অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांस्कृतिक भारत : राजस्थान

सांस्कृतिक भारत : राजस्थान

राजस्थान या राज्याची राजधानी जयपूर हे शहर असून या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,42,239 चौरस किमी इतके आहे. जयपूरला गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाते. 2011 च्या जनगणनेनुसार या राज्याची लोकसंख्या 6,86,21,012 इतकी आहे. या राज्याची साक्षरता 67.07 टक्के आहे. राजस्थानच्या अधिकृत भाषा हिंदी आणि राजस्थानी या आहेत. राजस्थान राज्यात तेहतीस जिल्हे आहेत. राजस्थान हे भारतातील उत्तर भारतातील राज्य असून त्याची स्थापना 26 जानेवारी 1950 ला करण्यात आली. राज्यातील सर्वात मोठे शहर जयपूर हे राजधानीचे शहरच आहे. राजस्थान हे पाकिस्तान सिमेला लागून आहे.

भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असलेले राज्य आहे. राजपूतांचे शेकडो वर्षे या प्रदेशावर राज्य होते. राजस्थानचा इतिहास प्रागैतिहासिक. ख्रि.पू. 3000 ते 1000 काळातील संस्कृती सिंधू संस्कृतीशी मिळतीजुळती. सातव्या शतकापासून चौहान घराण्याचे राजपूतांवर वर्चस्व. बाराव्या शतकात त्यांची साम्राज्यशाही. चौहान घराण्यानंतर मेवाडच्या गहिलोत घराण्याने येथील लढाऊ समुदायाची नियती ठरवली. मेवाड व्यतिरिक्‍त इथे ऐतिहासिक महत्त्व असलेले प्रांत म्हणजे मारवाड, जयपूर, बुंदी, कोटा, भरतपूर, अलवार. 1818 मध्ये या राज्यांचा ब्रिटीशांसोबत करार झाला. घराण्याचे हित साधले गेले. परंतु नागरिकांत असंतोष निर्माण झाला. महात्मा गांधीच्या नेतृत्वात लोकांचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान होते. 1935 साली ब्रिटीशांनी प्रदेशांना स्वायत्तता दिल्यानंतर राजकीय हक्कासाठी व नागरी स्वातंत्र्याकरिता राजस्थानमध्ये तीव्र तीव्र आंदोलन झाले.

1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1956 साली राज्यपुनर्रचना आयोगाचा वटहुकूम जारी करण्यात आला. 1948 साली इतस्तत: पसरलेली छोटी राज्ये एकत्र आणण्याचे प्रयत्न व मत्स्य संघाची स्थापना करण्यात आली (1948). हळूहळू इतर राज्ये यात विलीन करण्यात आली. 1949 पर्यंत बिकानेर, जयपूर, जोधपूर आणि जैसलमेर इत्यादी मोठी राज्य सुद्धा यात विलीन झाली व बृहन्‍राजस्थानाचे संघराज्य स्थापन झाले. शेवटी 1958 मध्ये आजचे राजस्थान राज्य अस्तित्वात आले. राज्याच्या पश्चिमेला पाकिस्तानची सीमा, उत्तरेला पंजाब व हरियाणा, इशान्येला उत्तर प्रदेश, पूर्वेला मध्यप्रदेश व नैऋत्यला गुजराथ राज्य आहेत. शेती लागवडीलायक क्षेत्र 159 लाख हक्टर्स इतके आहे. मुख्य पिके तांदूळ, बारली, ज्वारी, बाजरी, मका, डाळी, गहू, तेलबिया, कडधान्ये, कापूस व तंबाखू हे आहेत. अलिकडे भाजीपाला, संत्री व मोसंबीचे उत्पादनही राज्यात होऊ लागले आहे.

जयपूर, जोधपूर, उदयपूर, बिकानेर, माऊंट अबू, अलवारचे सारिस्का व्याघ्र अभयारण्य, भरतपूरचे केवलादेव राष्ट्रीय उद्यान, अजमेर, जैसलमेर, पाली, अजमेर-पुष्कर, उदयपूर सरोबर, जोधपूर किल्ला, अजमेर येथील तारघर किल्ला (स्टार फोर्ट), बिकानेर, जयपूर जंतर मंतर, मेहरांगड किल्ला, जोधपूर येथील पायऱ्यांची विहीर, माऊंट अबू येथील दिलवरा मंदिर, चित्तोडगड किल्ला आदी महत्त्वाची प्रेक्षणीय ‍स्थळे व पर्यटकांचे आकर्षण आहेत.

अरवली पर्वताची एक रांग अजयमेरूमुळे अजमेर या शहराचे नाव पडले. अजमेर ही चौहान घराण्याची राजधानी. पृथ्वीराज चौहानचा 1193 मध्ये महंमद घोरीने पराभव केला व येथे मुस्लिम सत्ता स्थापन झाली. तारागड, अनासागर, राजपुताना संग्रहालय किल्ला आदी अजमेरला पाहण्यासारखी ठिकाणे. अलवर येथे कछवाह राजपुतांची राजधानी. उदयपूर ही मेवाडची राजधानी. महाराणा उदयसिंहांनी पिचोला सरोवराभोवती हे शहर वसविले. ओसियाँ हे थर वाळवंटाचे प्रवेशद्वार. केवलादेव घाना येथील जल पक्ष्यांचे भारतातील सर्वात मोठे अभयारण्य. कोटा हे चंबल नदीवरील ऐतिहासिक निसर्गरम्य ठिकाण. कोटा साड्या प्रसिद्ध. चितोडगड हे मेवाडच्या सि‍सोदिया राजवंशाची राजधानी. चुरू येथे वाळवंटाचे रम्य दृश्य. जयपूर ही राजस्थानची राजधानी, इ.स. 1727 मध्ये सवाई जयसिंग दुसरा याने ही पिंक सिटी वसवली. हे गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध आहे.

जोधपूर हे ऐतिहासिक शहर आहे. नागौर प्राचीन किल्ला. पुष्कर येथील पुष्कर सरोबरावर 52 घाट. पोखरण हे अणुस्फोटाचे ठिकाण. बिकानेर हे थरच्या वाळवंटातील ऐतिहासिक शहर. माऊन्ट आबू तेथील गुरू शिखर. रणथंबोर येथील किल्ला व व्याघ्र प्रकल्प.राजस्थानात बोलल्या जाणाऱ्या भाषा या इंग्रजी व राजस्थानी या असल्या तरी मारवाडी, मेवारी, शेखावती, हरियाणवी या भाषाही बोलल्या जातात. राज्यात काही घटकबोलीही बोलल्या जातात. कोणते लोक कोणती भाषा बोलतात हे पुढील प्रमाणे सांगता येईल:

भाषा व ती कोण बोलतात ते पुढीलप्रमाणे



  1. धुंधारी मीना - चौकीदार, जमीनदार
  2. गरासिया - गरासिया/ गिरासिया
  3. हरौती - सहारिया
  4. मेवाडी - गामित - भील
  5. वागडी - डामोर
  6. कटारिया-भील.


याव्यतिरिक्‍त राज्यात अजून काही आदिवासी बांधव राहतात. भील, ढोली भील, डुंगरी भील, डुंगरी गरासिया, मेवासी भील, रावल भील, तावडी भील, भागलिया, भिलाला, पावरा, वसावा, वसावे, डामोर, दमारिया, धानका, काथोडी, कोकणी, कुकणा, कोळी ढोर, टोकरे कोळी, मीना, नायकडा, नायका, चोलीवाला नायका, पतेलिया, शेहारिया आदी आदिवासीही राज्यात वास्तव्य करतात. 

राजस्थान हे सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय संपन्न असे राज्य आहे. सांस्कृतिक परंपरांनी आणि कलेने समृद्ध असलेले हे राज्य. लोकसंस्कृती ही ग्रामीण संस्कृतीत विलय झालेली आहे. बिकानेरी भुजिया, बाजरीची भाकर आणि लसणाची चटणी हे पदार्थ स्वस्त आणि चवीष्ट असतात. मावा कचोरी, मिर्ची वडा, कांदा कचोरी आणि जोधपूरचा घेवरही खायलाच हवा असा. दाल-बट्टी-चुरमा हे राजस्थानात खूप प्रसिद्ध जेवण आहे. राजस्थान हे पारंपरिक रंगीबेरंगी कपड्यांच्या पेहरावासाठी प्रसिद्ध आहे. महिलांचा पेहराव हा लेहंगा आणि आखूड टॉप असा असतो. याला चनिया चोली असेही म्हणतात. राजस्थानी लोक डोक्याला फेटा बांधतात. त्यांचे कपडे भडक रंगाचे असतात. 

घुमार नृत्य, तारानृत्य, कथपुतळी, भोपा, तेराताली, घिंडर, तेजाजी हे लोकसंगीत राज्यात लोकप्रिय आहेत. ढोलक, सितार आणि सारंगी या लोकवाद्यांचा संगीतासाठी जास्तीतजास्त वापर होतो. घुमार, कालबेलिया, भवाई, काशाची घोडी आदी लोकनृत्यही राजस्थाना मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत.

जयपूर, जोधपूर, उयदपूर या शहरात विमानतळ आहेत. राजस्थान राज्यात अरवली पर्वताची रांग आहे. बनास, घग्गर, लुनी, चंबळ, कालिसिंध, पार्वती, मही, साबरमती, अरवती, मागन, बेराच, बंडी, भागनी, चंबळ, गंभीर, घग्गर, गोमती, जावाई, जहाजवाली, काली सिंध, रूपारेल, सरसा, सरस्वती, सुकरी, साहिबी या नद्या राजस्थानातून वाहतात. 

लेखक - डॉ. सुधीर राजाराम देवरे

स्त्रोत - महान्युज

 

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate