অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बसवकल्याण

बसवकल्याण

बसवकल्याण

कल्याणी. कर्नाटक राज्याच्या बीदर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याने प्रमुख ठिकाण व लिंगायत धर्मपंथीयांचे तीर्थक्षेत्र. लोकसंख्या २५,५९२ (१९७१). अलीकडे कल्याणीव पूर्वी कल्याण या नावाने हे शहर ओळखले जाई. बहमनी राज्याच्या काळात कसबा कल्यानअसा याचा उल्लेख आढळतो.

हे बीदर शहराच्या पश्र्चिमेस सु. ८० किमी. वर सोलापूर-हैदराबाद राज्यमार्ग क्र. ९ च्या उत्तरेस सु. ४ किमी अंतरावर वसले आहे. बीदर, भालकी, गुलबर्गा सोलापूर इ. शहरांशी हे सडकांनी जोडलेले आहे. या शहरास लिंगायत धर्माचे अध्वर्यू बसवेश्वर (११३१-६७) यांच्या येथील वास्तव्यामुळे बसवकल्याणहे नाव पडले असावे. पूर्वी हैदराबाद संस्थानात याचा समावेश होता. संस्थानाच्या विलीनीकरणानंतर हे कर्नाटक राज्यातील बीदर जिल्ह्यात समाविष्ट झाले.

कराव्या शतकात बादामीच्या चालुक्यांचा वंशज पहिल्या सोमेश्र्वराने (कल्याणचा चालुक्या) आपली मान्यखेट (मालखेड) ही राजधानी सोडून कल्याणपूरकिंवा कल्याण राजधानी केली. त्या काळी राजोश्र्वर्य, सपंत्ती व सुवत्ता यांमुळे हे प्रसिद्धीस आले. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात त्या राज्याचा सामंत बिज्जल कलचुरी (कार. ११५६-६७) याच्या हाती सर्व सत्ता जाऊन चालुक्या घराणे लयास गेले. मात्र कल्याणचे महत्त्व कायमच राहिले. कलचुरीनंतर देवगिरीचे यादव, चौदाव्या शतकात बहमनी राज्य,आदिलशाही राज्य अशी अनेक सत्तांतरे येथे झाली. १६५३ मध्ये हे मोगलांनी लुटले आणि १६५६ मध्ये औरंगजेबाने येथील किल्ला जिंकला. त्यानंतर निजामशाहीकडून मोगलांकडे गेलेल्या एका सरदाराला हे शहर जहागिरी म्हणून मिळाले.

हरात भामेश्र्वर, मधुकेश्र्वर, हाटकेश्र्वर, पंपेश्र्वर इ. आणि अक्क-महादेवी, अल्लमप्रभू यांची नावे असलेली अनेक प्राचीन मंदिरे असून चालुक्य काळातील नटराज, भैरव, सूर्य,महिषासुरमर्दिनी यांच्या मूर्ती किल्ल्यात ठेवलेल्या आढळतात. शहराच्या उत्तरेस चिरेबंदी दगडी पायावर उभारलेला चालुक्यकालीन भव्य भुईकोट किल्ला पुरातन वैभवाची साक्ष देतो.

किल्ल्यात अनेक तोफा असून त्यांपैकी नव-गजप्रसिद्ध आहे. सध्या किल्ल्यात तहसीलदार कार्यालय व न्यायालय असून जवळच नगरपालिका कार्यालय आहे. याज्ञवल्क्य स्मृतीवरील मिताक्षरा या टीकेचा कर्ता विज्ञानेश्र्वर आणि बसवेश्र्वर यांची ही कर्मभूमी. बसवेश्र्वराचे मंदिर (महामने) शहरात मध्यभागी असून प्रत्येक सोमवारी येथे  वैशिष्टयपूर्ण  पूजा  बांधतात.

दरवर्षी  वैशाख  शुद्ध  त्रयोदशीस यात्राही  भरते.  याच  मंदिराच्या  उत्तरेस  परूषकट्टा  असून  त्यावर बसून बसवेश्र्वर सामूहिक प्रार्थना व प्रवचने करीत. चालुक्यानंतर झालेल्या अनेक लढायांत येथील काही मंदिरे नष्ट झाली, तर काहींचे मशिदींत रूपांतर झाले.

येथील पीरसाहेब, शेर सवार इ. दर्गे प्रसिद्ध आहेत. शहराच्या दक्षिणेस सध्याच्या त्रिपुरांतक तलावाच्या चारी बाजूंस बसवेश्र्वर, चेन्नवसव, अक्कमहादेवी, अक्कनागम्मा इत्यादींच्या ध्यानस्थ बसण्याच्या गुहा आजही पाहावयास मिळतात. बसवेश्र्वरांनी स्थापिलेल्या अनुभवमंटपाच्या जागीच सध्या शिवलिंगाकार ६३ विशाल स्तंभांवर आधारित नवी वास्तू बांधण्याचे काम चालू आहे.

हे शहर महत्त्वाचे शिक्षणकेंद्र असून आसपासच्या शेतमालाची बाजारपेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे खुबा बसवेश्र्वर कला व विज्ञान महाविद्यालय, रूग्णालय, शायकीय विश्रामगृह, पर्यटक निवास, धर्मशाळा इ. विविध सोयी आहेत.

 

कापडी, सुलभा

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate