पश्चिम हिंदी महासागरातील सेशेल द्वीप प्रजासत्ताकातील सर्वांत मोठे बेट. लोकसंख्या जवळपासच्या बेटांसह ५४,५७२ (१९७७). लांबी २६ किमी. व क्षेत्रफळ १४८ चौ. किमी. देशातील ८८% लोक या बेटावर राहतात.
बेटावर सर्वदूर अंतर्गंत वाहतुकीसाठी फरसबंदी रस्ते आहेत. व्हिक्टोरिया ही राजधानी, एकमेव उल्लेखनीय शहर व बंदर असून तेथून व १९७१ मध्ये बांधलेल्या येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाह्य जगाशी दळणवळण व व्यापार चालतो. एअर इंडियाच्या हवाई वाहतूक सेवेने माहे भारताशी जोडले गेले असून येथे बँक ऑफ बडोदाची एक शाखा आहे.
प्रमुख निर्यात खोबरे, दालचिनी व दालचिनीच्या पानांचे तेल, पाच वनस्पतींचे अत्तर ही असून येथे थोड्या प्रमाणावर चहाचे उत्पादनही होते.
मासेमारी हा प्रमुख उद्योग आहे. बहुतेक लोक रोमन कॅथलिक, यूरोपीय व कृष्णवर्णी आफ्रिकी मिश्रवंशाचे आहेत. अधिकृत भाषा इंग्रजी असली, तरी लोक क्रीओल ही पोटभाषा बोलतात. १९६०–६५ च्या दरम्यान बेटाच्या मध्यावरील डोंगरावर अमेरिकेने वायुदल ठाणे उभारले होते.
बेटाची व प्रजासत्ताकाची व्हिक्टोरिया ही राजधानी (लोकसंख्या २३,८८०–१९८० अंदाज) बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर असून बेटावरील लोकांपैकी सु. ७५ टक्के लोक तेथे राहतात. बंदरात खोल पाण्याचे २·५ चौ. किमी. क्षेत्र असून तेथे एका वेळी चार मोठ्या आगबोटी उभ्या राहू शकतात. आतले लहान बंदर लहान बोटी, पडाव वगैरेंसाठी उपयोगी पडते.
देशाची व्यापारी व सांस्कृतिक केंद्र म्हणून हे प्रसिद्ध असून तेथे रुग्णालय, शाळा, प्रशिक्षण महाविद्यालय वगैरे आधुनिक सुविधा आहेत.
कुमठेकर, ज. ब.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/29/2020