भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व व पश्चिम समुद्रतटांना समांतर अशा डोंगररांगा आहेत. त्यांतील पूर्वेकडील डोंगररांगांना पूर्व घाट व पश्चिमेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगांना पश्चिम घाट असे म्हणतात.
पूर्व घाटाचा दक्षिणोत्तर विस्तार सामान्यपणे उत्तरेस ओरिसातील महानदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वतापर्यंत मानला जातो. तथापि महानदीच्या उत्तरेकडील व निलगिरीच्या दक्षिणेकडील टेकड्या पूर्व घाटाचाच विस्तार आहे, असेही समजले जाते.
मात्र भौगोलिक दृष्ट्या ते यथार्थ वाटत नाही. या घाटातील डोंगररांगा ओरिसा, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांत पसरलेल्या आहेत.
पूर्व घाटांची लांबी सु. १,४५० किमी. असून त्यातील डोंगररांगा बंगालच्या उपसागर किनाऱ्यापासून सु. ८० ते २४० किमी. अंतरावर किनाऱ्याला समांतर पसरलेल्या आहेत. यांची सरासरी उंची ६१० मी. असली, तरी उत्तर व दक्षिण भागांत ती १,२०० ते १,५०० मी. पर्यंत आढळते. पश्चिम घाटाप्रमाणे येथील डोंगररांगा जास्त उंच वा तीव्र उताराच्या नाहीत किंवा सलगही नाहीत. तसेच त्यांची निर्मितीदेखील एकाच कालखंडात झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या निरनिराळ्या भागांत विविधता आढळते. पश्चिमेकडील उतारापेक्षा पूर्वेकडील उतार मंद आहे.
पूर्व घाटाची निर्मिती दख्खन लाव्हापूर्वकाळातील अनेक कालखंडांत झालेली असल्यामुळे त्यात विविध प्रकारचे खडक आढळतात. त्यांत प्रामुख्याने खोंडालाइट आणि चार्नोकाइट खडकांचे आधिक्य आहे. भूशास्त्रीय व भूसांरचनिक दृष्ट्या या घाटाचे मुख्यतः तीन विभाग पडतात :
(१) महानदी ते कृष्णा नदी यांदरम्याच्या रांगा,
(२) कृष्णा नदी ते मद्रास शहरापर्यंतच्या डोंगररांगा व
(३) मद्रास ते निलगिरी पर्वतापर्यंतच्या डोंगररांगा.
निलगिरी पर्वतामध्येच पूर्व व पश्चिम घाट एकत्र मिळतात.
महानदीपासून गोदावरी नदीपर्यंतच्या डोंगररांगा समुद्रकिनाऱ्यापासून २५ ते ४० किमी. अंतरावर ईशान्य-नैऋत्य दिशेने पसरल्या आहेत. विशाखापटनम् जवळ मात्र त्या किनाऱ्यालगत आल्या आहेत व त्यामुळेच विशाखापटनम् सुरक्षित बंदर ठरले आहे. पूर्व घाटातील या रांगा मुख्य असून येथेच खऱ्या डोंगराळ स्वरूपाचा प्रत्यय येतो. त्यांची निर्मिती कँब्रियन-पूर्व कालखंडात झाली आहे.
या रांगांची सरासरी उंची सु. १,१०० मी. असून महेंद्रगिरी (१,५०१ मी.) हे पूर्व घाटातील अत्युच्च शिखर याच भागात आहे. ह्या डोंगररांगा म्हणजे मचकुंद, शबरी, सिलेरू, भास्केल, इंद्रावती या पश्चिमवाहिनी व ऋषिकूल्य, नागावली, वंशधारा या पूर्ववाहिनी नद्यांचा जलविभाजक आहे. येथील चुनखडी प्रदेशात अनेक गुहा निर्माण झाल्या असून बोरा व गुप्तेश्वर या त्यांतील प्रसिद्ध गुहा आहेत. गोदावरी व कृष्णा या नद्यांदरम्यान मात्र या डोंगररांगा लोप पावल्या आहेत.
कृष्णा नदी व मद्रास शहर यांदरम्यानच्या पूर्व घाटात नल्लमलई, पालकोंडा, वेलिकोंडा इ. प्रमुख डोंगररांगांचा समावेश होतो. यांतील नल्लमलई व वेलिकोंडा या रांगा एकमेकींना समांतर असून त्यांची सरासरी उंची सु. ७६० मी. आहे. त्यांत नाइस व गाळाच्या खडकांचे आधिक्य आहे. या रांगा घडी-डोंगर-प्रकारात मोडतात. मद्रास शहराच्या उत्तरेस असलेल्या तिरुपती व नागरी टेकड्या ह्या क्वॉर्टझाइटयुक्त असून येथे पूर्व घाटाच्या या विभागाची समाप्ती होते. तिरुपती टेकड्यांतच तिरुपती हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
मद्रासच्या दक्षिणेकडील डोंगररांगा तमिळनाडूच्या चिंगलपुट, उत्तर व दक्षिण अर्काट, सेलम व कोईमतूर जिल्ह्यांतून नैऋत्य दिशेने जाऊन निलगिरीच्या रांगेत विलीन होतात. यांत मेलगिरी, कोल्लिइमलई, पछिमलई व गोदुमलई या प्रमुख टेकड्यांचा समावेश होतो. जावाडी व शेवराय टेकड्या पूर्व घाटाच्या बाह्य भागात असून कधीकधी त्यांनाही पूर्व घाटाचाच भाग मानतात. या भागास नाइस, स्फटिमय चुनखडक, क्वॉर्टझाइट, अभ्रकी सुमाजा व अँफिबोलाइट खडकांचे आधिक्य आहे.
पूर्व घाटात वार्षिक पर्जन्यमान सु. ५० ते १०० सेंमी. असून उत्तर भागातील काही ठिकाणी ते १०० ते २०० सेंमी. पर्यंत आढळते. डोंगररांगांच्या उतारांवर तुरळक अरण्ये आहेत. त्यांत साग, साल, चंदन इ. वृक्षप्रकार महत्त्वाचे आहेत. या घाटात उगम पावणाऱ्या बहुतेक नद्या लहान व कमी लांबीच्या आहेत.
मैकल डोंगरात उगम पावणारी महानदी आणि पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या गोदावरी, कृष्णा, पेन्नार, पोन्नाइय्यार, कावेरी या प्रमुख पूर्ववाहिनी नद्या पूर्व घाटाचे खनन करून बंगालच्या उपसागरास मिळतात. पूर्व घाटाच्या डोंगररांगा व समुद्रतट यांदरम्यानच्या सु. ८० – २४० किमी. रुंदीच्या पट्ट्यात या नद्यांनी त्रिभुज प्रदेश तयार केले आहेत.
या घाटातून वाहणाऱ्या नद्यांवर जलसिंचन व जलविद्युत निर्मितीसाठी धरणे बांधली आहेत. या भागात खोंड, चेंचू या आदिवासींचे प्रमाण जास्त आहे. पूर्व घाटाची उंची, तुटक स्वरूप व भूशास्त्रीय विविधता पाहता त्याला एक भूसांरचनिक विभाग मानणे काहीसे कठीणच आहे.
ओक, द.ह.; फडके, वि. शं.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/27/2020