অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निल​गिरी पर्वत

निल​गिरी पर्वत

दोडाबेट्टा : एक दृश्य.
निल​गिरी पर्वत : द​क्षिण भारतातील प्रमुख डोंगरसमूह. हा पर्वतप्रदेश त​मिळनाडू राज्यात सु. २‚५९० चौ. ​किमी. क्षेत्रात पसरलेला आहे. सर्वच प्रदेश डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे. याच्या उत्तरेला सरासरी १‚००० ते १‚२१० मी. उंचीचे म्हैसूरचे पठार आहे. सभोवतीच्या सखल प्रदेशापासून ​निल​गिरीची उंची एकाएकी वाढत जाते. ​जिकडे​तिकडे अनेक ​शिखरे ​दिसून येतात. ती १‚८३० ते २‚४४० मी. उंच असून, दोडाबेट्टा या ​शिखराची उंची सर्वांत जास्त २‚६३७ मी. आहे. पूर्व बाजूला केवळ ३ ​किमी. अंतरावर एकदम २‚००० मी. चा उतार आहे. सामान्यतः येथील डोंगरउतार असेच तीव्र आहेत. दक्षिणेला कोईमतूरचे सरासरी ६१० मी. उंचीचे पठार आहे. ​निल​गिरीचे ‌कोईमतूरकडील (दक्षिण) उतारही तीव्र असून ते चहाच्या मळ्यांनी व्यापलेले आहेत.पैकारा व मोयार या नद्यांच्या खोऱ्यांनी ​निल​गिरीला दख्खन पठारापासून आ​णि दक्षिणेकडील भवानी नदीच्या खोऱ्यांनी कोईमतूर पठारापासून अलग केले आहे. या नद्यांच्या शीर्षप्रवाहांचे प​श्चिमवा​हिनी नद्यांनी अपहरण केले आहे. ‌‌

द​क्षिणेकडील पालघाट ​खिंडीपलीकडे अन्नमलई पर्वत व पलनी टेकड्या आहेत. ​निल​गिरी पर्वतप्रदेश म्हणजे केवळ जुन्या पठारांचा अव​शिष्ट भाग नसून, उत्तर जुरा​सिक व तृतीयक प्रारं​भिक काळांत ​निर्माण झालेले हे गटपर्वत (हॉर्स्ट) होते.​

निल​गिरी प्रदेशात वाढत्या उंचीनुसार पर्जन्यमान १५० सेंमी. ते ४०० सेंमी. पर्यंत वाढत जाते. ​हिवाळ्यात तपमान ३·२° से. ते २०° से. व उन्हाळ्यात १३° से. ते २४° से. असते. जानेवारी म​हिन्यात तपमान गोठण​बिंदूच्या आसपास गेल्यामुळे, ​किमान १२ ​दिवस तरी हवेत ​हिमतुषार असतात. ‌‌‌भरपूर पाउस आ​णि अनुकूल जमीन यांमुळे आसामप्रमाणेच ​निल​गिरीचा प्रदेश गर्द वनश्रीने युक्त आहे. अर्ध्याहून अ​धिक प्रदेश दाट जंगलमय आहे. दऱ्याखोऱ्यांतून ‘शोलास’ नावाची जंगले आहेत. ऊटकमंड व कुन्नूर तालुक्यांत जंगले जास्त आहेत. वाघ, ​चित्ते, काळवीट, सांबर, हत्ती हे प्राणी ​विशेषत्त्वाने आढळतात. ‌‌‌उत्तर भागातील उतारावर आता अभयारण्य​निर्माण केले आहे.

निलगिरी पर्वतउतारावरील चहामळा
निल​गिरी प्रदेशातील आ​र्थिक घडामोडी ऊटकमंड या थंड हवेच्या ​ठिकाणाभोवती गुंफलेल्या आहेत. ​
जिल्हा​धिकारी जॉन स​लिव्हनने १८६७ साली ऊटकमंडचे दृष्टिसौंदर्य आ​णि हवामान पाहून या स्थळाची थंड हवेचे ​ठिकाण म्हणून ​निवड केली‌‌‌व ​विकास केला. थंड हवा व रमणीय प​रिसर यांमुळे ऊटकमंड पर्यटकांमध्ये ​प्रिय झाले आहे. १८७६ साली ऑक्टर लोनी खोऱ्यात ४,००० एकरांत (१,६१९ हे.) कॉफीची लागवड केली गेली. १९०३–०४ मध्ये चहाची लागवड झाली. आता निलगिरीच्या उतरांवर बहुसंख्येने चहा–कॉफीचे मळे आहेत. सरकारी मळ्यांमध्ये सिंकोनाची लागवड केली जाते व कारखान्यात क्विनीन तयार केली जाते. पैकारा जलविद्युत् योजना १९३२ साली सुरू झाली.

पैकारा व मोयार या दोन नदीखोऱ्यांतील योजनांमुळे या भागात उद्योगधंद्यांची वाढ होत आहे. विख्यात ‘इंदू’ छायाचित्रणफिल्म ऊटकमंडला तयार होते. वेलिंग्टन व कुन्नूर ही परिसरीय उपनगरे आहेत. डोंगराळ भाग असल्याने उतारावर पायऱ्यापायऱ्यांची सोपान–शेती केली जाते. पुरेशी मागणी असल्याने भाजीपाला, फळे, चहा, कॉफी अशी नगदी पिके जास्त प्रमाणावर घेतली जातात. या डोंगराळ भागात तोडा, बदागा, इरूला, कुरूंबा व कोटा या वन्य जमाती आहेत. गुरे पाळणे आणि चहाच्या मळ्यांवर मोलमजुरी, हे या लोकांचे मुख्य व्यवसाय आहेत.

ऊटकमंड–वेलिंग्टन ते कोईमतूर असा तीन रूळी, ‘ब्लू मौंटन रेल्वे’ नावाचा लोहमार्ग व सडकही आहे. म्हैसूर ते ऊटकमंड मात्र केवळ सडकमार्ग आहे.

 

लेखक - मो. द. तावडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate