অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सतलज

सतलज

सतलज

भारतीय उपखंडातील ‘ पंजाब प्रांतातून ’ वाहणाऱ्या व सिंधू नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख पाच नदयांपैकी सर्वांत लांब (सु. १४०० किमी.) नदी. वेदांमध्ये सुतुद्री किंवा शतद्रू, टॉलेमीच्या वर्णनांत झाराद्रॉस, पंजाबमध्ये हैमावती इ. नावांनी तिचे उल्लेख आढळतात.

सर्वसामान्यपणे ईशान्य-नैऋर्त्य दिशेने वाहणारी ही नदी तिबेटमध्ये कैलास पर्वतरांगेत ३०° २० उ. अक्षांश व ८०° २५ पू. रेखांश यांदरम्यान सस.पासून सु. ४,६०० मी. उंचीवर उगम पावते. मानसरोवराच्या वायव्येस राक्षसताल (तिबेटी-लेक लांगा) सरोवरातून उगम पावणारी ही नदी प्रथम वायव्य दिशेने शिपकी खिंडीपर्यंत तिबेटमधून वाहत जाते. येथपर्यंत ती सस.पासून सु. ३,००० मी. पर्यंत खाली येते. या प्रदेशात तिबेटी लोक तिला ग्लांगचेन खबाब (गज मुखोद्‌भूत) अथवा झिआंक्वान म्हणतात. त्यानंतर ती भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातून नैऋत्य दिशेने वाहत जाऊन पंजाबच्या मैदानी प्रदेशात नानगल येथे येते.

पुढे दक्षिणेकडे वाहत जाऊन रूपार येथे एकदम पश्र्चिम वाहिनी बनते. अमृतसरच्या दक्षिणेस हरिके येथे तिला उजवीकडून बिआस (व्यास) नदी मिळते. पुढे सतलज नदी सु. १०५ किमी. भारत - पाकिस्तान यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन सुलेमान येथे पाकिस्तानात प्रवेश करते. त्यानंतर ३५० किमी. गेल्यावर बहावलपूरच्या पश्र्चिममेस तिला उजवीकडून मडवाला येथे चिनाब नदी येऊन मिळते. येथपासून या नदयांचा संयुक्त प्रवाह ‘ पंचनद ’ या नावाने सिंधू नदीस मिथानकोट येथे जाऊन मिळतो.

सतलज नदीला उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे व पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा पुरवठा होतो. पावसाळ्यात नदीला अनेकवेळा महापूर येतो. १९५५ मध्ये आलेल्या सर्वांत मोठया महापुरावेळी नदीपात्रातून सेकंदाला १६,९०० घ. मी. पाणी वाहत होते. हिवाळ्यात मात्र उगम प्रदेशातील हिमनदया गोठल्यामुळे नदीला पाणीपुरवठा कमी होतो व प्रवाहाचा वेगही कमी राहतो. मैदानी भागातून वाहताना सतलज नदीने अनेक वेळा पात्र बदलल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. तिचा एक फाटा काही काळ कच्छच्या रणामधून वाहत असल्याचे तज्ञांचे मत आहे. इ. स. दहावे शतक ते सोळावे शतक या कालावधीत तिने तीन ते चार वेळा प्रवाह बदलल्याचे पुरावे आढळतात. सांप्रतचा प्रवाह हा अठराव्या शतकापासून पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येते.

सतलज नदीखोऱ्याची वरच्या भागातील जमीन खालच्या टप्प्यातील जमिनीपेक्षा जास्त सुपीक आहे. खालच्या टप्प्यातील बहुतेक भाग राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात मोडतो. मैदानी प्रदेशात या नदीचा बहुउद्देशीय प्रकल्पांसाठी उपयोग करून घेण्यात आला आहे. रूपार येथे उभारण्यात आलेल्या सरहिंद कालवा प्रकल्पामुळे तिच्या पाण्याचा शुष्क प्रदेशाला मोठया प्रमाणात उपयोग झाला आहे.

बिआस नदीसंगमानंतरचे अप्पर सतलज प्रकल्प व लोअर  सतलज प्रकल्प यांमुळे वाळवंटी भागातील बहुतेक प्रदेश सिंचनाखाली आला आहे. याशिवाय भाक्रा-नानगल, सतलज नदीखोरे प्रकल्प यांव्दारा हिचे खोरे समृद्ध झाले आहे. ही नदी मैदानी प्रदेशात बहुतेक भागात लहान नावांvdvdaraकीसाठी वर्षभर उपयुक्त ठरते. सतलज नदीच्या उगमप्रवाहाचे इ. स. २००४ ते २००६ या कालावधीत जर्मन, रशियन व अमेरिकन संशोधकांनी मोठया प्रमाणात सर्वेक्षण केले आहे. रामपूर, बिलासपूर (हिमाचल प्रदेश); रूपनगर, फिरोझपूर (पंजाब); बहावलपूर (पाकिस्तान) ही या नदीकाठावरील मोठी शहरे आहेत.


कुंभारगावकर, य. रा.; चौंडे, मा. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 11/13/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate