অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नर्मदा नदी

नर्मदा नदी

नर्मदा नदीवरील कपिलधारा धबधबा

नर्मदा नदी

 

 

 

 

(रेवा, अमरजा, मैकलकन्या इ.) उत्तर भारत व दख्खन पठार यांच्या सीमेवरील खचदरीतून पश्चिमेकडे वाहणारी नदी. लांबी १,३१० किमी. व जलवाहन क्षेत्र ९८,४२० चौ. किमी. ही मध्य प्रदेश राज्यातील मैकल पर्वतश्रेणीच्या अमरकंटक पठारावर, सु. १,०५७ मी. उंचीवर एका झऱ्यातून उगम पावून त्या राज्यातून

१,०७८ किमी. वाहते. नंतरचे ३२ किमी. ती मध्य प्रदेश व महाराष्ट्र आणि त्यानंतरचे ४० किमी. महाराष्ट्र व गुजरात राज्यांची सीमा बनते. शेवटचे १६० किमी. ती गुजरात राज्यातून जाऊन भडोचजवळ अरबी समुद्राच्या खंबायतच्या आखातास मिळते. दख्खन पठारावरील इतर नद्या सामान्यतः पूर्वेकडे वा आग्नेयीकडे वाहतात. परंतु तापीप्रमाणेच नर्मदाही पश्चिमवाहिनी आहे. तिच्या मार्गात अनेक छोटेछोटे धबधबे व द्रुतवाह आहेत. त्यामुळे तिचे ‘उड्या मारीत जाणारी’ या अर्थाचे रेवा हे नाव सार्थ ठरते.

इतर नद्यांप्रमाणे ती ‘प्रौढ’ किंवा ‘वृद्ध’ झालेली नसून अद्याप ‘तरुण’ आहे. तिचे खोरे लांबट व अरुंद असून त्यात हिमालयाच्या उत्थानाच्या वेळी झालेल्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या खचदरीचा समावेश आहे. या खचदरीच्या तळाशी खडक असून त्यावर १५० मी. पेक्षा जास्त जाडीचा गाळाचा थर आहे. या खोऱ्यात बेसाल्ट, चुनखडक, वालुकाश्म, ग्रॅनाइट व नाइस, डोलोमाइट, शेल, संगमरवर इ. प्रकारचे खडक असून त्यांत लोखंड, मँगॅनीज, कोळसा, डोलोमाइट, संगमरवर, चुनखडक इ. खनीजे सापडतात. येथे सुपीक काळी माती व गाळमाती असून नदीच्या वरच्या डोंगराळ भागात तांदूळ व भरडधान्ये, वरच्या सपाट भागात गहू व ज्वारी आणि खालच्या भागात कापूस, तेलबिया व ज्वारी ही मुख्य पिके होतात.

उगमानंतर नदी प्रथम उत्तरेस व वायव्येस वाहते. सु. २५ मी. उंचीच्या कपिलधारा धबधब्यावरून खाली कोसळून ती डोंगराळ भागातून अनेक तीव्र वळणे घेऊन खोल व अरुंद खोऱ्यातून एका तीव्र वळणाजवळ मंडला येथे येते. मंडला व जबलपूर यांदरम्यान नर्मदा खोरे सापेक्षतः रुंद आहेत. जबलपूरजवळ अरुंद घळईतून ती धुवांधार धबधब्यावरून ३५ मी. खाली येते. एके ठिकाणी ही घळई एखादे माकड किंवा हरिण सहज उडी मारून पलीकडे जाईल इतकी अरुंद आहे. तेथे तिला बंदरकुदी किंवा हरणफाळ म्हणतात.

यानंतर तिची ३ किमी. लांबीची सुप्रसिद्ध भेडाघाटची संगमरवरी खडकांची घळई आहे. तिचे खडे काठ १२–१५ मी. उंच, संगमरवर व बेसाल्ट यांनी युक्त आहेत. यानंतर नदी जबलपूर ते हंडिया या ३५० किमी.च्या सुपीक, मैदानी भागात येते. तथापि त्याला उत्तरेस विंध्य व दक्षिणेस सातपुडा यांची स्पष्ट नैसर्गिक सीमा आहे. उत्तरेकडील उभ्या भिंतीसारख्या भृगूचा माथा एकसलग असून त्यात एक-दोनच खिंडी आहेत. त्यामुळे नर्मदेला उत्तरेकडून हिरण ही एकच प्रमुख उपनदी मिळते. इतर उजवीकडील उपनद्या बरना, कोलार व ओसरंग या होत.

सातपुड्याच्या उत्तर उतारावरून मात्र बंजार, शेर, शक्कर, गंजाल, तवा, छोटी तवा, कुंडी इ. उपनद्या येऊन मिळतात. छोटी तवा संगमाजवळ मंधार व दर्डी हे प्रत्येकी १२ मी. उंचीचे धबधबे आहेत. मंधार प्रपाताच्या अलीकडे ३४ किमी. पुनासा धरणाची जागा आहे. नर्मदाकाठावरील महेश्वर या अहिल्याबाई होळकरांच्या राजधानीपासून ८ किमी. सहस्त्रधारा हा धबधबा आहे. मांधातानंतरच्या डोंगरातून बाहेर पडून नर्मदा १५० किमी. च्या सुपीक मंडलेश्वर मैदानात येते. मग हरिंगपालजवळच्या १५० किमी.च्या शेवटच्या घळईतून ती राजपीपलाच्या पूर्वेस गुजरातच्या मैदानात येते. तेथे वळणे घेत घेत ती ८० किमी.वरील भडोच शहराखाली रुंद होऊन २८ किमी. रुंदीच्या व २५ किमी. लांबीच्या खाडीने समुद्रास मिळते.

