झेलम जम्मू-काश्मीर राज्यात, बनिहाल खिंडीच्या पायथ्याशी, वेरिनाग येथील झऱ्यात उगम पावून पीर पंजाल पवर्ताच्या उत्तर उतारावरून, काश्मीरच्या दरीतून अनंतनाग, श्रीनगर इ. शहरांवरून वायव्येकडे वुलर सरोवरात जाते. त्यातून सोपूर येथे बाहेर पडून नैऋत्येकडे बारमूलवरून ती पीर पंजालच्या अत्यंत खोल, उभ्या भिंतीच्या निदरीतून जाऊन पुन्हा वायव्येस जाते.
मुझफराबाद येथे तिला किशनगंगा मिळते. इतरही लहानमोठ्या उपनद्या तिला मिळालेल्या आहेतच. मग दक्षिणेकडे वळून ती भारताचे जम्मू-काश्मीर राज्य व पाकिस्तानचा वायव्य सरहद्द प्रांत यांच्या सीमेवरून जाऊन पूंछ नदी मिळाल्यानंतर पाकिस्तानात मीरपूरला येते. मांगला येथे शिवालिक रांग भेदून ती गाळमैदानात उतरते.
नैऋत्येकडे झेलम गावावरून मिठाच्या डोंगराजवळून खुशाब येथे आल्यावर दक्षिणवाहिनी होऊन ती त्रिम्मू येथे चिनाबला मिळते. गाळमैदानात काश्मीरप्रमाणेच ‘कारेवा’चे उंच प्रदेश आढळतात. येथे प्लाइस्टोसीन काळातील सस्तन प्राण्यांचे जीवाश्म व मानवी वस्तीचे अवशेष सापडले आहेत.
झेलमच्या खालच्या प्रवाहाचा उपयोग पाकिस्तानने ओलीतासाठी व जलविद्युत् निर्मितीसाठी केला आहे. तिला उन्हाळ्यात वितळलेल्या बर्फाचे व पावसाळ्यात पावसाचे पाणी मिळते. झेलम व चिनाब यांच्यामधील दोआबास ‘चज’ म्हणतात. मांगला धरणामुळे बारा लक्ष हे. जमिनीला पाणी मिळते व त्याची दहा लाख किवॉ.
विद्युत् उत्पादनक्षमता आहे. मांगलापासून निघालेला अपर झेलम कालवा पूर्वेला खांकी येथे चिनाबला मिळतो, तर लोअर झेलम कालवा रसूल येथील धरणापासून निघतो.
झेलम शहरातील झेलमवरील पुलावरून लाहोर–रावळपिंडी प्रमुख सडक आणि लोहमार्ग जातो. श्रीनगर, मलकव्हाल, खुशाब येथे व अन्यत्रही झेलमवर पूल आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील, जम्मू-काश्मीरातील व पाकिस्तान-जम्मू-काश्मीर यांतील दळणवळण सुलभ झाले आहे.
यार्दी, ह. व्यं.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020