অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मलबार

मलबार

मलबार

भारताच्या पश्चिम किनारपट्टीपैकी साधारणतः गोव्याच्या दक्षिणेकडील किनाऱ्याला ‘मलबारचा किनारा’ असे म्हटले जाते. लांबी सु. ८८५ किमी. व कमाल रुंदी ११३ किमी. यांच्या पूर्वकडे पश्चिम घाटाच्या पर्वतरांगा, तर पश्चिमेस अरबी समुद्र आहे. या किनाऱ्यामध्ये कर्नाटक राज्याचा किनारा, केरळ राज्याचा जवळजवळ सर्व भाग व तमिळनाडू राज्याच्या थोड्याशा प्रदेशाच समावेश होतो.

जुन्या भारतीय भाषांतील ग्रंथांत ‘मलबार’ चा उल्लेख फारसा आढळत नाही. हा शब्द परदेशी प्रवाशांच्या लिखाणातच अधिक आढळतो. मणिबार, मिनिबार, मेलीबार,मलाईबार अशी मलबार शब्दाची इतर रूपे आढळतात.

मलबारच्या किनाऱ्‍याचे पश्चिमेकडून पूर्वेकडे तीन विभाग पडतात :

(१) पश्चिमेकडील वालुकामय, कच्छ वनश्रीने व ताड वृक्षांनी वेढलेली खाजणयुक्त कमी उंचीची किनारपट्टी,

(२) पूर्वेकडील तीव्र उतारांचा वनाच्छादित प्रदेश आणि

(३) या दोहोंमधील सपाट व अरूंद पट्टी.

समुद्रकिनाऱ्‍यावर सलग असे वाळूच्या दांड्यांचे पट्टे असून त्यांची निर्मिती प्रामुख्याने नैऋर्त्य मोसमी वाऱ्‍यांच्या काळात निर्माण होणाऱ्‍या सागरी लांटामुळे झालेली आहे. वाळूच्या दांड्यावर नारळाची झाडे भरपूर असून किनाऱ्‍याला समांतर अशी अनेक खारकच्छेही आहेत. त्यांचा उपयोग लहानलहान बोटींना अंतर्गत भागात जलवाहतूक करण्यासाठी होतो. कोचीन, कालिकत (कोझिकोडे) ही येथील प्रमुख बंदरे आहेत.

किनाऱ्‍याचा अंतर्गत भाग सपाट व सुपीक आहे. पश्चिम घाटात उगम पावणारे अनेक प्रवाह यातून वाहतात. तांदूळ व मसाल्याचे पदार्थ, मिरी, रबर, सिंकोना, कॉफी ही येथील प्रमुख उत्पादने आहेत. नारळ व ताड वृक्ष प्रामुख्याने किनाऱ्यावर जास्त आढळतात.

किनाऱ्‍यावर मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. पूर्वेकडील पर्वतमय प्रदेशाची सरासरी उंची ९०० मी. असून निलगिरी पर्वतात ती २,६७० मी. पर्यंत आढळते. पश्चिम घाटाच्या या पर्वतरांगामुळे भारताच्या इतर प्रदेशांपासून मलबारचा किनारा वाहतुकीची आधुनिक साधने येण्यापूर्वी एकाकी पडलेला होता. मलबारच्या किनाऱ्‍यावर,विशेषतः दक्षिण भागात, लोकवस्ती दाट आहे.

येथील हवामान उबदार व दमट असून पर्जन्य २०० ते २५० सेंमी. पडतो. दक्षिणेकडून उत्तरेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत गेली असून दक्षिणेकडे वार्षिक सरासरी पर्जन्य २५४ सेंमी., तर उत्तरेकडे १९० सेंमी. पूर्वेकडील पर्वत उतारावर पर्जन्याचे प्रमाण ५०० सेंमी. पेक्षाही अधिक असून काही ठिकाणी ते ७६२ सेंमी. पर्यंतही जाते. भरपूर उष्णता व पर्जन्य यांमुळे पर्वतउतारांवर उष्ण कटिबंधीय वर्षारण्ये असून त्यांत प्रामुख्याने साग, एबनी चंदन हे वृक्षप्रकार आढळतात.

पूर्वीपासून या प्रदेशात अनेक लहानलहान राज्ये होती. मसाल्याचे पदार्थ, चंदन, उत्तम प्रतीचे लाकूड यांच्या विपुलतेमुळे परदेशी व्यापारी मलबारकडे आकृष्ट झाले होते. इ.स.पू. पहिल्या शतकापासून याच्या बऱ्याचशा भागावर चेर वंशाचे वर्चस्व होते. व ते पुढे बराच काळ टिकले, असे म्हटले जाते. भारताला भेट देणारा पहिला ख्रिस्ती धर्मोपदेशक सेंट टॉमस हा इ.स. ५२ मध्ये मलबारच्या किनाऱ्यावर आल्याचे सांगितले जाते.

पाचव्या ते सातव्या शतकांच्या दरम्यान या प्रदेशात सामुरी, कोचीनचे राजे व इतर छोटे संस्थानिक यांची राज्ये होती. १४९८ ते १५०३ या काळात पोर्तुगीजांनी येथे येऊन अनेक व्यापारी ठाणी स्थापन केली. सतराव्या शतकात डच व अठराव्या शतकात फ्रेंच लोक येथे आले, तर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात हा भाग ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली गेला. मोपल्यांचे बंड (१९२१−२३) याच प्रदेशात झाले.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर राज्यपुनर्रचनेच्या वेळी हा प्रदेश वेगवेगळ्या राज्यांत विभागला गेला. केरळमधील राष्ट्रीय चळवळ त्रावणकोर-कोचीन प्रदेशांपेक्षा मलबारमध्ये लवकर रूजली,तर भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे हे एक आद्य केंद्र मानले जाते.

या प्रदेशाच्या इतिहासाविषयीची अधिक माहिती कर्नाटक राज्य; केरळ या नोंदीमध्ये ‘इतिहास व राज्यव्यवस्था’ या उपशीर्षकाखाली दिलेली आहे.

 

चौधरी, वसंत; पंडित, अविनाश

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate