অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंधु संस्कृति

सिंधु संस्कृति

सिंधु संस्कृति

भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती. सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी १९२१ मध्ये उजेडात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले. राखालदास बॅनर्जी यांनी मोहें-जो-दडोचा शोध लावला (१९२२). यानंतर या दोन्ही स्थळी ⇨ सर जॉन मार्शल, इ. जे. एच्. मॅके, ⇨ माधोस्वरुप वत्स, ⇨ सर मॉर्टिमर व्हीलर इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली. याशिवाय सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात (विद्यमान पाकिस्तान) सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे उजेडात आली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्याने तिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले.

त्यानंतरच्या उत्खनन-संशोधनांत या संस्कृतीच्या व्याप्तीबद्दलच्या कल्पनांत आमूलाग्र बदल झालेले आहेत. प्रारंभी पंजाबात ⇨ रुपड पासून ते पश्चिमेस बलुचिस्तानातील ⇨ सुक्तगेनडोर एवढ्या विभागात या संस्कृतीच्या अवशेषांची लहानमोठी सु. ६० व दक्षिणेस पश्चिम किनाऱ्यालगत सौराष्ट्रात सु. ४० स्थळे ज्ञात झाली होती; मात्र आजमितीला सिंधू संस्कृतीच्या दोन हजारांहून अधिक स्थळांचा शोध लागला आहे. त्यांपैकी सु. १५०० भारतात आणि सु. ५०० पाकिस्तानात आहेत.

विशेष म्हणजे त्यातील बहुसंख्य – सहाशेहून अधिक – हरयाणा –राजस्थानमधील सरस्वतीच्या (सांप्रत घग्गर) खोऱ्यात आहेत. गुजरातेत ⇨ लोथल व त्याच्या दक्षिणेस भगतराव येथेही सिंधू संस्कृतीचे लोक राहत असत, शिवाय राजस्थानात ⇨ कालिबंगा, गिलुंड व इतर अनेक ठिकाणी तसेच उत्तर प्रदेशात मीरतच्या पश्चिमेस सु. ३१ किमी. वर अलमगीरपूर येथे सिंधू संस्कृतीचे लोक राहत असत, असे आढळून आले आहे.

भगतराव मोहें-जो-दडोपासून आग्नेयीस सु. ८०५ किमी. वर आहे;सुक्तगेनडोर कराचीपासून पश्चिमेस सु. ४८३ किमी. वर आहे आणि अलमगीरपूर मोहें-जो-दडोच्या पूर्वेस सु. ९६६ किमी. वर आहे. हरयाणा आणि पंजाबात बनवाली, मिताथल या स्थळांशिवाय सिंधमध्ये यारी या ठिकाणी सिंधू संस्कृतिसदृश अवशेष मिळाले. यावरुन सिंधू संस्कृतीची व्याप्ती किती विस्तृत होती, याची कल्पना येते.

व्याप्तीइतकीच या संस्कृतीची प्राचीनताही लक्षात ठेवण्यासारखी आहे. या संस्कृतीच्या ⇨ कोटदिजी, हडप्पा, लोथल इ. स्थळांचा कालखंड कार्बन-१४ पद्घतीनुसार निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार आणि मोहें-जो-दडो व हडप्पा येथे सापडलेल्या काही अवशेषांच्या व मध्यपूर्वेतील — विशेषतः मेसोपोटेमियातील - अव-शेषांच्या तुलनात्मक अभ्यासानुसार तसेच आतापर्यंत झालेल्या उत्खननांवरुन सिंधु संस्कृतीचे स्थूलमानाने तीन कालखंड पडतात :

(१) आद्य सिंधू (इ. स. पू. ३२०० – २६००),

(२) नागरी सिंधू (इ. स. पूर्व २६०० – २०००) आणि

(३) उत्तर सिंधू (इ. स. पूर्व २०००–१५००).

आद्य सिंधु कालखंडातील स्थळे सिंधपासून सरस्वतीच्या खोऱ्यात अधिक आहेत. नागरी सिंधू काळातील सर्वंकष पुराव्याचा विचार करता या काळात वेगाने सांस्कृतिक बदल घडून आले; तर उत्तर सिंधू काळात सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासास सुरुवात झाली.

या संस्कृतीचा उगम, उत्क्रम व अस्त कसा झाला, यांबाबत विद्वानांत एकमत नाही; परंतु इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकामध्ये सिंध-पंजाबची मैदाने आणि त्यांच्या पश्चिमेकडच्या अफगाणिस्तान, बलुचिस्तान भागांतील डोंगराळ प्रदेशातही सध्यापेक्षा मानवी वस्तीला जास्त अनुकूल अशी नैसर्गिक परिस्थिती असावी, यात शंका नाही.

बलुचिस्तानच्या डोंगराळ भागात छोटीछोटी ग्रामवस्तीची केंद्रे होती, हे आता सर्वमान्य झाले आहे. बलुचिस्तान आणि उत्तर पाकिस्तान या विभागात क्वेट्टा, नाल, आमरी, झोब,कुली आणि टोगो इ. प्रादेशिक वैशिष्ट्यांच्या निरनिराळ्या ग्रामसंस्कृती अस्तित्वात होत्या, याबद्दल पुरावा मिळालेला आहे. या संस्कृतीचे लोक विविध तऱ्हेची रंगविलेली मातीची भांडी वापरीत असत. कालखंडाच्या दृष्टीनेही या संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या आधीच्या होत्या, हे आता निश्चित झाले आहे.

या विभागातील उत्तरेकडील संस्कृतीत प्रामुख्याने लाल खापरांचा वापर आढळतो, तर दक्षिण विभागामध्ये पिवळसर रंगाची खापरे प्रचलित होती, असे दिसते. मृत्पात्रे, मानवी दफने, मृत्पात्रांवरील रंगीत नक्षीकाम आणि काही स्थळी सूचित केले जाणारे संभाव्य धान्योत्पादन, यांवरुन सिंधू संस्कृतीच्या नागरी विकासाचा आणि या ग्रामीण संस्कृतींचा घनिष्ठ संबंध असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. हडप्पाच्या उत्खननामध्ये यास थोडाफार दुजोरा मिळालेला आहे.

हडप्पाच्या कोटविभागाच्या उत्खननात सिंधू संस्कृतीच्या खापरांच्या थरांच्या खाली झोब संस्कृतीची खापरे मिळालेली आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तानातील कोटदिजी येथील उत्खननामध्ये हडप्पापूर्व संस्कृतीचे अवशेष सापडले. या हडप्पापूर्व संस्कृतीत तांब्याचा वापर नव्हता आणि भाजलेल्या विटांचाही अभाव होता. या काळातील मृत्पात्रे तांबड्या रंगाची आणि काळ्या रंगात नक्षी केलेली असली,तरी त्यांचे आमरी येथे सापडलेल्या खापरांशी साधर्म्य लक्षात येण्यासारखे आहे. कार्बन-१४ च्या आधारेही कोटदिजीच्या वस्त्यांची प्राचीनता इ. स. पू. २७०० म्हणजेच हडप्पा संस्कृतिपूर्व असलेली दिसून येते.

नंतरच्या थरांमध्ये आणि काही समकालीन थरांमध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये सापडणाऱ्या नक्षीसारखी नक्षी असलेली खापरे आणि बहुधा घराच्या भिंतीवर चिकटविण्याकरिता वापरण्यात येणारे भाजलेल्या मातीचे त्रिकोण हडप्पा आणि कोटदिजी या दोन्ही ठिकाणी उपलब्ध झाल्याने या दोन्ही संस्कृतींचा संबंध घनिष्ठ असला पाहिजे, असे दिसून येते. राजस्थानातही कालिबंगा आणि सोथी या ठिकाणी सिंधू संस्कृतिपूर्व वस्त्यांचे अवशेष अलीकडेच मिळालेले आहेत; परंतु विशेष म्हणजे, कालिबंगा येथे सिंधू संस्कृतीचे आणि सोथी संस्कृतीचे लोक एकत्र राहत होते, यामध्ये काहीही संदेह राहिलेला नाही.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate