही लोककला पारंपरिक पद्धतीने उत्तर प्रदेशात सादर केली जाते. रामाच्या जीवनावर हे नाटक असते आणि ते पंधरा दिवस रात्रीच्या वेळी व्यासपीठावर सादर केले जाते. यात नाच आणि अभिनय अशा दोन्ही गोष्टींचा समावेश असतो.
ब्रज रासलीला हा असाच एक लोककलेचा प्रकार राज्यात सादर केला जातो. प्रेमाची देवता श्रीकृष्ण यांच्या जीवनावर ही कला सादर केली जाते.
चारकुला हा अजून एक लोकनृत्य प्रकार राज्यात सादर केला जातो. हा नृत्यप्रकार महिला समुहानेने सादर करतात. या नृत्यावेळी डोक्यावर जळते दिवे घेतले जातात व तोल सांभाळत नृत्य केले जाते. राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमावर हे नृत्य असते. उत्तर प्रदेशातल्या ब्रज प्रांतात हे नृत्य लोकप्रिय आहे.
महाभारतातील कुरूक्षेत्राची लढाई सर्वांना माहीत आहे. हे क्षेत्र उत्तर प्रदेशात आहे. वैदिक काळातील वाड्.मय उत्तर प्रदेशातच लिहिले गेले वा रचले गेले. १९ आणि २० व्या शतकातील हिंदी साहित्य परंपरा अनेक लेखकांनी जागृत केली. त्यात जयशंकर प्रसाद, मैथिलीशरण गुप्त, मुंशी प्रेमचंद, सूर्यकांत त्रिपाठी निराला, बापू गुलाब्राइ, सचिदानंद हिरानंद वात्स्यायन (अज्ञेय), राहुल संस्कृत्यायन, हरिवंशराय बच्चन, धर्मवीर भारती, सुभद्रा कुमारी चौहान, महावीर प्रसाद द्विवेदी, स्वामी सहजानंद सरस्वती, दुष्यंत कुमार, हजारी प्रसाद व्दिवेदी, आचार्य कुबेरनाथ राय, भरतेंदु हरिश्चंद्र, कमलेश्वर प्रसाद सक्सेना, शिवमंगल सिंह सुमन, महादेवी वर्मा, विभूती नारायन राय आदी.
जानेवारीतील आलाहाबाद येथे भरणारा माघ मेळा. मथुरा झुला यात्रा, वृंदावन व अयोध्येतील झुला यात्रा असते . या यात्रेच्या वेळी देवांच्या मूर्ती सोन्याचांदीच्या पाळण्यात सजवतात. अनेक ठिकाणी यात्रोत्सव साजरा केला जातो. मुस्लीम संत वारीस अली शहा यांच्या वास्तव्यामुळे बाराबंकी जिल्ह्यातील देवा हे गाव प्रसिद्ध आहे.
दिवाळी, रामनवमी, बारा वर्षातून येणारा आलाहाबाद कुंभ मेळा, होळी, आग्रा येथील ताज महोत्सवांसोबत भारतभर साजरे केले जाणारे सणही उत्तर प्रदेशात साजरे केले जातात.
उत्तर प्रदेशात लखनौ, कानपूर, वाराणसी, अलाहाबाद, आग्रा, झाशी, बरेली, गोरखपूर इथे विमानतळ आहेत. शिवालिक श्रेणी हा पर्वत या राज्यात आहे तर गंगा, यमुना, शारदा, चंबळ, शोण, रामगंगा, राप्ती, गोमती, घागरा, बेतवा, बाबई, बकुलाही, बानास, बेसोन, भाइन्साई, छोटी शरयू, धासन, गांगी, गांजेस, हिंदोन, जमनी, काली, कन्हार, करमानसा, कथाना, केन, कुकारील, मगाई, पिराई, रिहांद, रोहिनी, साई, सरायन, सारायु, सासुर खदेरी, सेंगार, सिंध, सोट, सुहेली, तामसा, उल, वरूना, रापती, आदी नद्या उत्तर प्रदेशातून वाहतात.
लेखक - डॉ.सुधीर राजाराम देवरे
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/3/2020