आसाम हिमालयातील एक अत्युच्च शिखर. उंची ७,७५६ मी. हे तिबेटमधील आसाम हिमालय पर्वतश्रेणीच्या पूर्व भागात असून, येथील भूमिस्वरूप व संरचनेविषयी अत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे. हिमालयापलीकडे तिबेटमधून शेकडो किमी. पूर्वेकडे वाहणारी ब्रह्मपुत्रा नदी याच उत्तुंग शिखराला वळसा घालून दक्षिणाभिमुख होते व पुढे भारतात उतरते.
भारतीय सर्वेक्षण विभागाचे समन्वेषक नेम सिंग यांनी १८७९ व किनथप यांनी १८८१ मध्ये, तर कॅप्टन सी. एल्. रॉबर्ट्सनने १९०० मध्ये या शिखराविषयीची प्रथम माहिती दिली असली, तरी शिखराचे स्थान आणि उंची यांविषयी निश्चित माहिती त्यांनी दिलेली नाही. एकोणिसाव्या शतकात हा प्रशासकीय प्रदेश नसल्यामुळे सर्वेक्षकांना या भागात प्रवेश मिळाला नाही.
१९१२ मधील अबोर व मिश्मी जमातींच्या प्रदेशावरील लष्करी स्वारीच्या वेळी कॅप्टन सी. एफ्. टी. ओक्स व जे. ए. फील्ड यांनी दक्षिणेकडून, तर कॅप्टन एच्. टी. मोर्शिड याने पूर्वेकडून या शिखराची पाहणी करून त्याचे स्थान व उंची निश्चित केली. मोर्शिडने शोधलेल्या येथील पाच हिमनद्यांपैकी सानलुंग ही सर्वांत लांब हिमनदी होय.
मोर्शिडच्या मते नामचा बारवा म्हणजे ‘आकाशातील चमकणारी वीज’. त्यानंतर १९२४ मध्ये एफ्. किंगडन वॉर्ड याने तिबेटच्या प्रवासाच्या वेळी हे शिखर पाहिले. शिखर सतत बर्फाच्छादितच असते. आसाम हिमालयाच्या जंगलवेष्टित उंच पर्वतरांगांमुळे दक्षिणेकडून हे शिखर दिसत नाही.
चौधरी, वसंत
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/23/2020