অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बद्रीनाथ

बद्रीनाथ

बद्रीनाथ मंदिराचे प्रवेशद्वार


 

बद्रीनाथ

 

 

 

 

बद्रीनारायण. हिमालयातील एक प्रसिद्ध व प्राचीन तीर्थक्षेत्र. हे उत्तर प्रदेश राज्याच्या चमोली जिल्ह्यात, अलकनंदा नदीकाठी समुद्रसपाटीपासून सु. ३,००० मी. उंचीवर वसलेले आहे. उत्तर प्रदेश राज्यातील श्रीनगरच्या ईशान्येस ८८ कि.मी. तर जोशीमठाच्या उत्तरेस ३२ किमी. वर हे असून बद्रीनाथपर्यंत मोटारीने प्रवास करता येतो.

या स्थानाविषयी अनेक आख्यायिका पूर्वीपासून प्रचलित आहेत. उदा., भगवान विष्णू येथे तपश्चर्चेला बसले असता, उन्हापासून त्यांचे रक्षण व्हावे, म्हणून लक्ष्मीने बदरीचे (बोरीचे झाड) रूप घेतले. त्यामुळे या स्थानाला बदरीनाथ हे नाव पडले.

पूर्वी येथे असलेल्या बोरीच्या वनावरून यास बद्रीनाथ (बदरीनाथ) हे नाव पडले असेही समजसे जाते. येथील बद्रीनाथाचे म्हणजे विष्णूचे मूळचे मंदिर आद्य शंकराचार्यांनी आठव्या शतकात बांधले. परंतु हिवाळ्यात सतत होणाऱ्या हिमवृष्टीमुळे ते मोडकळीस आले.

विद्यमान मंदिर नवीन व भव्य असून त्याच्या सभामंडपावर डेरेदार कळस व गाभाऱ्यावर पॅगोडा पद्धतीचे सोन्याच्या पत्र्याने मढविलेले शिखर आहे. गाभाऱ्यातील बद्रीनाथाची योगासन घातलेली मूर्ती शाळिग्रामाची असून ती ६० सेंमी. उंच आहे. ही मूर्ती वैष्णव पंथीय विष्णूची मानतात, तर बौद्ध धर्मीय ती गौतम बुद्धाची समजतात.

मंदिरात बद्रिनारायणाशिवाय नारद, नरनारायण, लक्ष्मी, कुबेर, इत्यादींच्या मूर्ती आहेत. नोव्हेंबर ते एप्रिल या काळात हिमवृष्टीमुळे येथील मंदिर बंद ठेवण्यात येते आणि बद्रिनारायणाची उत्सवमूर्ती दर्शनासाठी जोशीमठात हलविण्यात येते.

या क्षेत्राच्या परिसरात पंचशिला, ऋषिगंगा, कूर्मधारा, प्रह्लादधारा, तप्तकुंड, नारदकुंड इ. तीर्थे असून जवळच असलेला ब्रह्मकपाल नावचा प्रशस्त खडक श्राद्धादी कर्मांसाठी पवित्र मानला जातो. येथे गरम पाण्याचे झरेही आहेत. देवपूजेचे काम परंपरेने रावळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंपूतिरी (नंबुद्री) ब्राह्मणाकडे असते.

याच्या परिसरात वसुधारा धबधबा. मुचकुंद गुंफा, बदरिकाश्रम (व्यासांची पर्णकुटी), जवळच गंधमादन पर्वत इ. ठिकाणे व पश्चिमेस२७ किमी. वर बद्रीनाथ हे ७,१३८ मी. उंचीचे प्रसिद्ध शिखर आहे. यात्रिकांसाठी काली-कंबलीवाल्यांच्या धर्मशाळा, भोजनासाठी सदावर्त इ. सोयी आहेत.

 

चौंडे, मा. ल.; सावंत, प्र. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate