अरबी समुद्राचा गुजरात राज्यामध्ये शिरलेला फाटा. सौराष्ट्राच्या दक्षिण टोकावरील दीवपासून सुरतच्या दक्षिणेकडील दमणपर्यंत याची हद्द समजण्यात येते. सु. २०० किमी. लांब, २४ — २०० किमी. रुंद व सरासरी ८ — १२ मी. खोल असलेल्या या आखातास पूर्वेकडून तापी, नर्मदा; उत्तरेकडून मही, साबरमती आणि तिन्ही बाजूंनी अनेक लहान नद्या मिळतात.
नद्यांनी आणलेल्या गाळामुळे खंबायत, भडोच, सुरत या एकेकाळच्या भरभराटलेल्या बंदरांचे महत्त्व आता कमी झाले. तसेच किनाऱ्याजवळ अनेक बेटे व दलदलीचा प्रदेश निर्माण झाला.
वादळी व विषम हवामानासाठी आखात प्रसिद्ध असले, तरी येथे सापडलेल्या तेलाच्या साठ्यामुळे खंबायत आखाताला ऊर्जितावस्था येईल असे दिसते.
शाह, र. रू.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/26/2020