नर्मदा खोऱ्यात पाऊस भरपूर पडतो. मैकल पर्वतभागात १४० सेंमी.पेक्षा जास्त, सातपुडा भागात ११४ ते १२७ सेंमी., खालच्या मैदानी प्रदेशात ६४ ते ७६ सेंमी. व गुजरातच्या मैदानी प्रदेशात १०२ ते १२७ सेंमी. पाऊस पडतो. नर्मदेला व तिच्या उपनद्यांना मोठमोठे पूर येतात. सतलज व बिआस मिळून जेवढे पाणी वाहते, त्यापेक्षा जास्त पाणी नर्मदा आणते; परंतु ते बहुतेक सर्व तसेच समुद्रास जाऊन मिळते.

नर्मदा खोऱ्याच्या ८५,९३,००० हे. क्षेत्रापैकी २८,३६,००० हे. वनाच्छादित; ५१,८९,००० हे. लागवडीस योग्य; ३३,२८,००० हे. प्रत्यक्ष लागवडीखाली व ८९,००० हे. ओलिताखाली आहे. आता खोऱ्यातील १६ ठिकाणी ओलितासाठी व १३ लक्ष किवॉ. जलविद्युत् उत्पादनासाठी प्रकल्प होत आहेत. त्यांत हुशंगाबादपर्यंतचा तवा नदीप्रकल्प सध्या प्रमुख आहे. त्याने ३·३२ लक्ष हे.

जमिनीस पाणी मिळेल. १९७४-७५ मध्ये १,१०० हे. जमिनीस रब्बी हंगामात पाणी मिळाले. तवा व बरना मिळून २०,००० किवॉ. वीज मिळेल. बर्गी व पुनासा या प्रमुख धरणांच्या नर्मदासागर प्रकल्पाची १२ धरणे, २५·५६ लक्ष हे. जमिनीस पाणी व ५,७५,००० किवॉ. जलविद्युत उत्पादन अशी योजना आहे.

नर्मदेच्या दोन्ही तीरांवर, विशेषतः डोंगराळ भागात, साग, साल इ. उपयुक्त वृक्षांची घनदाट अरण्ये असून त्यांपैकी शूलपाणी, ओंकार, छोटे महारण व मोठे महारण ही प्रमुख आहेत. खोऱ्याचा १/३ भाग अरण्यमय असून १७ लक्ष हे. क्षेत्र राखीव जंगल आहे. वाहतूकसुधारणा झाल्यावर या वनसंपत्तीचा चांगला विकास होऊ शकेल. येथे महिष, हरिण, वानर, व्याघ्र इ. प्राणी व चक्रवाक, कारंड व हंस, जलकुक्कुट, सारस इ. पक्षी आहेत.

नर्मदा तिच्या मुखापासून चांदोदपर्यंत फक्त ११२ किमी. नौसुलभ आहे. ती हुशंगाबादपर्यंत जलवाहतुकीस योग्य झाली, तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्भागापर्यंत वाहतूक व व्यापार वाढेल. नर्मदा खोऱ्यातून खांडवा–इटारसी–जबलपूरवरून अलाहाबादला जाणारा आणि खांडव्यावरून इंदूरकडे जाणारा हे लोहमार्ग जातात. भडोचवरून पश्चिम रेल्वेचा मुंबई–दिल्ली मार्ग जातो. भडोच, जबलपूर, हुशंगाबाद, मोरटक्का येथे रेल्वेपूल आहेत. खोऱ्यातून मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्ग जातो. तथापि वाहतुकीच्या सोयीच्या दृष्टीने नर्मदा खोरे अद्याप बरेचसे अविकसितच आहे.

पुराणकाळात रावण, सहस्त्रार्जुन, परशुराम इत्यादींची युद्धे नर्मदा परिसरात झाली. रामायण-महाभारत काळांतील अनेक ऋषींचे आश्रम व तपोभूमी नर्मदा परिसरात होत्या. इतिहासकालात गुप्त, शक, वाकाटक, भारशिव, अहीर तसेच हर्ष, पुलकेशी इत्यादींच्या सत्ता नर्मदा परिसरात झाल्या. त्यापुढील काळात मोगल, मराठे, इंग्रज यांच्या सत्ता झाल्या व आता स्वतंत्र भारतात हा परिसर समाविष्ट आहे. येथील जंगलात आदिवासींची वस्ती बरीच आहे. पेंढारी व इतर लुटारूंस पूर्वी येथे चांगला आश्रय सापडत असे.

हिंदूंच्या दृष्टीने नर्मदा नदीला फार मोठे धार्मिक महत्त्व आहे. ती शिवाच्या अंगापासून निघाली असे मानतात. त्यामुळे ती गंगेखालोखाल पवित्र मानली जाते. हिच्या काठी कोटितीर्थ, कपिलधारा, ओंकार मांधाता, सहस्त्रधारा, शूलपाणी, महेश्वर, विमलेश्वर इ. शिवतीर्थे असून मंडला, जबलपूर, हुशंगाबाद, हंडिया, महेश्वर, गरुडेश्वर, हापेश्वर, निमावर, भडोच इ. नगरे वसलेली आहेत.

शुक्लतीर्थ येथील वडाच्या झाडाला संत कबीराचे नाव आहे व भडोचजवळ बळी राजाने केलेल्या अश्वमेधाची जागा दाखवितात. नर्मदेच्या मुखापासून एका काठाने उगमापर्यंत व दुसऱ्या काठाने उगमापासून मुखापर्यंत काही विशिष्ट बंधने पाळून पायी ‘नर्मदा परिक्रमा’ करणे, हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.

 

यार्दी, ह. व्यं.; कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate