पाश्चिम-मध्य महाराष्ट्रात वायव्य-आग्नेय दिशेने पसरलेली डोंगररांग. सह्याद्रीचाच एक फाटा असलेली ही रांग, अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड डोंगररांगेपासून सुरू होते. बालाघाट डोंगररांगेचे प्रमुख तीन फाटे आहेत.
पहिली रांग बीड जिल्ह्यातून पुढे परभणी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून नांदेड जिल्ह्यापर्यंत जाते. या रांगेची लांबी सु. ३२० किमी., रुंदी ५ ते ९ किमी. व सस.पासून उंची सु. ६०० ते ७५० मी. आहे. पश्चिमेकडील भाग सर्वांत जास्त उंचीचा (चिंचोलीजवळ ८८९ मी.) असून पूर्वेकडे क्रमाक्रमाने उंची कमी होत जाते.
याच रांगेचा दुसरा फाटा आष्टी तालुक्यापासून (बीड जिल्हा) आग्नेयीस उस्मानाबाद जिल्ह्यातून पुढे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यापर्यंत जातो. तिसरा फाटा परभणी जिल्ह्याच्या दक्षिण भागात सुरू होऊन आग्नेयीस आंध्र प्रदेशातील निझामाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीपाशी संपतो. यांतील पहिल्या दोन डोंगररांगांदरम्यानचा पठारी भाग ‘बालाघाट पठार’ या स्थानिक नावाने ओळखला जातो.
ही डोंगररांग म्हणजे दख्खनच्या पठारावरील लाव्हापासून बनलेले व बेसाल्ट खडकांचे ठळक भूविशेष आहेत. ठिकठिकाणी सपाट डोंगरमाथ्याचा व रुंद खिंडींचा हा प्रदेश असून तो पूर्वेस भीमेच्या सखल खोऱ्यात विलीन होतो. बालाघाट डोंगररांग गोदावरी व मांजरा, भीमा या नद्यांचा जलविभाजक आहे.
या नद्यांच्या क्षरण कार्यामुळे या पठारी प्रदेशाची रुंदी कमी झाली आहे. बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, वाण इ. या डोंगररांगेतून वाहणाऱ्या नद्या गोदावरी व मांजरा नद्यांच्या उपनद्या आहेत. या रांगेचा दक्षिण उतार उत्तर उतारापेक्षा मंद आहे.
बालघाट डोंगररांगेमुळे बीड जिल्ह्याचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग झाले आहेत. या भागात पर्जन्याचे प्रमाण कमी असल्याने बहुधा हा अवर्षणग्रस्त असतो. याच्या पश्चिम भागात पावसाळ्यात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. पूर्व भाग मात्र अत्यंत खडकाळ आहे. या प्रदेशातील लहानलहान गावे मेंढपाळांनी मळलेल्या वाटांनी जोडलेली आहेत. पुणे-नासिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० व दौंड-मनमाड हा लोहमार्ग ही डोंगररांग पार करून जातात.
कापडी, सुलभा
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/1/2020