भारतातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि उत्तर प्रदेश राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण, लोकसंख्या १,४८,९८४ (१९८१). ते गंगा-यमुना नद्यांच्या दुवेदीत आग्र्याच्या वायव्येस सु. ५८ किमी.- वर यमुनाकाठी वसले आहे. दिल्ली-मुंबई मध्यरेल्वेवरील ते प्रमुख प्रस्थानक असून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दिल्लीच्या दक्षिणेस सु. १४५ किमी. वरील एक मध्यवर्ती केंद्र आहे.
प्राचीन सप्त पुरांपैकी हे एक असून धर्म, दर्शन, कला, भाषा, साहित्य इत्यादी विविध क्षेत्रांत झालेल्या तेथील विकासामुळे मथुरेचे महत्त्व प्राचीन काळापासून आहे. त्याच्या सभोवतालच्या प्रदेशाला व्रजमंडल म्हणत. इ.स. पू. काळात हा प्रदेश शूरसेन जनपद या नावाने परिचित होता.
मथुरा ही या जनपदाची राजधानी होती. या नगरीविषयी मधुरा, मधुपूर, मधुपुरी, मधुपिका, मधुपट्टना अशी भिन्न नामांतरे प्राचीन साहित्यात आढळतात. मधुरा वा मधुपुरी ही नावे मधू नावाच्या दैत्यावरून रूढ झाली असावीत. मथुरेच्या सभोवतालच्या जंगलास पूर्वी मधुबन म्हणत असत. विद्यमान मथुरेच्या नैर्ऋत्येस पाच किमी. वरील माहोली म्हणजेच मधुबन असावे, हे मत आता सर्वमान्य झाले आहे.
हरिवंशात तसेच गरूड पुराणात मथुरेविषयी एक वैभवशाली नगरी म्हणून माहिती मिळते. त्यात मथुरेला यमुनातटिस्थित म्हटले आहे. दाशरथी रामाचा भाऊ शत्रुघ्न याने मधुपुत्र लवणाचा पराभव करून मथुरा ही नगरी वसविली. त्यानंतर या स्थळाची अनेक स्थित्यंतरे वा परिवर्तने झाली असण्याची शक्यता आहे. मगधकडे जाणारे व्यापारी मार्ग व राजमार्ग प्राचीन काळी मथुरेस एकत्र येत, त्यामुळे इंद्रप्रस्थ, श्रावस्ती, कौशाम्बी, वैशाली इ. नगरांशी मथुरेचा व्यापारी व सांस्कृतिक संबंध होता.
मथुरेविषयी प्राचीन वाङमयातून बरीच माहिती मिळते. ग्रीक प्रवासी मोगॅस्थिनीझ, चिनी प्रवासी फाहियान, यूआनच्वांग तसेच टॉलेमी, अल्-वीरूनी इत्यादींच्या प्रवासवर्णनांत मथुरेविषयी उल्लेख आढळतात; तथापि मथुरेचा प्राचीन इतिहास पौराणिक दंतकथा व आख्यायिकांनी भरला आहे.
प्राचीन काळी मथुरेवर सोम व सूर्य या दोन्ही वंशांनी राज्य केले. त्यांतील यादव वंशाची सत्ता दीर्घकाळ होती. या वंशातील श्रीकृष्णाची कारकीर्द प्रसिद्ध असून कृष्णाने कंस- वध करून मथुरेला प्रजापीडक राजाच्या अत्याचारापासून मुक्त केले; तथापि पुढे श्रीकृष्णाला आपल्या सर्व अप्तांसह मथुरा सोडावी लागली. त्याने द्वारका ही नवीन नगरी वसवली आणि तेथे तो बलरामासह राहू लागला. त्यानंतर हा प्रदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाला. मौर्यानंतर शुंग वंशाचे आधिपत्य (इ.स.पू. १८५-७३) या भागावर होते. शुंग-काळात मथुरेवर परकीय आक्रमणे झाली.
त्यानंतर शक-कुशाणांच्या अंमलाखाली मथुरा गेली (इ. स. पू. ७३-इ. स. २२०). त्यावेळे पासून मथुरेचा विश्वसनीय वृत्तांत कुशाणांचे अभिलेख व मुद्रा यांमुळे ज्ञात झाला आहे. त्यांत रंजुवुल, शोंडास इ. क्षत्रपांची नावे मुद्रांवर आढळतात. याशिवाय त्यावेळेचा एक सिंहशीर्ष स्तंभ उपलब्ध झाला असून त्यावरील लेखात स्तूप व संघाराम या वास्तू रंजुवुलाच्या कार-कीर्दीत बांधल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
शोंडासाच्या कोरीव लेखात त्याच्या कोशाध्यक्षाने पुष्करणी, कूप व आराम निर्माण केल्याचे लिहिले आहे. त्यानंतर मथुरा नागवंशी राजांच्या सत्तेखाली आली. मथुरेतील कित्येक नागराजे आपल्या नावापुढे ‘दत्त’ हा शब्द लावीत. नागांच्या काळात शैव संप्रदायाचा प्रसार होऊन श्वेतांबर जैनांनीही स्कंदिल नावाच्या आचार्याच्या अध्यक्षतेखाली एक सभा भरविली होती. पुढे गुप्तवंशाची सत्ता (३२१-५५५) मथुरेवर होती.
गुप्तकाळात फाहियान या चिनी प्रवाशाने या स्थळास भेट दिली आणि इथे बौद्ध धर्माचा प्रभाव असल्याचे नमूद केले आहे. बहुतेक परकीय प्रवाशांच्या वृत्तांतांत मथुरेला देवतानगर म्हटले असून वासुदेव कृष्णाची पूजा तेथे प्रचलित असल्याचा उल्लेख मिळतो. इ.स. पाचव्या शतकात मथुरेवर हूणांनी आक्रमण केले आणि बौद्ध स्तूप, जिनालये, हिंदू मंदिरे यांची नासधूस केली. पुढे हर्षवर्धन (कार. ६०६-६४७) व गुर्जर प्रतीहार (इ. स. ८-११ वे शतक) आणि गाहडवाल या दोन वंशांच्या कारकीर्दीत इथे सांस्कृतिक क्षेत्रांत फारशी प्रगती झाली नाही; परंतु बौद्ध, जैन व हिंदू धर्मांतील पूजा-अर्चा यथास्थित चालू होती.
महंमूद गझनीने १०१७ मध्ये केलेल्या भारतावरील स्वारीत येथील मंदिरांचा उच्छेद केला. त्यानंतर मुहम्मद घोरी याने ११९३ मध्ये कनौजवर स्वारी केली आणि जयचंद याचा पराभव केला. तेव्हा मथुरा प्रथम मुसल- मानी अंमलाखाली गेली; पुढे पेशवे काळात मराठ्यांची काही काळ सत्ता वगळता (१८०२ पर्यंत), मथुरा मोगली सत्तेखाली होती. ब्रिटीश व दुसरा बाजीराव यांत झालेल्या १८१८ मधील सालबाईच्या तहाने मराठ्यांचा मुलूख ब्रिटिश सत्तेखाली आला. परिणामतः मथुरा ब्रिटीश अंमलाखाली आली.
मथुरेवर मौर्य ते ब्रिटिश या प्रदीर्घ काळात विविध राजवंशांनी राज्य केले. त्यांतील शुंग-कुशाण आणि गुप्त या काळात मथुरेत ललितकलांचा विकास झाला. कुशाण काळात इतर कलांबरोबर मूर्तिकला अधिक विकसित झाली आणि इ. स. सातव्या शतकापर्यंत वैदिक, बौद्ध व जैन हे तिन्ही धर्म लोकप्रिय होते. त्यांचे कलावशेष उत्खननांत विपुल प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.
ब्रिटिश काळात मथुरेचे पुरातत्त्वीय दृष्ट्या प्रथम सर्वेक्षण अलेक्झांडर कनिंगहॅम याने केले. त्यानंतर याठिकाणी विविध विद्यापीठांनी तसेच भारत सरकारच्या पुरातत्त्वीय खात्याने अनेक उत्खनने केली. या उत्खननांत सापडलेले बहुतेक अवशेष मथुरेच्या पुरातत्त्वीय वस्तु-संग्रहालयात तसेच कर्झन वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आले असून काही दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात व लखनौच्या वस्तुसंग्रहालयात ठेवलेले आहेत.
येथील अवशिष्ट वास्तूंत फारच थोड्या प्राचीन वास्तू सुस्थितीत आहेत; तथापि उपलब्ध अवशेषांत कुशाणकालीन वास्तुशिल्पांचे नमुने जास्त असून येथे सहा स्तूप होते. त्यांपैकी कंकाली टीला येथे दोन जैनबस्त्या (मंदिरे) व जमालपूर (हुविष्क विहार), भुतेश्वर, कत्रा केशवदेव (यशविहार) आणि यमुनेच्या काठी गुहा विहार असे चार बौद्ध स्तूप होते. बौद्ध स्तूपांच्या बांधणीत वीट व दगड या दोन्ही माध्यमांचा उपयोग केलेला असून स्तूपाखाली चौथरा असे.
स्तूपाचे विधान अंडाकृती लंबगोल आहे. शिखरावर छत्र आणि प्रदक्षिणेसाठी वेदिका असे. स्तूपाचा बाह्य भाग, तोरणे, वेदिकांचे कठडे आणि प्रवेशद्वारे कोरीव नक्षीकाम व मूर्तीनी अलंकृत केलेली असत. प्रवेशासाठी असलेल्या चारही बाजूंना अलंकृत तोरणद्वारे असत. या अलंकरणामध्ये लहान स्तूप, बोधिवृक्ष, बुद्धाच्या प्रतिमा, बोधिसत्त्वां- दिकांच्या मूर्ती, बुद्ध जीवनाशी निगडित कथांचे व जातकातील कथांचे शिल्पांकन आढळते.
बहुतेक सर्व मूर्तिकाम बौद्ध स्तूपांच्या सुशोभनासाठी केलेले असल्यामुळे बुद्ध-बोधिसत्त्वादिकांच्या मूर्तिबरोबरच यक्ष, यक्षी यांच्या सुबक मूर्ती घडविण्याकडे कलाकाराने लक्ष दिले आहे. बुद्ध मूर्तीत हातापायांच्या तळव्यांवर चक्रे असून कपाळावर भुवयांच्या मधोमध उष्णीष (टेंगूळ) दाखविले आहे आणि कानाच्या पाळ्या मानवी पाळ्यांपेक्षा खूपच लांब खोदल्या आहेत. छाती रूंद असून वस्त्रांच्या चुण्या समांतर रेषांनी दाखविल्या आहेत.
आसनाला तीन सिंह मूर्तीचा आधार दिला आहे. मागील बाजूस बोधिवृक्ष, चौरीधारी सेविका, यक्ष, यक्षी आणि बुद्धाची प्रभावळ आहे. बुद्धाच्या भूमिस्पर्श, अभय, व्याख्यान, धर्मचक्र-परिवर्तन इ. मुद्रा असून या मूर्तींना जास्तीतजास्त देवरूप देण्याचा प्रयत्न मथुरा शिल्पशैलीच्या कलाकारांनी केला आहे.
त्यामुळे गांधार शिल्पांत आढळणारी परकीय छटा, सुडौल व ह्रद्य घडण या व्यक्तिचित्रणांत दिसत नाही; तथापि यक्ष-यक्षींच्या पूजा प्राचीन भारतात प्रचलित असल्याचे काही नमुने इथे आढळतात. मथुरे जवळच्या परखाम खेड्यात सापडलेली भव्य दगडी मूर्ती ही इ. स. पू. चौथ्या शतकातील आहे, असे बहुतेक विद्वान मानतात. मथुरेच्या परिसरात सापडलेल्या एका अभिलेखावरून यक्ष राजा मणिभद्र याची पूजा त्या काळी सर्वत्र रूढ असल्याचे दाखले मिळतात.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020