कॉरोमांडल, कॅलिमीर, भूशिरापासून पेन्नरच्या मुखापर्यंतच्या भारताच्या पूर्व किनाऱ्यास कोरोमंडल किनारा म्हणतात. कोरोमंडल नावाच व्युत्पत्तीबद्दल अनेक मते आहेत. चोलामंडलम्चा (चोलांच्या राज्यातील प्रदेश) अपभ्रंश होऊन कोरोमंडल नाव पडले असणे शक्य आहे. या सु. ७२५ किमी. लांबीच्या किनारपट्टीचा काही भाग हल्ली तमिळनाडूत आणि काही आंध्र प्रदेशात आहे. समुद्रकिनाऱ्यापासून पूर्व घाटापर्यंतचा हा प्रदेश सपाट असून किनारा दंतुर नसल्यामुळे यावर नैसर्गिक बंदरे नाहीत. नेगापटम्, पाँडिचेरी, मद्रास ही या किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे मानवनिर्मित असून दरवर्षी त्यांवर लाखो रुपये खर्च होतो. पुलिकत हे खारकच्छ या किनाऱ्यावर असून त्यातील बेटांवर चुना तयार करण्याचा उद्योग चालतो.
या प्रदेशाचे हवामान उष्ण असून चैत्रपासून आश्विनापर्यंत रात्री काहीशा शीतल भासतात. या भागात वर्षाकाठी सु. ७५ ते १०० सेंमी. पाऊस पडतो. पैकी जवळजवळ २/३ आश्विनापासून मार्गशीर्षापर्यंत ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे व बाकीचा वैशाखानंतर पडतो. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वादळांमुळे, विशेषतःवर्षाच्या उत्तरार्धात, या प्रदेशात बरेच नुकसान होते. कावेरी, पालार, पोन्नाइय्यार, पेन्नर या नद्यांचे त्रिभुज प्रदेश या किनाऱ्यावर असून तांदूळ हे ह्या सुपीक भूभागातील मुख्य पीक आहे. मात्र त्याला पाणी पुरवावे लागते. समुद्रकाठी मासेमारी व मीठ तयार करणे, हे मुख्य उद्योग आहेत. जळण, वाळविलेली आणि खारवलेली मासळी, मीठ यांची बरीचशी वाहतूक किनाऱ्याला संमातर गेलेल्या बकिंगहॅम कालव्यातून होते. अलीकडे या किनाऱ्यावर लिग्नाइट कोळसा सापडला आहे. भुईमूग, कापूस, तीळ, नाचणी, कुंबू (बाजरी) ही येथील इतर पिके होत.
नेगापटम्, कारिकल, चिदंबरम्, कडलोर, पोर्तोनोव्हो, पाँडिचेरी, चिंगलपुट, मद्रास, नेल्लोर, ओंगोल इ. प्रसिद्ध शहरे या किनारपट्टीवर आहेत. तंजावर, तिरुचिरापल्ली, कांचीपुरम्, जिंजी, वांदीवाश, अर्काट इ. शहरे किनाऱ्यापासून अधिक दूर आहेत.
लेखक : शा.नि.ओक