कोल्लम्. केरळ राज्याचे महत्त्वाचे निर्यातीचे बंदर व जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या १,२४,२०८ (१९७१). हे त्रिवेंद्रमच्या वायव्येस ६४ किमी. वर पुरातन नगर असून ‘कोल्लम्’ म्हणून १०१९ मध्ये स्थापित झाले. त्याच्या स्थापनेपासून मल्याळी शक सुरू होतो. इतिहासकाळी फिनिशियन, इराणी, अरब, ग्रीक, रोमन व चिनी गलबते या बंदरी येत. सातव्या शतकातील ख्रिस्ती धर्माचे दक्षिणतम टोक म्हणून याचा उल्लेख आहे. अरबी भाषेतील ‘कौलम मल्ल’ व मार्को पोलोचे ‘कोईलम’ हेच. तेराव्या-चौदाव्या शतकांत याला बरेच महत्त्व होते.
क्विलॉनचे नैसर्गिक स्थान आणि व्यापारी महत्त्व पाहून प्रत्येक परकीय सागरी सत्तेला याची हाव सुटली; त्यामुळे या नगराची राजकीय स्थित्यंतरे पुष्कळ झाली. पोर्तुगीजांनी येथे घातलेली वखार १६६२ मध्ये डचांनी आणि त्यांच्याकडून ब्रिटिशांनी घेतली. एके काळी पश्चिम किनाऱ्याचे हे सर्वश्रेष्ठ बंदर होते.
कालांतराने याचे महत्त्व कमी झाले; पण तिनेवेल्लीपासून येथे लोहमार्ग आल्यावर तेव्हाच्या मद्रास प्रांताशी याचा व्यापारी संबंध पुन्हा प्रस्थापित झाला. अष्टमुडी सरोवराकाठच्या येथील निसर्गसुंदर परिसरात माजी त्रावणकोर नरेशांचा प्रासाद आहे. या शहरापासून तीन किमी. वरील संस्थानकालीन ३९ हे. भागाला, तंगासेरी अथवा चंगनाचेरी म्हणतात. त्या बाजूच्या द्विपगृहाकडे दोन ख्रिस्ती समाधिप्रांगणे आणि १५०३ मधील पोर्तुगीजांचा किल्ला – सेंट टॉमस – आता पडीक आहे.
क्विलॉन अंतर्तट जलमार्गांनी अलेप्पी व कोचीन बंदरांशी जोडलेले आहे. येथून नारळ, खोबरे, काथ्या, इमारती लाकूड, मासे, काजू वगैरे निर्यात होतात. सुती कापड, दोर, काथ्यापाट, चिनी फरशी, विणकाम यंत्रे, पत्र्याचे डबे, लाकडी तक्ते आणि पेन्सिली बनविणे हे उद्योगधंदे असून पीठ दळण्याचे तसेच काजू, चिंच यांवर प्रक्रिया करण्याचे कारखाने येथे आहेत. येथून १२ किमी. वर कुदारा या औद्योगिक वसाहतीत चिनी मातीचे, अॅल्युमिनियमचे व रासायनिक पदार्थांचे कारखाने आहेत. यांखेरीज कोरीव लाकूडकाम, फर्निचर आणि आगपेट्या बनविण्याचे कुटिरोद्योगही क्विलॉनला चालतात.
केरळ किनाऱ्यावरील वाळूत मिळणाऱ्या दुर्मिळ पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या इंडियन रेअर अर्थ्स या कंपनीच्या खनिज विभागाचे कार्यालय क्विलॉनला आहे. त्याच्यामार्फत इल्मेनाइट, रूटाइल, मोनॅझाइट, झिर्कॉन, सिलिमनाइट,ल्युकॉक्झीन व गार्नेट यांचे उत्पादन केरळ व तमिळनाडू राज्यांतील कारखान्यांत होते.
ओक, शा. नि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/15/2020